गायत्री मंत्र : आदि शंकराचार्य भाष्य

    27-Feb-2025
Total Views | 115

gayatri mantra bhashya by adi shankaracharya 
 
 
भारतीय संस्कृतीमध्ये सूर्य उपासनेचे महत्त्व फार आहे. सूर्याच्या शक्तीरुपाची उपासना म्हणजेच गायत्री उपासना होय. ही गायत्री उपासना दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकानेच योग्य पद्धतीने केली पाहिजे. गायत्रीची उपासना ही एकप्रकारे केली जाणारी निसर्गाचीच उपासना आहे. त्यामुळेच या मंत्राचा सखोल अर्थ आचार्य शंकराचार्य यांनी विशद केला आहे. त्याचा घेतलेला हा मागोवा...
 
गायत्री मंत्र ऋग्वेदातील आहे. गायत्री मंत्र हा पंचप्राणांचे पोषण करतो. मनःशांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी, गायत्री मंत्राचे नित्य पठण अत्यावश्यक आहे. गायत्री हे सवितृ गायत्री, अर्थात सूर्याचे शक्तिरूप आहे. तिचे मूर्त स्वरूप म्हणजे पंचमुखी देवता, जी पंचप्राणांचे प्रतीक आहे. पंचप्राणांचे पोषण सूर्य करतो, असे मानले जाते. पंचप्राण म्हणजे, देहाला कार्यक्षम ठेवणारे पाच वायू-अपान, समान, प्राण, उदान, व्यान. तिचे दशनेत्र, अष्टदिशांवर लक्ष ठेवून असतात. तिच्या दशहातांमध्ये तिने शिव, विष्णू आणि ब्रह्माची शस्त्रे धारण केली आहेत. एका हातात पुस्तक आहे, कारण तिला विद्यास्वरूपसुद्धा समजले जाते आणि तिचे वाहन राजहंस आहे.
 
संपूर्ण गायत्री मंत्र.
 
ऊँ तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ऊँ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महः ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम्।
ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम्।
 
गायत्री महामंत्र विस्तृत अर्थ :
 
गायत्री मंत्राचे तीन भाग असतात. प्रणव, व्याहृति आणि गायत्री. प्रणवातून व्याहृति प्रकट होते आणि व्याहृतिमधून गायत्री प्रकट होते आणि गायत्रीमधून वेद प्रकट झाले आहेत.
 
प्रणव आदि सात व्याहृति आणि शिरोमंत्र मिळून, संपूर्ण गायत्री मंत्राला सर्व वेदांचे सार समजले जाते. गायत्री उपासना ही प्राणायामासह केली पाहिजे. व्यवहारात मात्र नित्य उपासना करताना, प्रणव आणि तीन व्याहृति यांचेच उच्चारण केले जाते. प्रणव म्हणजे ॐकार, हा परब्रह्माचे अक्षरस्वरूप आहे. म्हणून, याला ‘अक्षरब्रह्म’ किंवा ‘शब्दब्रह्म’ असे संबोधतात.
 
भुः-भूलोक
भुवः-भुव लोक
स्वः-स्वर्ग लोक
 
प्रणव आणि या तीन व्याहृति यांच्या उच्चारणाचा अर्थ हा की, परब्रह्म हे भूलोक, भुव लोक आणि स्वर्ग लोक या तिन्हींना व्यापून आहे.
 
या ठिकाणी जरी तीन व्याहृतींचा उल्लेख केला असला, तरी एकूण व्याहृति सात आहेत. हे सात ऊर्ध्व लोक समजले जातात आणि याच्याच उलट अधः किंवा खाली, सप्त पाताल लोक समजले जातात. एकूण 14 लोकांचे संपूर्ण ब्रह्मांड आहे, असे मानले जाते.
गायत्री मंत्रात ऊर्ध्व लोकातील सप्त लोकांचा उल्लेख, व्याहृति म्हणून केला गेला आहे. या सप्त लोकांना, चेतनेच्या उर्ध्वगामी सात अवस्था असे मानले जाते.
 
भुः-पृथ्वी किंवा भौतिक स्वरूप
भुवः-आकाश किंवा अंतराळ
स्वः-स्वर्ग किंवा सूक्ष्म स्वरूप
मः-म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म अवस्था
जनः-उत्पत्ती स्थान, दैहिक अवस्थेच्या पलीकडे
तपः-तपस्वी लोक, अर्थात ज्यांनी दैहिक अवस्था पार करून चैतन्य रूप झाले आहेत
सत्य-अर्थात ब्रह्मस्थान, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही.
 
या लोकांना, अर्थात चेतनेच्या उर्ध्वगामी सात अवस्थांना, आपण तीन प्रकारे समजून घेऊ शकतो. विश्व उत्पत्तीवेळी निर्माण झालेला, अनाहत नाद म्हणजे प्रणव आहे आणि त्यापुढील सप्त अवस्थांतून संपूर्ण विश्व आकाराला आले. दुसरा अर्थ म्हणजे, निर्माण झालेल्या विश्वाची स्थिती, अवस्था आणि त्यातून विस्तार पावणारे लोक, यांचे हे विवेचन आहे. व्यक्तिगत पातळीवर पाहिले असता, देहाला धारण केलेल्या आत्म्याच्या चैतन्य रूपाच्या या सात उर्ध्वगामी अवस्था आहेत. थोडक्यात, प्रणव आणि व्याहृति हे सृष्टी अवस्थेत ब्रह्मांड कसे निर्माण झाले, याचे विवेचन आहे. निर्माण झालेल्या ब्रह्मांडाचे, परब्रह्म तत्त्वासह संपूर्ण चराचर सृष्टीचे वर्णन आहे. त्याचवेळी ते जीवात्मा पातळीवर, त्या अंशात्मक ब्रह्मतत्त्वाच्या सुप्त चेतनाअवस्थेचे वर्णन आहे. अशा प्रकारे गायत्री मंत्र विवेचनात पिंडी ते ब्रह्मांडी सिद्धांत सिद्ध होतो.
 
गायत्री मंत्र अध्यात्मिक अर्थ :
 
तत हे भर्गाचे विशेषण आहे. भर्ग अर्थात परब्रह्म. परब्रह्म तत्त्व आमच्या बुद्धीला प्रेरित करते. सवितादेवाचे जे भर्ग आहे. त्याचे आम्ही ध्यान करत आहोत.
 
आधिदैविक अर्थ :
 
जो आमच्या बुद्धिगत कर्मांना प्रेरित करतो, तसेच समस्त विश्वाची निर्मिती आणि पोषण करतो, तो सवितादेव हा प्रकाशमान सूर्य आहे आणि तो सर्वांना दृश्य आहे. त्याचा प्रकाश सर्वांना तेज प्रदान करणारा, पापांना जाळून टाकणारा आहे. त्या सूर्याचे आम्ही त्याचे ध्यान करतो आणि मनापासून त्याला धारण करतो.
 
आधिभौतिक अर्थ :
 
भर्ग म्हणजे अन्न. सवितादेव अर्थात सूर्य जो आमच्या बुद्धीला प्रेरित करतो, तो जे अन्न आणि अन्नस्वरूप फळे निर्माण करतो, ज्यामुळे आमचे पोषण होते. म्हणून त्याला आम्ही धारण करतो अर्थात त्याची आम्ही उपासना करतो.
 
शुद्ध गायत्री जप :
 
ऊँ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्॥
 
ऊँ-प्रणव, विश्वातील अनाहत नाद शब्दब्रह्म.
भुः-ईश्वर हा सनातन आहे आणि तो आत्मस्वरूप आहे.
भुवः-ईश्वर हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही रूपाने प्रकट होतो.
स्वः-ईश्वराचे स्वरूप स्वयंभू आणि सच्चिदानंद आहे.
ऊँ तत्-सनातन स्वरूपातील ईश्वर
सवितुः-सूर्य हा प्रकाशाचे मूर्त स्वरूप आहे.
वरेण्यं-सूर्याच्या या प्रकाशमान ईश्वरी रूपाची स्तुती, अन्य सर्व देवांनी केली आहे.
भर्गो-असा प्रकाश जो ज्ञान, आनंद आणि अव्याहत चलित राहणारे जीवनचक्र प्रदान करतो.
देवस्य-सूर्याचा हा तेजस्वी प्रकाश
धीमहि-आम्ही ज्याचे ध्यान करतो
धियो-तो आमच्या बुद्धीला
यो नः - ईश्वरी प्रेरणेने
प्रचोदयात-मोक्षाच्या दिशेने प्रेरित करो.
 
आदि शंकराचार्य विरचित गायत्री मंत्राचे हे विवेचन, सूर्याचे शक्तीचे स्वरूप जाणून घेण्यास अत्यंत साहाय्यभूत होते. गायत्री मंत्र हा सूर्याला ‘पुरुष देव’ संबोधून उपासना न करता, सवितृ गायत्री अर्थात सूर्याच्या शक्तिरूपाला उपास्य म्हणून प्रस्तुत करत आहे आणि सूर्याच्या या शक्तिरुपाला वेदांचा जनक मानले जाते. आपल्या संस्कृतीमधील शक्ती तत्त्वाच्या मुख्य प्रेरणेचा स्रोत म्हणून, याकडे पाहिले पाहिजे. स्त्री तत्त्वाची, अर्थात शक्ती तत्त्वाची उपासना, हा सनातन भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. दुर्दैवाने आपण हे सत्यच नजरेआड करत आहोत. आपल्या सर्व प्रापंचिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांचे मूळ इथेच आहे. या मुळावर घाव घालून पुनश्च प्राचीन वैभवाला प्राप्त व्हायचे असेल, तर गायत्री मंत्राच्या या गुह्य अर्थाला जाणून, त्या विचाराने या मंत्राची उपासना करणे अत्यावश्यक आहे. गायत्री मंत्र हा नित्य उपासनेत अत्यंत आवश्यक आहे. त्याचे पहिले कारण म्हणजे, सूर्याशिवाय आपण पृथ्वीवर मानवासह संपूर्ण जीवसृष्टीची कल्पनाच करू शकत नाही. अर्थात, आपल्या संपूर्ण अस्तित्वाचे कारण तो आहे आणि म्हणूनच तो उपास्य आहे.
 
गायत्री मंत्र हा ‘जीव ब्रह्म ऐक्य’ यावर अत्यंत मोजक्या शब्दांत भाष्य करतो. या विचाराचे नित्य चिंतन करणे आवश्यक आहे, हे चिंतन अन्य गौण उपासना करण्यापासून आणि द्वैतात हरवून जाण्यापासून, परावृत्त करू शकते. गायत्री मंत्र हा आत्म्याच्या चेतना अवस्थांशी निगडित आहे. त्यामुळे गायत्री मंत्राचे नित्य पठण, हे आपल्या आत्म्याची ऊर्ध्वगामी प्रगती घडवते. याचे फळ म्हणून, आपले लौकिक आणि पारलौकिक जीवन समृद्ध आणि तृप्त होऊ शकते.
 
या मंत्राच्या विवेचनात सांगितल्याप्रमाणे, गायत्री मंत्र हा अन्नरूपाने आपल्या देहाचे, चंद्ररूपाने आपल्या अन्तःकरण चतुष्टयाचे, पंचप्राणरूपाने आपल्या आत्म्याचे पोषण करतो आणि आपल्याला सर्वार्थाने अधिक उन्नत, सक्षम आणि परिपूर्ण मानव बनवतो.
गायत्री मंत्र हा सनातन धर्मातील सर्वाधिक ज्ञात, प्रचलित आणि सर्वाधिक नित्य उच्चारण केला जाणारा मंत्र आहे. गायत्री मंत्रच केवळ प्रमाण आहे, हा विश्वास ठेवून याची उपासना करणारा एक खूप मोठा संप्रदाय आपल्या देशात आहे. वास्तवात सवितृ गायत्री उपासना ही एका अर्थाने सूर्याची उपासना किंवा निसर्गाची उपासना आहे. निसर्गउपासक, निसर्गपूजक आणि निसर्गनियमांनी बद्ध राहून, संपूर्ण जीवन व्यतीत करणारे मोठे लोकसमूह आपल्या भारतभूमीवर आजही आपल्याला दिसून येतात. गायत्री मंत्राची उपासना, ही आपल्या नित्य उपासना पद्धतीचा एक अविभाज्य भाग आहे.
 
 
 
 
 
 
 
सुजीत भोगले
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘हिरवांकुर फाऊंडेशन’

प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘हिरवांकुर फाऊंडेशन’

संपूर्ण विश्वात प्राणवायू हा फक्त आणि फक्त वृक्षच निर्माण करतात आणि म्हणून आपण त्याचे महत्त्व जाणले पाहिजे. हे महत्त्व जाणण्यासाठी आणि दुसर्‍यांना सांगण्यासाठी निलयबाबू शाह जैन यांनी ‘हिरवांकुर फाऊंडेशन’ची स्थापना केली. प्रथमतः त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांनी या कार्यात सामील केले. त्यानंतर या कार्याचे महत्त्व त्यांनी मित्र, नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून दिले. पाहता पाहता ‘हिरवांकुर’च्या छताखाली उभी राहिली पर्यावरणप्रेमींची एक सुंदर, मजबूत व भव्य साखळी. या लेखाद्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121