शेतकर्‍यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स - शेतीतील नवक्रांती

    29-Jun-2025
Total Views | 14

रविवारच्या चर्चेला आज खास रंगत आली होती. जयंतराव, आदित्य, मंगल काकू आणि मित्रमंडळी एकत्र आले होते. यावेळी गणपत पाटील, जयंतरावांचे शालेय मित्र आणि जालना जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरीसुद्धा हजर होते. "आदित्य, तुमचं हे ‘एआय’ फार भारी वाटतं. पण आमच्यासारख्या शेतकर्‍यांसाठी ते काय कामाचं?” गणपत काकांनी विचारलं. "काका, ‘एआय’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ही तंत्रज्ञानाची अशी ताकद आहे, जी सल्लागारासारखी तुमच्या निर्णयांना बळ देते,” आदित्य म्हणाला.


शेतीतील प्रमुख समस्या आणि ‘एआय’चे उत्तर

शेतीमध्ये अनेक अडचणी असतात. हवामानबदल, बाजारातील चढउतार, रोग, कीड, पाण्याची कमतरता, मजुरांची अनुपलब्धता. अशा अनेक बाबतीत ‘एआय’ शेतकर्‍यांना मदत करू शकते. हे केवळ शहरात वापरायचं तंत्रज्ञान नाही, योग्य मार्गदर्शन आणि साधनं मिळाल्यास गावागावात ‘एआय’ पोहोचू शकते.

१) हवामानाचा अचूक अंदाज

‘एआय’चा वापर करून आता हवामान अंदाज अधिक अचूकपणे सांगता येतो. IBM weather company , Skymet आणि भारतीय हवामान खाते यांच्या ‘एआय’ प्रणाली पाऊस, तापमान, आर्द्रता याचा सात ते १५ दिवसांचा स्थानिक अंदाज देतात. या अचूक हवामानाचा अनेक प्रकारे उपयोग करता येतो. उदाहरणार्थ, फळबागांमध्ये फवारणी करायची असेल आणि पाऊस पडणार असेल, तर वेळेवर सल्ला मिळतो. यातून वेळ, पैसा आणि उत्पादन वाचवता येते.

२) रोग आणि किड नियंत्रण

Plantix आणि KrishiYan सारखे अ‍ॅप्स ‘एआय’चा वापर करून, झाडांवरील रोग ओळखतात. फक्त फोटो काढायचा; ‘एआय’ लगेच रोग सांगतो आणि कोणते औषध वापरायचे, हेही सूचवतो. यामुळे चुकीच्या औषधांवरचा खर्च वाचतो. आयाअयटी खरगपूरने भुईमुगाच्या पिकावरील रोग ओळखण्यासाठी ‘एआय’ मॉडेल तयार केलं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आता Plantix वापरून, डाळिंबावरचे बॅटेरिया वेळीच ओळखू शकतात.

३) बाजारभाव विश्लेषण

Agrostar,Gramophone, DeHaat  सारखी अ‍ॅप्स मागील वर्षांचे भाव, मागणीचा ट्रेंड आणि मार्केट डेटा पाहून शेतकर्‍यांना सल्ला देतात की, कोणता माल कधी, कुठे विकायचा. आता हेच उदाहरण पाहा सोलापूरच्या काही कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी ‘एआय’चा वापर करून, त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळवण्यासाठी दोन आठवडे थांबण्याचा निर्णय घेतला. त्यातून ३० टक्के अधिक नफा मिळाला.

४) ड्रोन, सॅटेलाइट आणि ‘एआय’

Grauda Aerospace  (चेन्नई) आणि IoTechworld (हरियाणा) हे भारतीय स्टार्टअप्स शेतीसाठी ‘एआय’ ड्रोन तयार करतात. शेतामधून हवेतून ड्रोन फिरवले जाते. ड्रोन ‘एआय’ वापरून शेतात फिरत ओलावा, कीड किंवा वाढीचा मागोवा घेतात. हे ड्रोन ‘एआय’ वापरून औषध फवारणी अचूकपणे करण्यात मदत करतात.२०२३ मध्ये केंद्र सरकारने ‘ड्रोन दीदी’ योजनेत, १५ हजार महिलांना ड्रोन वापरासाठी प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

५) पाण्याचे अचूक व्यवस्थापन

शेतीला अपुरा पाणीपुरवठा ही भारतीय शेतकर्‍यांसमोरील एक नेहमीची समस्या. पाणीपुरवठ्याचे अचूक नियोजन हे आपल्या शेतकर्‍यांचे एक स्वप्नच असते. Fasal, Cropin आणि BharatAgro सारखी स्टार्टअप्स जमिनीतील ओलावा, वातावरण आणि पिकाचे प्रकार लक्षात घेऊन किती पाणी आणि केव्हा द्यायचं, हे सांगतात. उदाहरणार्थ, विदर्भातील एक शेतकरी जर रोज संत्र्याच्या बागेला पाणी देत असेल, तर ‘एआय’ आधारित सल्ला मिळाल्यावर ३० टक्के पाणी आणि २५ टक्के वीज वाचवू शकतो.

६) खत आणि बियाण्यांचे नियोजन

‘एआय’ मातीचा नमुना, पूर्वीचा पीक इतिहास आणि हवामानाचा अंदाज वापरून, कोणते खत आणि किती द्यावे हे सांगू शकतो. या सल्ल्याने जमीन सुधारते आणि उत्पादन वाढते. DeHaat  आणि Gramophone या अ‍ॅप्सद्वारे बियाण्यांच्या गुणवत्तेची माहिती, रोग प्रतिकारशक्ती आणि बाजारात मागणी यावर आधारित सल्ला मिळतो.

"अरे वा! म्हणजे भारतीय शेतकरी ‘एआय’ वापरून शेती करण्यात बाजी मारतोय तर!” गणपतराव म्हणाले. केवळ भारतीय
शेतकरीच नाही, तर जगभरात ‘एआय’ आधारित शेतीच्या बाबतीत नवनवीन प्रयोग चालले आहेत. आदित्य सांगू लागला.

१) आंतरराष्ट्रीय उदाहरणे

इस्रायलमध्ये ‘एआय’ आधारित ठिबक सिंचन प्रणाली वापरून, शेतात प्रत्येक रोपाला गरजेप्रमाणे पाणी दिलं जातं. त्यासाठी ’CropX’सारखं ‘एआय’ मॉडेल वापरलं जातं.
नेदरलॅण्डमध्ये ग्रीनहाऊस शेतीसाठी ‘एआय’ आधारित सेन्सर्स वातावरण, CO2 आणि प्रकाश यांचे निरीक्षण करून पीकवाढीचे अचूक नियोजन करतात.
अमेरिकेत ‘ब्लु रिव्हर टेनोलॉजी’ ही कंपनी ‘एआय’ वापरून पिकांच्या संरक्षणार्थ रोबोट तयार करते, जे कीटकनाशक फक्त गरजेच्या ठिकाणीच फवारतात.

२) सरकारी योजना आणि धोरणांमध्ये ‘एआय’चा उपयोग

‘एआय’ केवळ शेतीसाठी वापरला जात नाही, तर कृषी विभाग, बँका आणि योजनांमध्येही तो महत्त्वाचा ठरत आहे. उदाहरणार्थ, ‘पीएम किसान योजने’तील लाभार्थी तपासणीसाठी ‘एआय’ आधारित प्रणालीची चाचणी घेतली जात आहे.
तसेच, ‘पीएम फसल बीमा योजने’अंतर्गत काही राज्यांमध्ये पीक नुकसान ओळखण्यासाठी, ड्रोन आणि ‘एआय’ आधारित इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामुळे नुकसान भरपाईसाठी अर्ज तपासण्याचा वेळ आणि त्रुटी कमी होतात.

३) ‘एआय’ चा डेटा आधारित शेतीकडे कल

‘एआय’ शेतकर्‍यांना डेटा आधारित शेतीकडे घेऊन जात आहे. म्हणजेच फक्त अनुभवावर आधारित निर्णय न घेता, मोजमाप, निरीक्षण आणि विश्लेषणाच्या आधारे पीक, वेळ, औषध, खत यांचे नियोजन करता येते.

महाराष्ट्रातील बारामती परिसरातील काही सहकारी संस्थांनी कृषी IoT सेन्सर, ‘एआय’ सॉफ्टवेअर आणि डेटा अ‍ॅनालिटिसच्या मदतीने, उसासाठी ‘वॉटर युझ प्लॅन’ तयार केला आहे. या पद्धतीमुळे उत्पादनात २० टक्के वाढ झाली आहे.
खूपच छान. पण ही ‘एआय’ आधारित कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी, शहरातूनच लोक आणावे लागतील ना? गावाकडच्या लोकांना त्यात काम करता येईल का? गणपतरावांनी आपली शंका विचारली.

४) ‘एआय’ चा ग्रामीण रोजगारात भर

‘एआय’ सल्लागार, ड्रोन ऑपरेटर, डाटा संकलक, शेतमाल विश्लेषक यांसारख्या अनेक नवीन भूमिका ग्रामीण भागात निर्माण होत आहेत. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर रोजगाराचंही साधन ठरत आहे.
विदर्भात ‘कृषी मित्र’ उपक्रमांतर्गत तरुणांना ‘एआय’ अ‍ॅप्स वापरून शेतकर्‍यांना मदत करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या माध्यमातून त्यांना मानधन मिळते आणि शेतकर्‍यांनाही मार्गदर्शन मिळते. ‘एआय’मुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती नक्कीच होऊ शकेल.

‘एआय’मुळे शेतकरी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो. जोखीम कमी करता येते आणि उत्पन्नातही वाढ होते. ही केवळ शहरी गोष्ट न राहता, गावागावांत पोहोचणारी खरी नवक्रांती आहे.
‘एआय’मुळे केवळ तंत्रज्ञान नव्हे, तर विचारांची पद्धत बदलते आहे. आजचा शेतकरी स्मार्टफोन वापरतो, इंटरनेटवर माहिती घेतो आणि आता ‘एआय’चा वापरही करू लागला आहे.
या क्रांतीला खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी सरकार, तंत्रज्ञान कंपन्या, कृषी विद्यापीठे आणि स्थानिक संस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जेव्हा ‘एआय’ हा प्रत्येक शेतकर्‍याचा आधार बनेल, तेव्हाच खरी ’डिजिटल कृषी क्रांती’ घडेल.
गणपतरावांच्या डोळ्यांत २१व्या शतकातील समृद्ध शेती आणि आनंदी बळीराजाचे चित्र तरळत होते आणि गावाकडे जाऊन लगेच आपल्या शेतकरी मित्रांना ‘एआय’ बद्दल सांगण्याचे त्यांनी ठरवले.

डॉ. कुलदीप देशपांडे
९९२३४०२००१

( लेखक हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अ‍ॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्‍या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121