‘युके’चे ‘पीके कनेक्शन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2020   
Total Views |
india_1  H x W:


भारताने गिलगिट-बाल्टिस्तान रिकामे करण्याच्या दिलेल्या जबर धमकीमुळे इमरान खान सरकारसोबतच पाकिस्तानी सैन्याचीही चांगलीच तंतरली. म्हणूनच की काय, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा काश्मीरला ‘विवादित क्षेत्र’ म्हणून मोकळे झाले आणि भारताने त्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न केला, तर युद्धखोरीची नेहमीची भाषाही त्यांनी केली. म्हणजे, इतके वर्षं काश्मीर आमचेच, काश्मीरवर भारताचा हक्क नाही, असा तावातावाने अपप्रचार करणारा पाकिस्तान आता साफ उघडा पडला आहे.
लष्करप्रमुखांनी जर याला ‘विवादित क्षेत्र’ म्हणून मान्यता दिली, तर त्यावर पाकिस्तानचा कुठलाही अधिकार नाही, हे आपसुकच स्पष्ट होते. हीच कदाचित लष्करप्रमुखांनी पाकिस्तानींना दिलेली यंदाची ईदी असावी. पाकिस्तानच्या काश्मीरवरुन धमक्या भारताला नवीन नाहीत. पण, मोदीकाळात त्या धमक्यांची हवा पार विरुन गेली आहे. इतके वर्षं भारताने पाकिस्तानबाबत केवळ बचावात्मक धोरणाचा अवलंब केला. पण, २०१४पासून मोदी सरकारने पाकिस्तानसोबत आक्रमक पवित्रा सरकार स्वीकारलेला दिसतो. त्याचे परिणाम आपण पाहिलेच आणि आगामी काळातही ते निश्चितच दिसून येतील.
पण, पाकिस्तानची पाकव्याप्तकाश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान हातातून निसटण्याची भीती ही केवळ सरकार आणि लष्करप्रमुखांपुरती मर्यादित नाही, तर परदेशातील पाकिस्तानी वंशाच्या लोकांनाही चांगलीच मिरची झोंबलेली दिसते. खासकरुन युनायटेड किंग्डम जिथे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. अशाच एका माथेफिरुने डर्बी शहरात गुरुद्वाराची तोडफोड केल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने गुरुद्वारामध्ये त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हते. या मूर्ख माणसाने गुरुद्वाराच्या बाहेर चिठ्ठीत लिहिले की, “काश्मिरींची मदत करा, अन्यथा संपूर्ण जगासमोर संकट निर्माण होईल.” अशी पोकळ धमकी देणार्‍या त्या माथेफिरुला पोलिसांनी तुरुंगातही डामले.
पण, युकेमध्ये घडलेली ही पहिलीवहिली घटना नाही. यापूर्वी गुरुद्वारात चाकूहल्ला झाल्याचीही घटना घडली होती. तसेच पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी भारतविरोधी प्रदर्शन करणे, भारतीयांना शिवीगाळ करणे, नाहक त्रास देणे यांसारखे प्रकार घडले आहेत. अशा घटनांमुळे मात्र युकेमधील भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सुरक्षेची चिंता मात्र वाढली आहे. कारण, तेथील भारतीयांवर हल्ले करण्याबरोबरच त्यांना ओलीस ठेवण्याचे प्रकार करुन भारत सरकारला ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही नाकारता येत नाही.
२०११च्या युकेमधील जनगणनेनुसार, साधारण १ लाख १७हजार पाकिस्तानी एकट्या युकेमध्ये वास्तव्यास होते. आज २०२०मध्ये ही संख्या निश्चितच दोन ते तीन लाखांहूनही अधिक असेल. एवढेच नाही, तर लंडन आणि इतर शहरांतही मशिदींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती इंग्लंडमधील दहशतवादाची केंद्रही ठरु शकतात. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार तर ‘युनायटेड किंग्डम’लाही ‘अरेबिक किंग्डम’ बनवण्याचे छुपे मनसुबे आखले जात असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. त्यामुळे दहशतवादाची पाळेमुळे युकेमध्ये खोलवर आधीच रुजली आहेत आणि वेळोवेळी झालेल्या अशा माथेफिरुंच्या हल्ल्यांतून ते चित्र स्पष्टही झालेले दिसते. ब्रिटिश-पाकिस्तानी वंशाचे सादिक खान २०१६पासून लंडनसारख्या महत्त्वाच्या शहराचे महापौरही आहेत.

असे इतरही पाकिस्तानी वंशाचे नागरिक युकेच्या राजकीय पक्षांमध्ये सक्रिय असून भारतविरोधी वातावरणनिर्मितीसाठी त्यांची बडबड सुरुच असते. पण, इंग्लंडच्या दृष्टीने हे पाकिस्तानी वंशाचे नागरिक आणि त्यांचा राजकारणातील हा ‘पाकिस्तानीपणा’ भविष्यात आणखीन धोकादायक सिद्ध होऊ शकतो, हे नक्की! इंग्लंडमधील असो वा अफगाणिस्तानातील गुरुद्वारांवरील हल्ले, ते शीख समाजालाच नव्हे, तर संपूर्ण हिंदू धर्मीयांना आणि भारताला चिथावणी देण्याचा प्रकार आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तानमधील या वाढत्या कलहाची झळ पाकिस्तानी हिंदूंनाही सहन करावी लागल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत समोर आले आहेत. तेव्हा, पाकिस्तानला अद्दल घडविण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्याचीच तडफड मग ही अशा तोडफोडीतून, हल्ल्यांतून समोर येते. पण, पाकिस्तानच्या पापांचा घडा आता भरला आहे. फक्त तो कधी फुटतो आणि कसा फोडला जातो, त्याची शांतपणे प्रतीक्षा करायची.
@@AUTHORINFO_V1@@