काँग्रेसची आडकाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Mar-2020   
Total Views |
smart parking _1 &nb



राजकीय कारभारात सत्ताधारी पक्षावर अंकुश असावा तसेच जनहिताचे योग्य निर्णय घेतले जावे, यासाठी विरोधी पक्षाची भूमिका मोलाची असते. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाचा अभ्यास करून दुसरी बाजू समोर आणणे, हे अपेक्षित असते. केवळ विरोधाला विरोध केला तर तो विरोध हा विकासात आडकाठी बनण्याचाच धोका जास्त असतो. याचीच प्रचिती सध्या नाशिक शहरात येत आहे. नाशिक शहराचा ‘स्मार्टसिटी’मध्ये समावेश करण्यात आला. त्या अंतर्गत ‘स्मार्ट सिटी’ कंपनीतर्फे शहरात सुरू करण्यात आलेल्या १५ ठिकाणच्या पार्किंगवर बुधवारपासून शुल्क आकारणीस सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी ४४२ वाहनधारकांनी या सशुल्क वाहनतळांचा वापर करत निर्धोक पार्किंगचा आनंद लुटला. नाशिकमधील पार्किंगची समस्या सुटावी आणि रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे जनहिताची असणारी ही उपाययोजना जनतेच्यादेखील पसंतीची आहे, हे पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून येत आहे. मात्र, असे असले तरी, काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी नागरिकांना पार्किंग वापराचे शुल्क अदा करू नये, असे आवाहन केले आहे. त्यांचा व त्यांच्या पक्षाचा या उपक्रमाला विरोध असल्याचेच यावरून दिसून येते. त्यामुळे आगामी काळात त्यांचा हा विरोध शहरात नवीन वाद घेऊन येऊ नये, हीच नाशिककर नागरिकांची माफक अपेक्षा. ‘स्मार्ट सिटी’ कंपनीतर्फे आतापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या पार्किंगचे बुधवारपासून दर आकारण्यास सुरुवात झाली. संपूर्ण शहरात ‘ट्रिगिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ तर्फे आठ ऑन स्ट्रीट व पाच ऑफ स्ट्रीट पार्किंगचे व्यवस्थापन आहे. पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी शुल्क आकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दिवसभरात पहिल्या शिफ्टमध्ये २९३ चारचाकी वाहने, १४९ दुचाकीधारकांनी शुल्क अदा करून पार्किंगचा लाभ घेतला. मोठ्या प्रमाणात असणारे गल्लीबोळ, भरवस्तीत असणार्‍या बाजारपेठा लक्षात घेता, निश्चित पार्किंगच्या ठिकाणाची शहराला नक्कीच आवश्यकता आहे. असे झाल्याने वाहतूक शाखा व नागरिक यातील टोईंगवरून होणारे वाददेखील शमणार आहेत. याचा विचार महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी करणे आवश्यक आहे.



अशीच सकारात्मकता हवी


भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतातील खेड्यांचा विकास झाल्यास देशाचा विकास होणे सहज शक्य आहे. याच धारणेतून नाशिक येथील ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या वतीने नाशिक तालुक्यातील गणेशगाव शाळेत कॉम्प्युटर लॅबचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘संगणक साक्षरता अभियाना’तील स्वप्नपूर्तीच्या दिशेने अजून एक पाऊल ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या माध्यमातून टाकण्यात आले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण म्हणजे मृगजळच ठरते. अशा परिस्थितीत संस्थेने पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यातील शेवखंडी, हरसूल, नाचलोंढी, माळेगाव, खोकरतळे, आंबे, कोकणगाव आणि गणेशगाव या आठ शाळांची निवड केली होती. यातील गणेशगाव संगणक कक्षाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. फोरमने संगणक, खुर्च्या उपलब्ध करून दिले तर ग्रामस्थ-शिक्षकांनी लॅबची डागडुजी तसेच फर्निचर आणि सुशोभीकरणासाठी योगदान दिले. ‘सोशल नेटवर्किंग फोरम’च्या कार्यात गावकरी, बॉश, एबीबीसारख्या प्रथितयश कंपन्या यांचेदेखील सहकार्य मिळत आहे. हीच बाब सामाजिक सकारात्मकता दर्शविण्याकामी पुरेशी ठरते. विविध कंपन्यांनी आपला सीएसआर निधीचा विनियोग करावा, असे निश्चितच अपेक्षित आहे. त्याचाच उपयोग सध्या नाशिकमध्ये विविधांगांनी होताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून शहरात प्रवेश करणार्‍या कमानींवर शहराची संस्कृती चितारण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. तसेच एचएएलने गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. जेव्हा शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना असे पाठबळ मिळते, तेव्हा बदल हा नक्कीच घडून येत असतो. फक्त गरज असते ती सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची आणि बदलाच्या दिशेने अविरत प्रवास करण्याची. कंपन्यांचे गणित हे केवळ आर्थिक असते. त्यांनी सामाजिक कार्यात किंवा समाजासाठी लक्ष देणे, हे अभिप्रेत जरी असले तरी त्यांनी तसे न केल्यास त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश जात नाही. मात्र, आजमितीस कंपन्या या सामाजिक संस्थांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. त्यामुळे अशी सकारात्मकता सामाजिक विकासासाठी नक्कीच आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@