मोदींची मॉस्को भेट भारताच्या हिताची

    09-Jul-2024   
Total Views |
pm narendra modi russia tour


युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाचा निषेध केला नसला, तरी रशियाला पाठिंबाही दिला नाही. त्यामुळे रशियाच्या मनातील भारताबद्दलची अढी दूर करताना, चीनला दोन्ही देशांतील मैत्री पक्की आहे, असा संदेश देणे आवश्यक होते. या दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मॉस्कोच्या विमानतळावर लाल गालिचा अंथरून आणि लष्करी मानवंदना देऊन झालेले स्वागत, मोदी आणि पुतीन यांच्यातील गळाभेट तसेच पुतीन यांच्या निवासस्थानी त्यांची आणि मोदींची झालेल्या गप्पा या दृश्यांतून तो संदेश दिला गेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रशिया दौर्‍याकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. दि. 3-4 जुलै दरम्यान कझाकस्तानमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन उपस्थित होते. पण, संसदेचे अधिवेशन असल्याने नरेंद्र मोदींनी तिथे जाणे टाळले आणि आपल्याऐवजी परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाचारण केले. दि. 9-10 जुलै दरम्यान ‘नाटो’च्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने वॉशिंग्टन येथे सदस्य देशांची परिषद पार पडत आहे. मोदींनी दि. 8-9 जुलै दरम्यान ‘नाटो’च्या सर्वात मोठ्या विरोधक असलेल्या रशियाला जाऊन अनेक संदेश दिले. मोदींच्या दौर्‍यात औपचारिकता नव्हती. व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचे आपल्या देशात ज्या प्रकारे आदरातिथ्य केले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जी स्तुतिसुमने उधळली, ते पाहता भारताच्या दृष्टीने रशियाचे महत्त्व स्पष्ट होते.

भारत आणि रशियातील संबंधांना दोन्ही देशांनी विशेष आणि सन्माननीय भागीदारीचा म्हणजे सर्वोच्च दर्जा दिला आहे. त्याअंतर्गत भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष दरवर्षी एकमेकांना भेटतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा 21 बैठका झाल्या आहेत. शेवटची बैठक डिसेंबर 2021 मध्ये भारतात पार पडली. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून नरेंद्र मोदींनी रशियाचा दौरा केला नव्हता. गेल्या अडीच वर्षांमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वगळता कोणत्याही महत्त्वाच्या जागतिक नेत्याने रशियाला भेट देणे टाळले होते.

दौर्‍याच्या पहिल्या दिवशी त्यांनी व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत रात्रीचे जेवण घेत असताना दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा केली. दि. 9 जुलै रोजी मोदींनी रशियातील भारतीय नागरिकांशीही संवाद साधला; हुतात्मा सैनिकांच्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली आणि रोसाटोम पॅवेलियनला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसर्‍या कार्यकाळातील हा पहिला द्विपक्षीय दौरा होता. आतापर्यंत मोदींनी पहिल्या द्विपक्षीय परदेश दौर्‍यासाठी शेजारी देशांची निवड केली होती.

मोदींच्या रशिया दौर्‍यात राष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जा सुरक्षा हे चर्चेचे प्रमुख विषय होते. जून 2024 मध्ये भारताने 46.2 लाख बॅरल खनिज तेल आयात केले. त्यातील 19.7 लाख बॅरल तेल एकट्या रशियातून आयात केले. चीनची मागणी कमी झाल्याने भारताने रशियाचे तेल मोठ्या प्रमाणावर आयात केले. आज अमेरिका भारताचा संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भागीदार झाला असला, तरी आजही भारताची अर्ध्याहून अधिक शस्त्रास्त्रे रशियन बनावटीची आहेत. यामध्ये रणगाडे, लढाऊ विमाने आणि युद्धनौकांचा समावेश आहे. मोदींच्या दौर्‍यापूर्वी दोन आठवडे रशिया भारताशी संरक्षणाच्या व्यूहशास्त्रासंबंधी करार करू इच्छित आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली. असा करार करण्यासाठी भारत गेली अनेक वर्षं पाठपुरावा करत असला, तरी रशियाची त्यासाठी तयारी नव्हती. या कराराद्वारे रशिया आणि भारत रणगाडे, लढाऊ विमाने आणि युद्धनौकांना एकत्रित तैनात करू शकतील.

एरव्ही, पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यांबाबत एक प्रकारची पारदर्शकता असते. पण, मॉस्कोभेटीत मोदी आणि पुतीन यांच्यात नेमकी कशाबद्दल चर्चा झाली, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. असे म्हटले जाते की, युक्रेन युद्ध आता अनिर्णित अवस्थेकडे झुकले आहे. दोन्ही बाजूंनी हेकेखोर भूमिका घेतली आहे. रशिया युक्रेनचा ताब्यात घेतलेला भूभाग परत करायला तयार नाही, तर युक्रेन आणि पाश्चिमात्य देश भविष्यात युक्रेन ‘नाटो’चा सदस्य होणार नाही, याची हमी द्यायला तयार नाहीत. युरोपिय महासंघ, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्यातून नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांमध्ये काय होणार आहे, याचा अंदाज येतो.

आपल्या रशिया दौर्‍यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी 7’ परिषदेसाठी इटलीला गेले होते. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांची युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्कींशी भेट झाली. त्यानंतर पार पडलेल्या युक्रेन शांतता परिषदेत भारत सहभागी झाला असला, तरी त्यातील संयुक्त निवेदनावर भारताने स्वाक्षर्‍या केल्या नव्हत्या. मोदींच्या रशिया दौर्‍यापूर्वी अमेरिकेच्या संसद सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात येऊन दलाई लामांना भेटले. त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली. ही भेट चीनला आवडली नाही. त्याच आसपास अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलेवानही भारतात आले होते. मोदींच्या रशिया दौर्‍याच्या सुमारे आठवडाभरापूर्वी हंगेरीचे अध्यक्ष विक्टर ओब्रान यांनी रशियाला भेट दिली. या वर्षी हंगेरीकडे युरोपीय काऊंसिलचे फिरते अध्यक्षपद आहे. त्यानंतर ओब्रान यांनी चीनला जाऊन अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे मोदींच्या रशिया दौर्‍याला अमेरिकेचा विरोध नव्हता, अशी चर्चा आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशिया युक्रेनच्या युद्धासाठी जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध कडक निर्बंध लादल्याने रशिया आणि चीनमधील जवळीक सातत्याने वाढत आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमाप्रश्नावर चीनने आक्रमक भूमिका घेतल्याने सुमारे चार वर्षं दोन्ही देशांतील संबंध अत्यंत तणावाचे आहेत. चीनने भारतावर आक्रमण केले, तर होणार्‍या युद्धामध्ये रशियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. रशिया चीनवर अवलंबून असल्यामुळे भारत रशिया सहकार्याची माहिती चीनला न मिळणे तसेच पाकिस्तानला रशियन बनावटीची शस्त्रास्त्रं न मिळणे महत्त्वाचे आहे. युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियाचा निषेध केला नसला, तरी रशियाला पाठिंबाही दिला नाही.

त्यामुळे रशियाच्या मनातील भारताबद्दलची अढी दूर करताना, चीनला दोन्ही देशांतील मैत्री पक्की आहे, असा संदेश देणे आवश्यक होते. या दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मॉस्कोच्या विमानतळावर लाल गालिचा अंथरून आणि लष्करी मानवंदना देऊन झालेले स्वागत, मोदी आणि पुतीन यांच्यातील गळाभेट तसेच पुतीन यांच्या निवासस्थानी त्यांची आणि मोदींची झालेल्या गप्पा या दृश्यांतून तो संदेश दिला गेला. नरेंद्र मोदींनी रशियाच्या अणुऊर्जा कंपनी रोसाटोमच्या प्रदर्शनीला भेट दिली. रोसाटोमने भारतात सहा अणुऊर्जा केंद्र बांधण्यात रस असल्याचे घोषित केले. आर्क्टिक भागातील उत्तर समुद्राचा वापर करून रशियातून भारताला इंधनपुरवठा करण्याबाबतही चर्चा झाली. त्यात रशियाचे व्लाडिवोस्तॉक आणि भारतातील चेन्नई बंदर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. याशिवाय भारताने कझान आणि येकॅटरिनबर्ग येथे दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली.

मोदींच्या पुतीनसोबतच्या चर्चेत रशियाच्या सैन्यातील भारतीयांचा प्रश्नही मांडण्यात आला. गेल्या काही महिन्यांत असे समोर आले आहे की, रशियातील नोकरीचे आमिष दाखवून भारतातील अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. तिकडे गेल्यावर त्यांना रशियन सैन्यात लढण्यास सांगण्यात आले. नकार दिल्यास तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. पुतीन यांनी रशियाकडून लढणार्‍या सर्व भारतीयांना सैन्यातून मुक्त करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. या बहुप्रतिक्षित भेटीमुळे रशिया आणि भारतातील मैत्रीभावना वाढण्यास मदत होणार आहे.


अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.