अष्टपैलू श्रेयस

    22-Jul-2024
Total Views | 31
shreyas vaidya


एक कलाकार म्हणून कलेप्रति स्वतःला वाहून घेत, रसिकजनांची सेवा हाच खरा आनंद मानणार्‍या श्रेयस वैद्य यांच्याविषयी...

कलाकाराचे आयुष्य हे खरेतर सगळ्यांच्याच कुतुहलाचा विषय.कलाकाराच्या आयुष्यात त्याने घेतलेली मेहनत, सोसलेला त्रास याविषयी सगळ्यांनाच कुतुहल असते. मात्र, कलाकार हा कायमच कलेच्या साधनेत मग्न असतो. कलाकार होण्यासाठी लहानपणापासूनच कलेचे संस्कार असावे लागतात असे नाही. तर कामाविषयी असलेला प्रामाणिकपणाच तुम्हाला समृद्धतेचा अनुभव देत असतो. असाच एक कलाकार म्हणजे श्रेयस वैद्य होय. कळव्यातील एका सामान्य मराठी कुटुंबात श्रेयस वैद्य यांचा जन्म झाला. घरात वडील कमावणारे आणि आई गृहिणी अशा ‘संस्कार हीच संपत्ती’ मानणार्‍या कुटुंबात श्रेयस यांची जडणघडण होत होती.

श्रेयस यांचे प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातील शाळेतच झाले. पण दहावीपर्यंत कलाक्षेत्रात काही करावे, असे श्रेयस यांचे ठरले नव्हते. दहावीनंतर वझे-केळकर महाविद्यालयात श्रेयस यांनी प्रवेश घेतला. अकरावीमध्ये असताना श्रेयश यांचा पहिल्यांदा नाटकाशी संबंध आला, तो वझे-केळकर महाविद्यालयातील ‘विथि’ या नाट्यसंस्थेमुळेच.या नाट्यसंस्थेनेच अभिनयाचे शिक्षण श्रेयस यांना दिले.

अकरावी आणि बारावीचे वर्ष या संस्थेत अभिनयाचे धडे गिरवल्यावर, ‘हिस्ट्री ऑफ लिजंड्स’ या एकांकिकेच्या माध्यमातून रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर रसिकांच्या सेवेचा सुरू झालेला प्रवास आजतागायत सुरू आहे, असे श्रेयस सांगतात. याच घटनेपासून श्रेयस यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित झाले. कलाकाराच्या आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात, याचा अनुभव श्रेयस यांना कलाक्षेत्रात पाऊल ठेवल्याठेवल्याच आला. काही दिवसांतच श्रेयस पितृसुखाला पोरके झाले. त्यानंतर कर्ता म्हणून सहाजिकच सगळी जबाबदारी श्रेयस यांनी स्वीकारली. आणि आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवत त्यांनी शिक्षण घेत नोकरी करण्यास सुरुवात केली. अवघे बारावीपर्यंतचे शिक्षण असल्यामुळे जी मिळेल, ती नोकरी त्यांनी स्वीकारली.

यातूनच कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, हा विचार अधिक परिपक्व झाल्याचे समजले, असे श्रेयस सांगतात. वडील गेल्यानंतर आईला अधिक कष्ट नको, या भावनेने आपली स्वप्ने बाजूला ठेवण्याचा विचार करणार्‍या श्रेयस यांच्या मनातील संवेदनशील स्वभावाचे हे लक्षण होते. मात्र, कलेविना जगण्याचे ठरवले असले, तरी आपल्या मुलाच्या हृदयाची तळमळ आईपासून लपली नाही. आपल्या बाळाच्या मनातील भावना आईला कधीही सांगाव्या लागत नाहीत. श्रेयसने वडील गेल्यावर कला शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि श्रेयस यांच्या आईने पुढाकार घेऊन त्यांना अभ्यास आणि कला यांवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यासाठी घरची परिस्थिती संभाळण्यासाठी श्रेयस यांच्या आईंनी कंबर कसली. अनेकांना जेवणाचे डबे देण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू करून घरची परिस्थिती त्यांनी सावरली.

आईचा आशीर्वाद असल्याने आता श्रेयस यांनीदेखील कलेकडे लक्ष देण्याचा विचार केला. मात्र, यावेळी दीर्घकाळ अभिनयापासून दूर असल्याने आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी श्रेयस यांनी घरातच सरावाला सुरुवात केली. अनेक स्वगतांचा सराव केल्यावर, एका महाविद्यालयाच्या स्पर्धेतश्रेयस यांनी स्वतःला चाचपण्यासाठी सहभाग घेतला. त्या स्पर्धेत त्यांनी तिसरे पारितोषिक पटकावले. त्यामुळे त्यांचा विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला. मग मात्र श्रेयस यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष या तीन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. ‘युथ फेस्टिव्हल’सारख्या स्पर्धांमध्ये श्रेयस यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारदेखील पटकावला. मग पुढे श्रेयस यांनी अनेक स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची झलक राष्ट्रीय पातळीवरदेखील दाखवली. त्यानंतर त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेत अनेक पारितोषिकेदेखील मिळवली. महाविद्यालयानंतर त्यांनी ‘भेटी लागे जीवा’ या नाटकातदेखील काम केले आहे. अनेक महाविद्यालयांतून त्यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर गोवा कला अकादमीमध्येसुद्धा श्रेयस यांनी नाटक सादर केले आहे.

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर फक्त साहित्य वाचायला मिळावे म्हणून श्रेयस यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठात मराठी साहित्यशास्त्र विभागात प्रवेश घेतला. वाचन हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. वाचल्यानेच मला सुचते, असे श्रेयस सांगतात. याच काळात समाजमाध्यमांवरील रिल्स, यूट्युबवरील लहान लहान व्हिडिओ, वेबसिरिज यांना प्रसिद्धी मिळू लागली होती. श्रेयस यांनी मित्राच्या ‘इटसच’ नावाच्या यूट्युब वाहिनीसाठीही अनेक लहान चित्रफिती, वेबसिरिज केल्या आहेत. आणि या सगळ्या कलाकृतींना रसिकांनी मनापासून प्रेम दिले आहे. त्यानंतर ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेमध्येही काम केले आहे. तसेच, सध्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ नावाच्या मालिकेतही ते भूमिका करत आहेत. अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले आहेच.
या सगळ्या प्रवासादरम्यान अनेकवेळा हे क्षेत्र सोडण्याबाबत श्रेयस यांना सांगण्यात आले. पण या सगळ्याकडे टीका म्हणून न बघता सकारात्मक पद्धतीने त्यांनी पाहिले. भविष्यात चित्रपटात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे श्रेयस त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांनी पाहिलेली सर्व स्वप्ने सत्यात येण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

कौस्तुभ वीरकर
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121