बदाऊनांचं भटकेपण संपुष्टात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

ss_1  H x W: 0
 
 

नेगेव्ह वाळवंटातल्या बदाऊन टोळ्यांना इस्रायली नगरपालिका आग्रह करत आहेत की, आता भटकत न बसता इथेच स्थिर व्हा.
 
 
 
बदाऊन म्हणजे भटके अरब. स्वतः उंटावर बसून शेळ्यामेंढ्यांचा कळप हाकत वाळवंटामध्ये भटकत राहायचं, हेच बदाऊनांचं जीवन. वाळवंटात तिथे पाणी मिळेल, गवत मिळेल, तिथे थोडा काळ थांबले, निघाले पुढे. वास्तविक अन्नपाण्याची सोय झाली की, स्थिर व्हायचं, हा मनुष्य स्वभाव आहे. आज मानवाचा माहीत असलेल्या सर्व सभ्यता अशाच नद्यांच्या काठाने विकसित झालेल्या आहेत.
 
 
पण, बदाऊनांनी अशी स्थिरता नाकारली. ते सतत भटकतच राहिले. एखाददोन वर्षं नव्हे, एखाद-दोन शतकं नव्हे, तर गेली तीन हजार वर्षे ते असे भटकतच आहेत. त्यांना हेच जीवन आवडतं आणि त्यांच्या भटकण्याचा परिसर तरी केवढा, तर हिंदी महासागराच्या काठावरच्या येमेन-ओमानपासून सगळी मध्य-पूर्व, अरबस्तानचं द्वीपकल्प, आफ्रिकेची पूर्व किनारपट्टी, इजिप्तपासून भूमध्य समुद्राच्या काठाकाठाने फार मोरोक्कोपर्यंत म्हणजे अटलांटिक महासागरापर्यंत. लक्षात घ्या की, हा सगळाच प्रदेश वाळवंटी आहे. सहारा हे जगातलं सर्वात मोठं वाळवंट याच भागात आहे.
 
 
 
आधुनिक समाजशास्त्रज्ञांच्या मते, बदाऊन लोक गेली किमान तीन हजार वर्षे म्हणजे ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकाच्याही पूर्वीपासून असेच वाळवंटी प्रदेशात भटकत आहेत. त्यांचं घर म्हणजे तंबूच असतो. एका घरात, एका तंबूखाली साधारणतः एक जोडपं, त्यांची मुलं, त्यांचे आईवडील आणि एखाद-दुसरा भाऊ किंवा बहीण एवढे लोक असतात. अशा काही तंबूंची मिळून एक टोळी बनते. एखादा वयोवृद्ध, अनुभवी माणूस त्या टोळीचा म्होरक्या म्हणजे शेख बनतो. ‘शेख’ या अरबी शब्दाचा अर्थच मुळी ज्येष्ठ व्यक्ती असा आहे.
 
 
 
सतत निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यामुळे बदाऊनांच्या नजरा आणि कान फार तीक्ष्ण झालेले असतात. वाळवंटी प्रदेशात सततच वाळूची वादळं होत असतात. दिवसा भयंकर उष्ण वारे नि रात्री हाडे गोठवणारी थंडी हेच तिथलं नैसर्गिक ऋतुमान असतं. हवामानातला किंचितसाही बदल बदाऊनांच्या नजरांना ताबडतोब समजतो. लगेच इशारा दिला जातो, वादळ येत आहे. प्रत्येक तंबू आपापल्या शेळ्यामेंढ्यांना सुरक्षित ठेवण्याची तजवीज करतो.
 
 
 
गेल्या तीन हजार वर्षांच्या काळात अनेक साम्राज्यं उदयाला आली नि मावळली, पण बदाऊनांच्या जीवनक्रमात फरक पडला नाही. मॅसिडोनियाच्या ग्रीकांचं साम्राज्य, रोमन साम्राज्य, यहुदी साम्राज्य, ख्रिश्चन साम्राज्य, अरब साम्राज्य आणि अखेर कॉन्स्टन्टिनोपलच्या तुर्कांचं उस्मानी साम्राज्य, कोणतेही साम्राज्यकर्ते त्यांच्या फारसे वाटेला गेले नाहीत. कारण, बदाऊनांना काही नकोच होतं. माणसा-माणसांचे, राज्या-राज्यांचे संघर्ष होतात कशासाठी, तर भूमी आणि संपत्तीसाठी.
 
 
 
बदाऊनांना मुळी कायमची अशी भूमी नकोच होती आणि त्यांच्या शेळ्यामेंढ्या हीच त्यांची संपत्ती होती. ती बरोबर घेऊन हिंदी महासागरापासून अटलांटिक महासागरापर्यंत वाळवंटातून भटकत राहायचं, हेच त्यांना प्रिय होतं. अशा लोकांशी कुणाचा संघर्ष निर्माण व्हायलाच काही कारण नव्हतं. एकमात्र झालं, बदाऊनांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. कदाचित सातव्या शतकानंतर जवळपास सगळ्याच अरब वंशीयांनी इस्लाम स्वीकारल्यामुळे बदाऊनांनीही तो स्वीकार केला असावा.
 
 
 
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मध्य-पूर्वेत तेल सापडलं आणि युरोपियन सत्ताधीशांच्या अधाशी नजरा या वाळंवटाकडे वळल्या. त्या वेळी मध्य-पूर्वेवर तुर्कांचं स्वामित्व होतं. तेव्हा तुर्क सत्ताधार्‍यांशी मैत्री करायला अँग्लो-फ्रेंच आणि जर्मन धडपडू लागले. या स्पर्धेत रशियाही होताच, पण बराच मागे होता. अखेर स्पर्धा जर्मनांनी जिंकली. पण, पहिलं महायुद्ध अँग्लो-फ्रेंचांनी जिंकलं आणि तेलसंपन्न मध्य-पूर्व हाताखाली घातली.
 
 
 
परंतु, हे सुख त्यांना फार काळ लाभलं नाही. कारण, पहिल्या महायुद्धाची प्रतिक्रिया म्हणून दुसरं महायुद्ध झालं नि त्यात इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी सगळेच जण फार खिळखिळे झाले. त्यांनी टाचेखाली दाबून धरलेली अनेक आशियाई-आफ्रिकी राष्ट्र भराभर स्वतंत्र झाली. या सगळ्याचा बदाऊनांवर काय परिणाम झाला, तर हिंदी महासागर ते अटलांटिक महासागर या बदाऊनांच्या ‘ट्राफिक वे’मध्ये अनेक नवी स्वतंत्र अणि सार्वभौम राष्ट्र निर्माण झाली. त्यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा, चेकनाके निर्माण झाले. बदाऊनांच्या नैसर्गिक भटकंतीला नाही म्हटलं तरी बंधनं आली. तसं कोणत्याही देशाने बदाऊनांना अडवलं नाही. पण, थोडी तरी बंधनं आली. मग हळूहळू या देशांंच्या नागरी प्रशासनांचे अंकुश आले. नवी गावं, शहरं निर्माण होऊ लागली. नगरपालिका आल्या. बदाऊनांना एखाद्या ठिकाणी तंबू ठोकण्यापूर्वी तिथल्या स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागायला सुरुवात झाली.
 
 
 
 
मुख्य म्हणजे, अनेक बदाऊन टोळ्यांनाच जीवनाचं आकर्षण निर्माण झालं. आपण आता शेळ्यामेंढ्या चारत राहण्यापेक्षा शिक्षण घ्यावं, नोकरी-व्यवसाय करावा. घर करावं. चार पैसे कमवावेत. आधुनिक पद्धतीने राहावं, असं त्यांना वाटू लागलं. याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. आधुनिक जीवनातल्या सुखसोईंचं आकर्षण हा घटक प्रभावी आहेच. पण, टोळ्यांमधली वाढती लोकसंख्या, दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात वाळवंटी प्रदेशात पडलेले काही भीषण दुष्काळ, त्यामुळे झालेली अन्नपाण्याची टंचाई हीदेखील महत्त्वाची कारणं आहेत.
 
 
 
आता काळ आणखी पुढे सरकला आहे. बदाऊन टोळ्यांच्या भटकंतीच्या प्रदेशात आणखी नव्या वस्त्या, गावं, नगरं बनली आहेत. इस्रायलच्या नेगेव्ह या वाळवंटी प्रदेशात ही स्थिती विशेषकरुन आहे. इस्रायल अतिशय पद्धतशीरपणे लोकवस्त्या वसवीत आहे. या वस्त्यांना वीज, पाणी, वैद्यकीय सोई, शिक्षण, रस्ते इत्यादी सर्व नागरी सुविधा मिळाल्याच पाहिजेत, असा इस्रायली सरकारचा फार कटाक्ष असतो.
 
 
 
नेगेव्ह वाळवंटातल्या बदाऊन टोळ्यांना म्हणूनच इस्रायली नगरपालिका आग्रह करत आहेत की, आता भटकत न बसता इथेच स्थिर व्हा. तुमची नेमकी संख्या आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्या प्रमाणात तुम्हाला पक्की घरं बांधून देतो. वीज, पाणी यांची सोय करतो. वैद्यकीय सुविधा देतो. तुमच्या मुलांना शिक्षण घेऊ द्या आणि आवडीनुसार नोकरीधंदा करू द्या!
 
 
 
बदाऊन टोळीवाल्यांसमोर मोठाच पेच आहे. कारण, याही वर्षी वाळवंटी प्रदेशात भीषण दुष्काळ पडलेला आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीने तर स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, बदाऊन टोळीवाल्यांचं भवितव्य आता अंधातरी आहे. तेव्हा त्यांनी भटक्या जीवनाचा आग्रह सोडून द्यावा आणि जिथे त्यांना आवडेल तिथे स्थिर व्हावं.
 
 
 
हिममानव ‘झुऑलॉजी’ उर्फ प्राणिशास्त्राची एक उपशाखा आहे, ‘क्रिप्टोझुऑलॉजी.’ जे प्राणी अस्तित्त्वात होते किंवा आहेत, परंतु त्यांच्या अस्तित्त्वाविषयीचा ठाम पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही, त्यांचा अभ्यास ही उपशाखा करते. नुकतचं या शाखेतल्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलंय की, ३३ मिमी आणि ४४ मिमी एवढ्या लांबीचे दोन केस ज्यांच्यावर विविध प्रकारचे शास्त्रीय प्रयोग करण्यात आले, ते ज्ञात अशा कोणत्याही सजीव प्राण्याशी मिळतेजुळते नाहीत. त्यामुळे ते कदाचित हिममानव उर्फ यतीचे असूही शकतील.
 
 
 
हिमालयाच्या बर्फाळ अतिदूर निर्मनुष्य भागात हिममानव किंवा यतीनामक प्राणी राहतो. तो थोडा माणूस नि थोडा वानर असा दिसतो. तो सुमारे १० फूट उंच असतो नि झाडांची पानं फळं खातो. अशा दंतकथा गेली किमान दीड-दोनशे वर्षं प्रचलित आहेत. इंग्रजी राजवटीत युरोपियन संशोधक हिमालय पर्वताचं विविध अंगानी संशोधन करू लागल्यावर त्यांना स्थानिक जनतेकडून यतीबद्दल खूप ऐकायला मिळालं. काही गोर्‍या लोकांनी यतीला ओझरता पाहिलंयसुद्धा, पण या संदर्भात पुष्कळ शोध-खल संशोधन होऊनसुद्धा प्रचलित विज्ञान पद्धतीला मान्य होईल, असा कोणताही पक्का पुरावा आजही मिळालेला नाही. त्यामुळे यती हे प्राणीशास्त्रज्ञांना एक गूढच राहिलेलं आहे.
 
 
१९२१ साली एव्हरेस्ट चढाईसाठी गेल्या एका गिर्यारोहक पथकाला २१ हजार फूट उंचीवर मानवसदृश पावलांचे ठसे आढळले. अगदी माणसासारखी, फक्त अनेक पट मोठी अशी ती पावलं पाहून सगळे जण थक्कच झाले. पथकाबरोबरच्या शेर्पा लोकांनी ती पावलं यतीचीच म्हणून ठामपणे सांगितलं. १९५३ साली शेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी यांनी एव्हरेस्टवर पाय ठेवला. त्यावेळीसुद्धा आपल्याला वाटेत यतीच्या पावलांचे ठसे दिसल्यांचं खुद्द सर एडमंडने लिहून ठेवलं आहे. डिसेंबर २००७ मध्ये एव्हरेस्टच्या परिसरात गेलेल्या एका अमेरिकन दूरदर्शन तुकडीला ३३ सेमी एवढ्या लांबीचे मानवसदृश पावलांचे ठसे आढळले होते.
 
 
 
प्रस्तुत बातमीत ज्या केसांचा उल्लेख आहे, ते केस ईशान्य भारतातील हिमालय परिसरात एका खेडुताला मिळाले होते. हा खेडूत जंगलात कंदमुळे गोळा करण्यासाठी फिरत असताना लागोपाठ दोन दिवस त्याला एक यती दिसला, तो झाडांच्या फांद्या तोडून कोवळी पालवी खात होता. या खेडुताची चाहुल लागताच तो नाहीसा झाला. यती जिथे दिसला होता, त्या जागेवर या खेडुताला ३३ मिमी आणि ४४ मिमी लांबीचे दोन केस मिळाले होते. ते इंग्लंडला पाठवण्यात आले. ज्ञात अशा सर्व केसाळ प्राण्यांच्या केसांशी ते तोडून पाहून आणि त्यांची डीएनए चाचणी घेऊन शास्त्रज्ञांनी नुकताच सुरुवातीला दिलेला निष्कर्ष जाहीर केला आहे.
 
 

@@AUTHORINFO_V1@@