नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर सारा देश एकजूट राष्ट्रभावनेने भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी उभा राहिल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. पुलवामा व अन्य दहशतवादी हल्ल्यांत हुतात्मा झालेल्या सैन्यदलांच्या जवानांच्या कुटुंबियांसाठी अनेकजण पुढे येत असून मोठ्या प्रमाणात निधीही गोळा केला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार डॉ. राकेश सिन्हा यांनीही बिहारमधील हुतात्मा जवानाच्या मुलीच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याही पुढे जाऊन सिन्हा यांनी त्या जवानाच्या गावात त्याच्या नावाने एक वाचनालय उभे करण्यासाठी २५ लाख रूपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे.
बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील ३५ वर्षीय सीआरपीएफ जवान इन्स्पेक्टर पिंटू सिंह हे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दि. १ मार्च रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. पिंटू सिंह यांचे गाव म्हणजे बेगुसराय जिल्ह्यातील ध्यानचक्की-बगरश (ता. बखरी) येथे पिंटू सिंह यांच्या स्मृत्यर्थ ‘शहीद पिंटू सिंह स्मृती पुस्तकालय’ उभारण्यात येणार आहे. यासाठी खा. डॉ. राकेश सिन्हा यांनी आपल्या खासदार निधीतून सुमारे २५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बेगुसरायच्या जिल्हा योजना अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली असून या वाचनालय निर्मितीच्या कामाची देखरेख करण्यासाठी ५ व्यक्तींच्या नावांची शिफारसही सिन्हा यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी अमरेश सिंह (पिंटू सिंह यांचे ज्येष्ठ बंधू) यांचेही नाव सुचवले आहे. सदर २५ लाख रुपयांच्या निधीतून सुमारे ५ लाख रूपये हे वाचनालयाच्या फर्निचर व संगणक इ. साठी खर्च करण्यात यावेत, असेही सिन्हा यांनी या पत्रात म्हटले आहे.
जवानाच्या मुलीच्या शिक्षणासाठी १ लाख
डॉ. सिन्हा यांनी हुतात्मा पिंटू सिंह यांची मुलगी आरोही हिच्या पुढील तीन वर्षांच्या शिक्षणासाठी १ लाख रूपयांचा निधी दिला असून याचा धनादेशही त्यांनी पिंटू सिंह यांच्या कुटुंबियांना पाठवला आहे. आरोही सिंह ही सध्या नर्सरी कक्षेत शिकत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat