विचार कधी ‘स्मार्ट’ होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2019   
Total Views |


दिवसेंदिवस नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता महापालिका आयुक्तांसह ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट रोड’चे रखडलेले काम पाहता ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी संबंधित ठेकेदारांला पाठीशी घालत आहेत काय, असा संशय आता नागरिक आणि परिसरातील व्यावसायिक व्यक्त करत आहेत.



केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतातील विविध शहरे ही विकासाच्या दिशेने अधिक गतिमान व्हावीत
, यासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजना देशभर राबविली जात आहे. त्यात नाशिक शहराचादेखील समावेश करण्यात आला आहे. मात्र, शहर जरी ‘स्मार्ट’ होत असले तरी, या कामांबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांचे विचार कधी ‘स्मार्ट’ होणार हा प्रश्न नाशिककरांना सतावताना दिसतो.



त्याचे कारणदेखील तसेच आहे
. मेहेर सिग्नल ते त्र्यंबक रोड या अवघ्या दीड किमी ‘स्मार्ट’ रस्त्याचे काम गेले एक ते दीड वर्षांपासून सुरू आहे. काही भागात रस्ता बनविला गेला आहे. मात्र, ‘स्मार्ट’ कंपनीने तो नुकताच बनविलेला रस्तादेखील आता खोदला आहे. तांत्रिक कामासाठी रस्ता खोदण्यात आल्याचे सांगण्यात येत असून साधारणत: २ महिन्यांपूर्वीच बनविलेला रस्ता खोदताना हे तथाकथित तांत्रिक काम तेव्हा का करण्यात आले नाही, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. या रस्त्याच्या कामामुळे मागील दोन वर्षांपासून दुकानदारांसह नागरिकांनादेखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना मात्र पुन्हा पूर्ण झालेल्या ‘स्मार्ट’ रोडवर खोदकाम झाल्याने पैशांची उधळपट्टी होण्याबरोबरच या रस्त्यांच्या कामालादेखील विलंब होत आहे. भोंगळ कारभारामुळे ‘स्मार्ट’ नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.



या रस्त्यांच्या कामामुळे येथे रोजच वाहतूककोंडीची समस्या डोके वर काढत आहे
. दिवाळीतदेखील रस्ता खोदलेलाच असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला. ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली अशाप्रकारे पैशांची उधळपट्टी केली जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता महापालिका आयुक्तांसह ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्‍यांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट रोड’चे रखडलेले काम पाहता ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी संबंधित ठेकेदारांला पाठीशी घालत आहेत काय, असा संशय आता नागरिक आणि परिसरातील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट’ काम करताना त्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी यातही ‘स्मार्ट’ विवेक आपण कधी दाखविणार, हाच खरा प्रश्न आहे.



आकर्षण की देशभक्ती
?



भारताची वाढलेली लोकसंख्या आणि युवकांची मोठी संख्या हे देशाचे भांडवल समजले जाते
. मात्र, देशातील युवकांच्या हाताला रोजगार मिळत नसेल तर, हे भांडवल बुडीत खात्यात निघण्याचा धोकादेखील संभवतो.आजच्या युवा पिढीत सरकारी नोकरीचे आकर्षण दिसून येत असते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. सध्या याची प्रचिती नाशिक शहरात दिसून येते. येथील देवळाली परिसरात तोफखाना भरतीसाठी युवकांची जत्रा भरल्याचे चित्र आढळले. या वेळी ६३ जागांसाठी जवळपास ३५ हजार युवकांनी गर्दी केली. त्यामुळे हे सर्व युवक देशभक्ती म्हणून सैन्यात भरती होऊ इच्छित आहेत की केवळ सरकारी नोकरीचे आकर्षण म्हणून सैन्यात भरती होत आहेत, हा प्रश्न सुज्ञांना सतावत आहे. यातील काही युवक हे खरोखरच एक इच्छा, आवड आणि कर्तबगारी दाखविण्याची संधी म्हणून सैन्यात दाखल होऊ इच्छितही असतील. मात्र, दोन आकडी संख्येच्या जागेसाठी पाच आकडी संख्येने युवकांनी हजेरी लावणे हे चित्र रोजगाराची भीषणता दाखविण्यासाठी पुरेसे बोलके आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.



आधी नमूद केल्याप्रमाणे सरकारी नोकरी म्हणजे बक्कळ पगार
, वारेमाप सुट्ट्या आणि कामाचे उत्तरदायित्व नसणे असा काही युवकांचा समज असतो, असे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते. त्यामुळेच सरकारी नोकरीला हे युवक प्राधान्य देत असतात. नोकरी मिळविण्यासाठी एकदाच कष्ट करायचे मग आयुष्यभर आराम, असेही काहींचे गणित. मात्र, सरकार हे जनतेचे आहे आणि आपण सरकारी नोकर म्हणजे जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून सेवाभाव मनी बाळगत नोकरी करणे देशहिताचे आहे, याचा विसर अनेक युवकांना पडतो. देवळाली परिसरात काही युवक या भावनेतून देखील आल्याची शक्यता नाकारता येत नाही. सैन्यासारख्या क्षेत्रात केवळ आकर्षण किंवा गरज म्हणून भरती न होता, देशसेवेसाठी हे कर्तव्य निभावणे आवश्यक आहे. आकर्षण क्षणिक असते, मात्र मनात उर्मी असेल तर ती चिरकाल टिकते, याचा विचारदेखील येथील काही युवकांनी करणे नक्कीच आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@