दिल्ली निवडणुकीमध्ये तपास यंत्रणांची उत्तम कामगिरी

    04-Feb-2025   
Total Views |
Delhi Elections

देशात दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून, उद्या यासाठी मतदान होणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. हा उत्सव नीट साजरा व्हावा यासाठी अनेक यंत्रणांनी कंबर कसली असून, त्यांनी निवडणूक काळामध्ये रेवडी वाटपांना चाप लावण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडले आहे.

दिल्ली विधानसभेसाठी उद्या, दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी रोकड, सोनेनाणे, मोफत गोष्टींची उधळण असे सर्व प्रकार होत आहेत. अशा प्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष असले, तरी त्या गोष्टींना पूर्णपणे पायबंद बसला आहे, असे म्हणता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकांनी, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांनी उद्याच्या निवडणुका खुल्या आणि मुक्त वातावरणात होण्यासाठी दक्षता घेतली असली, तरी गैरप्रकारांना पूर्ण पायबंद बसला आहे असे मात्र म्हणता येणार नाही. निवडणुकीच्या काळात दक्षता पथकांनी रोकड, मद्याच्या बाटल्या, अमली पदार्थ, सोनेनाणे, मोफत वस्तू इत्यादी २१८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेली ही कोट्यवधींची संपत्ती लक्षात घेता, यंत्रणांचा डोळा चुकवून मतदारांवर ‘रेवड्यां’ची किती उधळण केली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी! कितीही दक्षता बाळगली तरी मतदारांना खूश करण्यासाठी, अनेक गैरमार्गांचा वापर होत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. आचारसंहिता अमलात आल्यानंतर विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईमध्ये, ही मालमत्ता जप्त केली गेली.

दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानुसार, जी रोकड जप्त करण्यात आली, त्यामध्ये सुमारे ३८ कोटी, ६४ लाख रकमेचा समावेश आहे. २०२० साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जी रोकड जप्त करण्यात आली होती, त्याच्या २०२ पट रक्कम यावेळी जप्त करण्यात आली. तसेच, सुमारे ८८ कोटींचे अमली पदार्थ, सुमारे ८० कोटींचे सोने, सुमारे चार कोटींचे मद्य आणि सुमारे साडे पाच कोटी रुपयांच्या ‘रेवडी’ स्वरूपात वाटण्यात येणार्‍या भेटवस्तूंचा समावेश आहे. या सर्व प्रकरणी निवडणूक काळात २ हजार, ७०३ गुन्हे नोंदविण्यात आले. मागील निवडणुकीच्या काळात, अशा प्रकारचे २ हजार, ०६७ गुन्हे नोंदविण्यात आले होते. निवडणुका मुक्त वातावरणात व्हाव्यात म्हणून, दिल्ली पोलिसांनी एका सराईत गुंडास अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुले, १२५ जिवंत काडतुसे, तीन मॅगेझिन जप्त करण्यात आली. तसेच दिल्ली पोलिसांनी, दोन स्वयंचलित पिस्तुले, एके-४७ रायफलसाठी आणि अन्य बंदुकांसाठी वापरण्यात येणारी काडतुसे जप्त केली.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी, उद्या, दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे आणि दि. ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करून, भाजप सत्तेवर येणार का? इकडे सर्वांचे लक्ष आहे. या निवडणुकीत ‘इंडी’ आघाडीचा पुरता बोजवारा उडाला असल्याने, ती आघाडी प्रभावहीन आहे. पाहूया येत्या शनिवारी काय निकाल लागतो ते!
महाकुंभ : राजदूतांनी मानले आभार!

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ सालच्या निमित्ताने, तेथील त्रिवेणी संगमात स्नान करण्याची पर्वणी आतापर्यंत ३५ कोटींहून अधिक भाविकांनी साधली आहे. या महाकुंभ मेळ्याचे हिंदू समाजाप्रमाणेच अन्य देशातील लोकांनाही आकर्षण आहे. महाकुंभमेळा आणि त्या मेळ्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात आणून देण्याच्या हेतूने, परराष्ट्र खाते आणि उत्तर प्रदेश सरकारने भारतातील विविध देशांच्या राजदूतांना प्रयागराज येथे निमंत्रित केले होते. भारताची ही महान सांस्कृतिक परंपरा पाहून, अनेक राजदूत आश्चर्यचकित झाले. या महाकुंभ मेळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घडविल्याबद्दल अनेक राजदूतांनी, परराष्ट्र खात्याचे आभार मानले आहेत. या महाकुंभ मेळ्यास विविध दूतावासांचे प्रमुख, त्यांच्या सहचारिणी आणि राजदूत अशा ११८ जणांच्या शिष्टमंडळास, प्रयागराजला निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये ७७ देशांचे प्रतिनिधी होते. इस्टोनियाच्या भारतातील राजदूत मार्जे लुप यांनी, ”हा महाकुंभ मेळा भारतासाठी आणि आम्हां सर्वांसाठीच अत्यंत उत्कंठावर्धक आणि महत्त्वाची घटना आहे, अशा घटना नेहमी घडत नसतात. आमच्या इस्टोनियातील ७० लोक या महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत. या महाकुंभ मेळ्यास भेट देण्याची संधी आम्हांस दिल्याबद्दल, आम्ही परराष्ट्र खात्याचे उपकृत आहोत”, असे म्हटले आहे. तर नेपाळचे भारतातील राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी, हा एक अत्यंत पवित्र योग असल्याचे म्हटले आहे. महाकुंभ स्नानाची पर्वणी साधणार्‍या कोट्यवधी लोकांमध्ये सहभागी होण्याची महान संधी मला मिळाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भारत आणि नेपाळमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. “हा केवळ भारतातील धार्मिक उत्सव नाही, तर नेपाळ आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक, धार्मिक संबंधांचा एक भागही आहे,” असेही शर्मा यांनी म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त अनिल सुकलाल यांनी, “महाकुंभ म्हणजे आयुष्यात एकदा घ्यायचा एकमात्र अनुभव आहे,” असे म्हटले आहे. महाकुंभ यात्रा आयोजित केल्याबद्दल त्यांनी, परराष्ट्र खात्याचे आभार मानले. १४४ वर्षांमध्ये एकदाच येणार्‍या महाकुंभ मेळ्यात सहभागी होऊन आम्ही पावन झालो, असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. लिथुयानिया, जपान, मेक्सिको या देशांच्या राजदूतांनीही, अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने विदेशी राजनैतिक अधिकार्‍यांना भारताच्या महान संस्कृती परंपरेचे दर्शन घडवून ,एक चांगले पाऊल उचलले असे यानिमित्ताने म्हणता येईल.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.