स्त्रीचा पराक्रम हा भारतीयांसाठी नवा नाहीच. ‘रणचंडिका’, ‘रणरागिणी’ अशा अनेक बिरुदावल्यांचे सृजन भारतीय स्त्रियांच्या अचाट पराक्रमानेच सिद्ध केले. काळ बदलला, मात्र स्त्रियांचा पराक्रम तसाच राहिला. आज भारतीय सैन्यातील स्त्रीशक्तीने तिच्या तेजाची ओळख नुकतीच पाकिस्तानला करून दिली, तर दुसरीकडे देशसेवेसाठी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तून महिलांची पहिली तुकडी देशसेवेची शपथ घेती झाली. यानिमित्ताने ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तील या महिला तुकडीच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...
पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड आणि दुर्दैवी हल्ल्यानंतर, महिलांच्या सौभाग्यरक्षणापासून आत्मरक्षणापर्यंतचे जिव्हाळ्याचे मुद्दे राष्ट्रीय स्तरावर चर्चिले जाणे स्वाभाविक होते. यावेळचे प्रमुख धोरणात्मक वैशिष्ट्य म्हणजे, भारत सरकारने गंभीरपणे विचार व तातडीने कृती करून पाकव्याप्त काश्मीरच नव्हे, तर थेट कराचीसारख्या शहरी क्षेत्रांपर्यंत लष्करी कारवाई करून पाकिस्तानला सज्जड व नेहमी लक्षात राहील, असा दम दिला.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या या धडक कारवाईनंतर, या यशस्वी कारवाईचा तपशील जागतिक स्तरावर माध्यम प्रतिनिधींना योजनाबद्ध व आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने विशद करण्यासाठी वायुसेना व पायदळातील दोन वरिष्ठ व अनुभवी महिला अधिकार्यांची योजना केली. भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विक्रमी वेळेतील यशस्वी चढाईमुळे पाकिस्तानला हात चोळत ठेवले, तर अमेरिकेसह सार्या जगालाच बुचकळ्यात टाकले.
त्यातच भर म्हणून, प्रत्यक्ष सीमावर्ती क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रखर प्रतिबंध करताना, त्यांना परोक्षपणे लष्करी साहाय्य करणार्या पाकिस्तानी सैन्यालाही आपल्या शौर्य आणि पराक्रमासह धूळ चारली, ती ‘सीमा सुरक्षा दला’च्या महिला पलटणीने! अशा प्रकारे प्रत्यक्ष युद्धभूमीतील क्षेपणास्त्र ते माध्यम क्षेत्रापर्यंत महिला सैनिकांच्या पुढाकारातून मोठे व धोरणात्मक यशच भारताच्या सशस्त्र दलाने प्राप्त केले. या अभिमानपूर्ण व अभिनव युद्धतंत्राने भारताचा लष्करी व सामरिक गौरव तर वाढलाच, पण महिलांकडून युद्धक्षेत्र आणि संबंधित विषयांत सपशेल हार व मोठी नामुष्कीही पाकिस्तानला पाहावी लागली.
भारतीय सैन्यदलातीत नारी शक्तीचा महिमा आणि वाढता प्रभाव प्रदर्शित करणारी घटना नुकतीच घडली, ती पुण्याच्या ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’त. प्रसंग होता ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’ म्हणजेच ‘एनडीए’मध्ये सैन्यदलातील प्रवेशासाठी खडतर असे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणार्या महिलांच्या प्रथम तुकडीच्या उत्तीर्ण होण्याचा.
या प्रसंगाचे विशेष महत्त्व म्हणजे ‘एनडीए’मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून, भारतीय सैन्यदलात दाखल होणार्या ‘एनडीए’च्या १४८व्या तुकडीत १७ महिला प्रशिक्षार्थी उमेदवारांचा समावेश. ‘एनडीए’तील या दीक्षान्त समारंभप्रसंगी बोलताना मिझोरामचे राज्यपाल व निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी, ”महिला अधिकार्यांच्या १७ प्रशिक्षार्थींच्या पहिल्या तुकडीचा भारतीय लष्करात समावेश होणे हा प्रसंग ‘एनडीए’साठी ऐतिहासिक असून, भविष्यात भारतीय सैन्याचे सर्वोच्चपदसुद्धा महिला भूषवेल”, असे आत्मविश्वासपूर्ण काढलेले उद्गार भारतीय महिला निश्वितपणे सार्थ करतील. त्याचे प्रत्यंतरही ’ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
शैक्षणिक तपशिलासह सांगायचे म्हणजे यावर्षी ‘एनडीए’मध्ये ३०० पुरुष उमेदवारांसह १७ महिला उमेदवारांना पदवीदान करण्यात आले. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या महिला उमेदवारांपैकी कॅ. श्रृती दक्षने कला विद्या शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दीक्षान्त समारंभात एकूण ३३९ उमेदवारांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये ८५ छात्रांना संगणकशास्त्रातील पदवी, ८४ छात्रांना विज्ञान शाखेतील ‘बीएससी’ पदवी, ५९ छात्रांना कला शाखेची पदवी, तर तब्बल १११ जणांना ‘बीटेक’ पदवी प्रदान करण्यात आली.
परंपरागतरित्या भारतीय तरुणांना सैन्यदलात अधिकारी पदावर दाखल होण्यासाठी ‘एनडीए’ म्हणजेच ‘राष्ट्रीय संरक्षण अकादमी’, पुणेे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरते. दरवर्षी हजारो उमेदवार ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळण्यासाठी शैक्षणिक, बौद्धिक शारीरिक तयारी करतात. खडतर प्रयत्नांमध्ये यशप्राप्तीसाठी त्यांना अनेक वर्षे प्रयत्न आणि अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच त्यांना ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळतो व त्यांना अपेक्षित असलेल्या कारकिर्दीला सुरुवात होते.
अर्थात, ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळणे हे दुरापास्त असतेच मात्र, तिथेच सर्व संपते, असे नाही. यावर्षीच्या महिला तुकडीच्या संदर्भातपण असेच झाले. सुरुवातीला ‘एनडीए’ प्रवेशचाचणी प्रक्रियेत आजवरच्या सर्वाधिक म्हणजेच १९ महिला उमेदवार प्रवेशपात्र ठरल्या, यांपैकी एक महिला उमेदवार प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वैद्यकीय कारणावरून गळली, तर दुसर्या महिलेने अनिच्छेच्या कारणावरून प्रशिक्षण अर्ध्यावर सोडले. मात्र, १७ महिला उमेदवार अखेरपर्यंत टिकून राहिल्या हे विशेष.
‘एनडीए’मधील महिला उमेदवारांची ही पहिलीच तुकडी असल्याने, त्यांच्या अभ्यास-प्रशिक्षणासह एकूणच अभ्याससत्राकडे सर्वांचीच उत्सुकतापूर्ण नजर होती. वर्षभरातील त्यांच्या सरावक्षमतेचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, एकूण महिला उमेदवारांपैकी १४ जणींनी आपली शारीरिक क्षमता पहिल्याच प्रयत्नात सिद्ध केली.
‘एनडीए’मध्ये प्रवेशानंतरच्या पहिल्याच टप्प्यात, महिला उमेदवारांना सैन्यदलाच्या नियमांनुसार त्यांचे केस विशिष्ट शैलीत कापावे लागले. हे नियम व बदल सर्वच महिला उमेदवारांसाठी नवे होते. विशेषतः यांपैकी एका महिला प्रशिक्षार्थीचे केस तर लांबसडक होते. त्यामुळे केसांच्या संदर्भात त्यांच्या स्त्रीसुलभ भावना निश्चितपणे होत्या मात्र, आपल्या भावनांवर मात करत त्यांनी आपले केस कापून घेतले. प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्यांनी आपला संपूर्ण गणवेश घातला, तेव्हा मात्र त्यांना केस कापण्या मागची उपयुक्तता सिद्ध झाली. त्यानंतर कुणाही महिलेची तक्रार उरली नाही.
प्रशिक्षणादरम्यान या महिला प्रशिक्षार्थींना सैन्यदलातील शस्त्रहाताळणीपासून विविध साहसपूर्ण खेळ, संकटांना सामोरे जाण्याचा सराव करण्यापासून घोडेस्वारी, दूरवर पोहणेे, जहाजाचे संचालन करणे, विमानोड्डाण इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या आधारे महिला उमेदवारांची, सैन्यदलाच्या पायदळ, नौदल वा वायुदलात अधिकारी म्हणून निवड आणि नेमणूकही करण्यात आली.
‘एनडीए’च्या दीक्षान्त समारंभात बोलताना गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. पूनम टंडन यांनी नमूद केल्यानुसार "यावर्षी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एनडीए)तून पदवीधर झालेल्या मुलींच्या पहिल्या तुकडीने मैलाचा दगड रचला आहे. हा सुवर्णक्षण देशातील हजारो मुलींसाठी महत्त्वाचा टप्पा असून, उत्कृष्टता आणि सेनेचा ध्यास कुणा लिंगापुरता मर्यादित नाही.” ‘एनडीए’च्या माध्यमातून अधिकारी स्तरावर महिलांची छाप आणि प्रभाव राहणार असून, शत्रूवर वचक ठेवण्यासाठी या नव्या महिलांची कर्तबगारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक
व सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६