चाहूल श्रावणाची; फुलबाजार बहरला

    16-Jul-2025
Total Views |

नाशिक
: श्रावण मास काळात सण आणि व्रत वैकल्य मोठ्या प्रमाणावर केले जातात. असा हा श्रावण अगदी जवळ आल्याने विविध प्रकारच्या फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे. श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलबाजार गजबजण्यास सुरुवात झाली आहे. या संपूर्ण ३० दिवसांसाठी फुले उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. या काळात सजावट व पुजेसाठी फुलांची खरेदी केली जाते. मात्र, यंदा फुलबाजारावर अवकाळी पावसाची छटा असल्याने मागील दहा ते १५ दिवसांपासूनच सर्वच फुलांचे दर चांगलेच वाढल्याचे दिसून येत आहे. फुलांच्या दरामध्ये जवळपास ७० ते ८० टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

श्रावण महिन्यापासून सुरू होणारे सणवार कमी अधिक प्रमाणात डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू राहतात. तसेच, चातुर्मासात अनेक मुहूर्त असल्याने नवीन वस्तू किंवा कार्याला प्रारंभ केला जातो. त्यामुळे फुलांच्या मागणीत दुपटीने वाढ होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजारात गुलाब, मोगरा, पिवळा चाफा, शेवंती, झेंडू, कमळ, जरबेरा, निशिगंधा, अस्टर तसेच, धोतर्‍याची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत.

विशेषकरून निफाड आणि दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फुलशेती केली जाते. येथून नाशिक जिल्ह्यातील विविध बाजारात फुले विक्रीसाठी आणली जातात. मात्र, मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हाभर पाऊस पडत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊन शेतातच फुले कोमेजली. परिणामी दर्जेदार व कोरड्या फुलांची बाजारातील आवक सुरुवातीपासूनच घटली. त्यामुळे श्रावणाच्या सुरुवातीपासूनच चढ्या दराने फुले खरेदी करावी लागणार आहे. सध्या बाजारातून मोगरा गायब झाला असून इतर फुलांच्या दरातही ७० ते ८० टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी ५० रुपये डझन असलेला गुलाब ८० रुपयांवर गेला आहे. हे दर अजून वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देवाच्या पुजेसाठी चांगली आणि टवटवीत फुले वापरावी लागतात. त्यामुळे चांगली फुले खरेदी केली जातात. मात्र, सध्या अशी फुले बाजारात दिसत नाहीत. नाइलाजाने जास्त दराने फुलांची खरेदी करावी लागत आहे.
- उज्ज्वला बैसाने, ग्राहक