नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला लवकरच सुरुवात होणार असून ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार ७४ गट, तर १४८ गण निश्चित करण्यात आले आहेत. हा आराखडा जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालये, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या कार्यालयात नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. तसेच, शहरीकरण झाल्याने काही तालुक्यांमध्ये गट आणि गणांच्या रचनेमध्ये बदल झाले असून गणांची संख्याही कमी अधिक झाली आहे.
मागील २०१७ सालामधील निवडणुकीच्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी एक गट वाढला असून ही संख्या ७३ वरून ७४ करण्यात आली असून गणही १४८ झाले आहेत. घोषित करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यात काही त्रुटी असल्यास त्यावर हरकती व सूचना सादर करण्याची शेवटची तारीख सोमवार, दि. २१ जुलै रोजीपर्यंत राहणार आहे. त्यानंतर सोमवार, दि. २८ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांकडून विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तर दि. ११ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी, तर दि. १८ ऑगस्ट रोजी अंतिम रचनेचे आयोगाकडे सादरीकरण करण्यात येणार आहे.