तापमानवाढीच्या तापाचे परिणाम आणि उपाययोजना

    07-May-2024
Total Views |
Effects of temperature rise and countermeasures

राज्यासह देशभरात उसळलेल्या उष्णतेच्या लाटेने जागतिक तापमानवाढ आणि त्याच्या दुष्परिणामांची झळ यंदा अधिक तीव्रतेने प्रत्येकालाच बसलेली दिसते. तेव्हा, उष्णतेची लाट, त्यामागील तापमानवाढ, त्याचे परिणाम आणि उपाययोजना यांविषयी उहापोह करणारा हा लेख...

मागील काही दिवसांत मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्राचा विचार करत, राममंदिर (४१.४ अंश से.), विक्रोळी (४४ अंश से.), कोपरखैरणे (४२.३ अंश से.), भाईंदर (३७.१ अंश से.), विद्याविहार (३८ अंश से.), माटुंगा (३४.७ अंश से.) अशी कमाल नोंद स्वयंचलित केंद्रांवर झाली. मुंबईसह ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतही कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर नोंदविला गेला. तसेच हवामान खात्याने पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारादेखील दिला आहे. ठाणे जिल्ह्यात एप्रिलमधील सरासरीच्या तुलनेत ४.८ अंशाने अधिक तापमान नोंदविले गेले. रबाळे येथे पारा ४१ अंशांवर गेला होता. कोकण विभागासोबतच राज्यातही ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा चढा होता. मध्य महाराष्ट्रात सहा केंद्रांवर तापमान ४० अंशांहून अधिक होते. अहिल्यादेवी नगर, कोल्हापूर, मालेगाव, सातारा येथे सरासरीपेक्षा दोन किंवा अधिक तापमान होते.

विदर्भात अकोला, चंद्रपूर, वाशिम या केंद्रांवर कमाल तापमान ४० अंशांहून अधिक होते. पावसाळी परिस्थिती कमी झाल्याने कमाल तापमानाच्या पार्‍यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत मध्यंतरी झालेल्या पावसानंतर हळूहळू तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात ब्रह्मपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवार, दि. २ एप्रिलला राज्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले. ब्रह्मपुरी खालोखाल अकोला येथे ४१.८, वर्धा येथे ४१.५, नागपूर चंद्रपूर व यवतमाळ येथे प्रत्येकी ४०.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती येथे ४०.८ कमाल तापमान नोंदवले गेले होते.

दहा वर्षांतील उच्चाकी तापमानाची नोंद

उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाड्यामुळे होणारी काहिली ही पुढील काही दिवस कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक उष्ण दिवासाची नोंद दि. १६ एप्रिलला झाली. या दिवशी कमाल तापमान चार अंशांनी अधिक नोंदविले गेले. यापूर्वी दि. २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती.

उष्णतेच्या लाटा अधिक मारक
 
जागतिक तापमानवाढीचे परिणाम हवामानाच्या विविध पैलूंवर जाणवत असल्याच्या नोंदी सध्या अभ्यासक घेत आहेत. उष्णतेच्या लाटाही अधिक तीव्र होत असल्याचे निष्कर्ष ताज्या संशोधनात अलीकडे मांडण्यात आले आहेत. तापमानवाढीमुळे उष्णतेच्या मोठ्या लाटा जगभरातच अधिक मंदपणे पुढे सरकत आहेत. त्या अधिक उष्ण व अधिक काळ टिकून जास्तीत जास्त लोकसंख्येला अक्षरश: भाजून काढत आहेत.

१९७९ पासून जगातील बहुतांशी लोकसंख्या अधिक काळासाठी उष्ण तापमानाचा सामना करत आहे. उष्णतेच्या लाटा उद्भवण्याचे प्रमाणही जागतिक पातळीवर तब्बल ६७ टक्क्यांनी वाढले आहे. उष्णतेच्या लाटांच्या काळात नोंदलेले सर्वोच्च तापमान हेही ४० वर्षांपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत अधिक आहे. या लाटांनी अधिक क्षेत्र कवेत घेतले आहे. ’सायन्स अ‍ॅडव्हान्सेसच्या’ या संशोधन पत्रिकेत हे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत.

उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले

मुंबईमधील वाढत्या उन्हाळ्यामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडल्याच्या तक्रारीही प्रकर्षाने समोर आल्या. शरीरातील पाणी कमी होत असल्याने चक्कर, अतिसार, उलट्यांचा त्रास नागरिकांना जाणवला. खासगी व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला तसेच पोटदुखी या स्वरुपाच्या तक्रारी घेऊन येणार्‍या रुग्णांच्या संख्येत यादरम्यान वाढ झालेली दिसते. तसेच त्वचारोगाशी संबंधित तक्रारींमध्येही पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे.सध्या दिवसभर वातावरणात प्रचंड उष्णता आणि रात्री पुन्हा हवेत गारवा जाणवतो. या प्रकारचे वातावरण हे विषाणू संसर्गासाठी पूरक असते व या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या प्रकारच्या साथीचे आजार बळावताना दिसतात.

वाढत्या उष्णतेमुळे मनुष्याबरोबरच पक्षी, प्राणी त्रस्त झाले आहेत. दि. १ एप्रिलपासून १६ दिवसांत १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल झाल्याचे आकडेवारी सांगते. उन्हाळ्यात पिंजरे गरम होत असल्याने, पक्षी-प्राण्यांना शक्य असल्यास पिंजर्‍यात ठेवू नये. त्यांना गरम पाणीही प्यायला देऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मुंबई शहर किनारपट्टीवर वसल्याने उन्हाळ्यात तापमानात दिलासा मिळत असला तरी शहरातील सिमेंट काँक्रीटच्या उभ्या व आडव्या वाढीव कामांमुळे उष्म्याची तीव्रता वाढलेली दिसते.

तापमानवाढीमुळे अन्नधान्य महागाई

एका दशकाच्या आतच अन्नधान्याचा महागाई दर दरवर्षी ३.२ टक्क्यांनी वाढत असून, अर्थव्यवस्थेला त्याची झळ बसू शकते, असा धोक्याचा इशारा एका अभ्यासात नुकताच देण्यात आला आहे. याचा फटका श्रीमंत देशांपेक्षा गरीब देशांना अधिक बसू शकतो, असेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. जर्मनीतील ‘पोट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेंट चेंज’ या संस्थेतील अभ्यासक पथकाने सन २०३५ मध्ये एकूण महागाई ०.३ ते १.२ टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. तापमानवाढीमुळे विषुववृत्ताजवळील देशांमध्ये वर्षभर, तर उत्तर-दक्षिण ध्रुवांजवळील देशांमध्ये केवळ उन्हाळ्यात ही महागाई उसळी घेऊ शकते.

 कंत्राटदारांना निवारा शेडसह अन्य उपाययोजना बंधनकारक

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने आपल्या सर्व पायाभूत प्रकल्पांतील कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आता प्रकल्पस्थळी सर्व कंत्राटदारांनी मजुरांसाठी निवाराशेडसह सर्व आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक ठरविल्या आहेत.

एसी, फ्रीज, आईस्क्रीम इत्यादी गोष्टींच्या विक्रीमध्ये उन्हाळ्यामुळे वाढ

‘गोदरेज अ‍ॅप्लायन्सेस’चे मुख्य कमल नंदी म्हणतात की, “या उन्हाळ्यामुळे फ्रीज व एसी आता मध्यमवर्गासाठी जरुरीचे ठरत आहेत. ‘ब्ल्यूस्टार’ कंपनी म्हणते की, आता ९० टक्के एसीचे ग्राहक हे प्रथमपणे खरेदी करत आहेत व ६० टक्के छोट्या शहरातील आहेत. ‘हायर अ‍ॅप्लायन्सेस इंडिया’च्या म्हणण्याप्रमाणे, एसीच्या विक्रीत ३५ ते ४० टक्के वाढ, तर फ्रीजमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. आईस्क्रीम कंपनी ‘बास्किन रॉबिन’ म्हणते की, “आयओवाय आईस्क्रीमच्या विक्रीत २० टक्के वाढ झाली आहे. नॅचरल आईस्क्रीमच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाली आहे.”

तीव्र उष्णतेमुळे देशात होरपळ

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये घराच्या छताला पांढरा रंग लावून घेणे, दुपारी १२ ते ४ दरम्यान घराबाहेर न पडणे, सतत पाणी व सरबत पिणे, डोके, कान व मान झाकणे, अशा काही उपाययोजनांचा समावेश आहे. उष्णता कमी करण्यासाठी वृक्षांची लागवड करावी, या सोप्या उपायांकडे आपल्या देशात अजूनही दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागांपेक्षा शहरांमध्ये चार ते पाच अंश सेल्सिअसने उषणता अधिक जाणवते. शहरांमधील झाडी व तलाव कमी करणे, काँक्रिटीकरण वाढविणे, प्रदूषण यामुळे शहरांमध्ये शहरी बेटे तयार होत आहेत. वाढत्या तापमानामुळे अतिनील किरणांची र्(ीश्रीींर्रींळेश्रशीं) तीव्रता वाढू लागली आहे.

नैसर्गिकरित्या वातानुकूलन वृक्षराजींकडून होत असते, हे लक्षात घ्यायला हवे. या कल्पनेवरून युरोप, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम आदी देशांमध्ये शहरी वने निर्माण केली जात आहेत. चीनमध्ये दहा हजार टन कर्ब वायू शोषून घेण्यासाठी व एक हजार टन प्राणवायू मिळविण्यासाठी ४० हजार वृक्ष व दहा लाख झुडपे यांचे ‘लियोझाऊ’ हे पथदर्शी शहर बनत आहे.तेव्हा, एकूणच काय तर तापमानवाढीचा सामना करण्याबरोबरच, वृक्षारोपणाचा टक्काही आज वाढविण्याची नितांत गरजच आहे. आज वसुंधरेची ही अशी बिकट परिस्थिती आहे, तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी राहाण्यायोग्य राखायची असेल, तर सरकारपासून ते नागरिकांपर्यंत, प्रत्येकाला पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात खारीचा वाटा हा उचलावाच लागेल.


- अच्युत राईलकर