कुटुंब व्यवस्था : गरज व पूर्तता

    17-May-2024
Total Views |
Family system

कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व व ही व्यवस्था पार पाडीत असलेल्या जबाबदार्‍या पाहता, आपण सगळ्यांनीच ही व्यवस्था अधिक सक्षम, क्रियाशील व तिच्या सर्व भूमिका, जबाबदार्‍या पार पडण्यास सज्ज असेल, याचा प्रयत्न केला पाहिजे. आज समाजात मांडले जाणारे नको ते विमर्श, कुटुंबसंस्थेवर येऊन आदळणारी बाह्य संस्कृतीतील आव्हाने व भावी पिढी घडविताना काही प्रसंगी होणारे दुर्लक्ष यावर आपण काम करणे आज अनिवार्य आहे.

अत्यंत प्राचीन व तितकीच महत्त्वाची एक व्यवस्था म्हणजे आपली कुटुंबसंस्था. आपण सगळेच या संस्थेचे सदस्य आहोत व हीच संस्था आपल्या मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक, लैंगिक व सामाजिक गरजा एकाच छताखाली पूर्ण करीत असते. खरेतर, प्रत्येक मुलाची पहिली शाळा ही त्याचे कुटुंब असते. सामाजिकीकरणाची प्रक्रियादेखील याच व्यवस्थेतून सुरू होत असते. धर्म, रितीरिवाज, संस्कृती, भाषा प्रकटीकरणाच्या पद्धती, नातेसंबंधांची ओळख व जोपासना, सामाजिकीकरण व अगदी भावभावनांचे व्यवस्थापनदेखील याच शाळेत प्रत्येक मूल शिकत असते. स्नेह, त्याग, समर्पण, सहकार्य, संयम, कृतज्ञता, सेवाभाव, प्रसंगी माघार घेणे, ही कुटुंबव्यवस्थेचे जतन व संवर्धन करण्यास पूरक मूल्येही याच कुटुंबसंस्थेतून आपण शिकत असतो.कुटुंबसंस्था बजावत असलेली भूमिका व पार पाडत असलेल्या जबाबदार्‍या, तसेच यामुळे आपल्या गरजांची होत असलेली पूर्तता पाहता, या व्यवस्थेचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच आहे, हे नक्की.
 
आपण सगळेचजण दैनंदिन व्यवहारातील जीवनमूल्ये व परस्परांशी व्यवहार करण्याच्या पद्धतीही याच व्यवस्थेतून शिकत असतो. एकमेकांचे ऐकून घेणे, एकमेकांच्या गरजांची पूर्तता करणे, एकमेकांच्या कामात सहकार्य करणे, प्रसंगी कुटुंब म्हणून एखाद्या गोष्टीसाठी माघार घेणे, संयमाने परिस्थिती हाताळणे, त्याग, कृतज्ञता, समर्पणाची भावना व्यक्त करणे, हे सगळे आपण याच व्यवस्थेत शिकत असतो.माणूस हा समाजप्रिय असतो. त्याला लोकांमध्ये राहायला आवडते. ही गरज भागवत असताना, सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेताना, त्यांचेही ऐकून घेण्याचे, त्यांचेही काही विचार असू शकतात, हे मान्य करण्याचे व त्या विचारांचा आदर करण्याचे कसबदेखील आले पाहिजे. हे आपण या व्यवस्थेत शिकत असतो. शेजारधर्म, समरसतेचा भाव व देशाप्रती प्रेम याचे बाळकडूसुद्धा या व्यवस्थेतच दिले जाते. अर्थात, हे सगळे शिकविणारे, चांगल्या विचारांनी मनाची मशागत करणारे आपले कुटुंबीयच असतात.त्यामुळे, एक आनंदी, समाधानी, उत्साही व प्रगल्भ व्यक्ती घडण्यास या व्यवस्थेची गरज ही प्रत्येकाला असतेच. हे सगळे शिकताना आपल्याकडून चुका झाल्यास, त्या दुरुस्त करून, पदरात घेणारी व सगळे विसरून पुन्हा त्याच मायेने आपलेसे करणारी हीच व्यवस्था असते.

मुख्य म्हणजे, आपण जीवनव्यवहार व मूल्ये शिकतो, ती कुटुंबीयांच्या दैनंदिन कृतीतून, देहबोलीतून व परस्परांप्रती वापरल्या जाणार्‍या भाषेतून. उदाहरणार्थ, अगदी आवाजाचा सूर, शब्दसंग्रह, एकमेकांचा उल्लेख, परक्यांसमोर होणारा उल्लेख, वर्तन या सगळ्या गोष्टी कुटुंबातूनच आपण शिकत असतो. म्हणजे काय, तर सामाजिक जीवनात प्रवेश करण्यापूर्वी हे सगळे प्रशिक्षण आपल्याला या व्यवस्थेतून मिळत असते.आपल्या आयुष्यातील अनेक चढ-उतार पार करायला लागणारी ऊर्जा ही कुटुंबातून प्राप्त मूल्यशिक्षणातूनच मिळत असते. कुटुंबातील मोकळ्या संवादातून भावभावनांचा निचरा होत असतो. अनेकदा मनातील दुःख, अश्रुंद्वारे मोकळे करण्याची मुभाही याच व्यवस्थेत मिळत असते. ज्या कुटुंबांमध्ये संवादाचा अभाव असतो, भावभावनांचा निचरा होण्याकरिता सक्षम व्यवस्था नसते किंवा एकमेकांप्रती स्नेह व आदरभाव नसतो, अशा कुटुंबातील सदस्यांचे मानसिक आरोग्य हे बाधित होत असते. मात्र, कुटुंबातील पारदर्शक संवादातून कुटुंबीयांचे भावविश्व जाणून सर्व सदस्य हे एकमेकांची आधारव्यवस्था होत असतात. दुर्दैवाने कुटुंबव्यवस्था जर आपली आधारव्यवस्था होऊ शकली नाही, तर या व्यवस्थेतील सदस्य हे गुन्हेगार, व्यसनाधीन किंवा आत्महत्येसारख्या सामाजिक प्रश्नांकडे वळू शकतात. म्हणजेच, सुरक्षित व मूल्याधिष्ठित आयुष्य जगण्याची कौशल्ये शिकविणारी ही एकमेव अशी व्यवस्था आपल्या जीवनात आहे.

समान पातळीवरून तरल नाती निर्माण करण्याची कौशल्ये व नात्यांचा आदर या दोन गोष्टीदेखील आपण याच व्यवस्थेतून शिकत असतो. आपले वैवाहिक आयुष्य हे सकस, तरल व समृद्ध असावे, आयुष्यात चांगला मित्रपरिवार, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी चांगले व सौहार्दपूर्ण संबंध असावे, या करिताही आपली जडणघडण याच व्यवस्थेतून होत असते. कुटुंबव्यवस्था शाबूत व क्रियाशील राहण्याच्या दृष्टिनेदेखील ही मूल्ये महत्त्वाची आहेतच.असे म्हणतात, धर्म हा आपल्या आयुष्यात ‘स्पीड ब्रेकर’ सारखे काम करतो. मनाचे स्वास्थ्य जपण्यात व समोर उभ्या ठाकलेल्या अडचणी, प्रश्न व समस्या सोडविताना मन शांत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावित असतो. आयुष्य जगताना, अगदी दैनंदिन स्तरावर आपल्याला अनेक संकटे व आव्हानांचा सामना करावा लागतो. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना, मनाचा तोल सांभाळणे, अत्यंत आवश्यक असते. याच व्यवस्थेतून आपण आपला धर्म शिकतो. सण-उत्सव साजरे करणे, त्या निमित्ताने आपल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणे, आपली संस्कृती, रितीरिवाज समजून घेणे, आपली वेशभूषा, भवन या निमित्ताने साजेसे ठेवणे, कुटुंबीयांसह सांघिक काम, जबाबदार्‍या पार पाडणे, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे आपल्या घरात स्वागत करणे. तसेच, पूजा, जप, ध्यान, साधना, स्तोत्र-मंत्रपठण इ. गोष्टी या मनातील सकारात्मकता, काटकता व सजगता वाढीस लावण्यास मदत करीत असतात. भावी जीवनाचा रोडमॅप तयार करण्याकरिता ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची असते. जसे एकत्रित भोजन घेणारे कुटुंब आनंदी असते, तसेच एकत्रितपणे धर्माचे पालन करणार्‍या कुटुंबास उत्तम मन:स्वास्थ्य लाभत असते, हे नक्की.
 
याच व्यवस्थेतून कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक आरोग्यदेखील सांभाळले जाते. वयोमानानुसार आरोग्याची व पूरक, पौष्टिक आहाराची काळजी ही कुटुंबच घेते. शारीरिक, मानसिक आरोग्य राखणारी ही व्यवस्था संबंधितांचे भावनिक आरोग्यही प्रसंगानुरुप सांभाळत असते. मुख्य म्हणजे, योग्य भावनांचे प्रकटीकरण व भावनांचे व्यवस्थापन हे कुटुंबातून शिकविले जाते. राग, स्वार्थ, अहंकार, क्रोध, मत्सर इ. भावना या संयमितपणे मांडण्याची कौशल्येही याच व्यवस्थेत आपण शिकतो व आपल्यातील माणूसपण जपतो.जसे धर्मसंस्थेची ओळख एका पिढीमार्फत दुसर्‍या पिढीला करून देत ती क्रियाशील ठेवण्याचे काम ही व्यवस्था करते, तसेच ती विवाहसंस्थादेखील सक्षमपणे कार्यरत राहील, याची खबरदारी घेत असते. खरेतर, वैवाहिक बेबनाव, तंटे, विभक्तपण, घटस्फोट, कौटुंबिक हिंसा या सगळ्या गोष्टी कुटुंबव्यवस्थेस थेट आव्हान देणार्‍या असतात. त्यामुळे, विवाह म्हणजे फक्त दोन जीवांचे नव्हे, तर तो अनेक जीवांना आधार व स्नेह देणारा असतो व ही कुटुंब निर्मितीची सुरुवात असते, हे याच व्यवस्थेतून मुलामुलींच्या विवाहपूर्व तयारीत शिकविले जाते.

मुख्य म्हणजे, आपले पालक एकमेकांशी कसे वागतात? याचा मुलांच्या मानसिकतेवर दूरोगामी परिणाम होत असतो व ते आपल्या भावी आयुष्यात जोडीदाराचा स्वीकार कसा करणार, हे ठरते. कुटुंब व विवाहव्यवस्था या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे, दोन्ही व्यवस्था या सक्षम व सुदृढ राहाव्यात याकरिता याच व्यवस्थेतून दैनंदिन स्तरावर काम केले जात असते.याच व्यवस्थेतून आपल्या गरजा व मागण्या याचेही भान राखण्याची कौशल्ये आपण शिकतो. कुटुंबाचे अर्थकारण, सदस्यांमधील अर्थभान व काटकसर या शब्दांचा व्यवहारातील अर्थ याच व्यवस्थेत शिकला व शिकविला जातो. अर्थातच, या बाबी कृतीतून व दैनंदिन व्यवहारातून सदस्य शिकत असतात. आयुष्याचे गणित हे बिनचूक सोडविण्याचे हे कसब यानिमित्ताने ही व्यवस्था शिकविते.ज्यांना समायोजनाचे महत्त्व समजते, त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रश्न, समस्या, अडचणी या निर्माण होण्यापूर्वीच संपतात. पानात वाढलेली भाजी अळणी असली, तरीही वाद न घालता, शांतपणे खाणारी व्यक्ती ही उत्तम समायोजन करणारी असते. आपल्या आयुष्यातील अनेक कटू प्रसंगात समायोजन केल्यास त्यांची धार कमी होते. समायोजन करणारी व्यक्ती ही विचारात व कृतीत लवचिकता राखणारी असते. मुख्य म्हणजे, आहे त्या परिस्थितीत समाधान मानणारी असते. ही महत्त्वाची शिकवणही याच व्यवस्थेतून दिली जाते.
 
पूर्वी आपल्याकडे एकत्रित कुटुंबपद्धती होती. मात्र, काळाच्या ओघात कुटुंबरचनेत बदल होत गेले व याचा थेट परिणाम हा कौटुंबिक व सामाजिक नात्यांवर होऊ लागला. मुख्य म्हणजे, या अवस्थांतरादरम्यान ‘स्वकेंद्रित व भोगवादी वृत्ती’ सुद्धा वाढीस लागत असल्याचे दिसू लागले. या दोन गोष्टी मात्र या संस्थेच्या संवर्धनास बाधा आणणार्‍या आहेत.कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व व ही व्यवस्था पार पाडीत असलेल्या जबाबदार्‍या पाहता, आपण सगळ्यांनीच ही व्यवस्था अधिक सक्षम, क्रियाशील व तिच्या सर्व भूमिका, जबाबदार्‍या पार पडण्यास सज्ज असेल, याचा प्रयत्न केला पाहिजे. आज समाजात मांडले जाणारे नको ते विमर्श, कुटुंबसंस्थेवर येऊन आदळणारी बाह्य संस्कृतीतील आव्हाने व भावी पिढी घडविताना काही प्रसंगी होणारे दुर्लक्ष यावर आपण काम करणे आज अनिवार्य आहे.आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणारी ही व्यवस्था आजही डौलाने उभी आहे. सकस व परिपूर्ण व्यक्ती घडविणार्‍या या व्यवस्थेचे, परदेशातील लोकांना मोठे कुतूहल आहे. ही व्यवस्था अधिक सक्षम, क्रियाशील व्हावी याकरिता आपले सामूहिक प्रयत्न मात्र अधिक दमदार होणे आवश्यक आहे.

 
स्मिता कुलकर्णी
 
(लेखिका कुटुंब प्रबोधन गतिविधी प. महाराष्ट्र प्रांत मंडळ सदस्य (अध्ययन व संशोधन आयाम प्रमुख) आहेत)