नकाशा - ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना

Total Views |
unique maps exhibition held at the british library


नकाशाचे प्रदर्शन... होय, नकाशांचेच प्रदर्शन! चित्रांचे, जुन्यापुराण्या वस्तूंचे, कपड्यांचे चक्क ममीजचे प्रदर्शनही आपण ऐकले, वाचले, पाहिले असेल. पण, ‘ब्रिटिश लायब्ररी’मध्ये आयोजित ‘मॅप्स अ‍ॅण्ड दि ट्वेंटियथ सेंचुरी’ हे आगळेवेगळे नकाशांचे प्रदर्शन जगाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी प्रदान करणारे म्हणता येईल. आज नकाशांच्या जगतातला हा विश्वसंचार...

प्रिय वाचक, गेले तीन आठवडे आपण ‘विश्वसंचार’ स्तंभामधून पाकिस्तानच्या बलुचिस्तान, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत या राज्यांमध्ये काय घडामोडी घडत आहेत, ही राज्ये पाकिस्तानातून फुटून बाहेर पडायला कशी आणि का उत्सुक आहेत, पण त्यांना ते खरोखर शय होणार आहे का, इत्यादि मुद्द्यांचा विचार केला.


बर्‍याच वाचकांनी दूरध्वनी किंवा समाजमाध्यमांद्वारे जो संवाद केला, त्यावरून असे लक्षात आले की, त्यांना पंजाब प्रांत पाकिस्तानात कसा, असा प्रश्न पडलेला आहे. या प्रश्नाचे मूळ हे आहे की, आपण नकाशा ही वस्तू बघतच नाही. आपण तो नकाशा शाळेतच सोडून आलो आहोत. म्हणून मी अनेकदा वाचकांना विनंती करत असतो की, ‘विश्वसंचार’ वाचताना सोबत एक चांगला अ‍ॅटलास घेऊन बसा. विषयमांडणीमध्ये कोणताही भौगोलिक संदर्भ आला की, अ‍ॅटलास उघडून तो देश, तो प्रांत, ते शहर, गाव, पर्वत, नदी, समुद्र हे नेमके कुठे आहे, हे मुद्दाम पाहा, समजून घ्या आणि मग पुढे वाचा. यामुळे वर्तमान बातमी, तिच्या पाठीमागचा इतिहास आणि भूगोल यांची आपली समजूत एकदम पक्की होईल.


अगदी हेच टॉम हार्परही सांगतात. ते म्हणतात, "नकाशा ही ‘आहे आपली एक भिंतीवर टांगलेली वस्तू,’ असे नाही. नकाशा पाहण्यातून, समजावून घेण्यातून आपली समजूत वाढत असते.” टॉम हार्पर हे लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीच्या नकाशा विभागाचे प्रमुख आहेत.


आता प्रथम ‘ब्रिटिश लायब्ररी’ ही काय संस्था आहे, हे पाहूया. मध्य लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियम हे जगद्विख्यात वस्तुसंग्रहालय आहे. ते सन १७५३ साली स्थापन झाले. यात इतर असंख्य मौल्यवान वस्तूंप्रमाणेच हजारो ग्रंथसुद्धा होते. १९७३ साली म्हणजे तसे पाहता हल्लीच ५०-५२ वर्षांपूर्वी ही सगळी ग्रंथसंपदा वेगळी काढून ‘ब्रिटिश लायब्ररी’ची स्थापना करण्यात आली. लंडनच्या यूस्टन रोड रेल्वे स्थानकाजवळ हे राष्ट्रीय ग्रंथालय आहे. इथे एकंदर १७ कोटी वस्तू आहेत. त्यांपैकी १ कोटी, ३९ लक्ष, ५० हजार पुस्तके आहेत. ३ लाख, ५१ हजार, ११६ हस्तलिखिते आहेत. ४३ लक्ष, ४७ हजार, ५०५ नकाशे आहेत. ८२ लक्ष, ६६ हजार, २७० डाक तिकिटे म्हणजे स्टॅम्प्स आहेत. १६ लक्ष, ७ हजार, ८८५ संगीताच्या रेकॉडर्स आहेत आणि ६० लाख रेकॉर्डिंग्ज, म्हणजे संगीत मैफिली किंवा नामवंत व्यक्तींची भाषणे लाईव्ह रेकॉर्ड केलेली आहेत. ‘ब्रिटिश लायब्ररी’ हे ब्रिटनचे राष्ट्रीय ग्रंथालय असल्यामुळे, ग्रंथालय कायद्यानुसार ब्रिटिश भूमीवर प्रकाशित होणारे प्रत्येक नवे पुस्तक आपोआपच इथे येते. त्यामुळे या संग्रहात सतत भर पडत असते.


दुसर्‍या महायुद्धापूर्वी जागतिक महासत्ता असलेला ग्रेट ब्रिटन हा देश दुसर्‍या महायुद्धात जिंकला खरा, पण त्याचा इतका भीषण शक्तिपात झाला की, एकंदर जागतिक क्रमवारीत तो ’थर्ड लास’ देश ठरला. उलटणार्‍या प्रत्येक दशकाबरोबर तो पुन्हा वर येण्याऐवजी आणखीन खालीखालीच चाललाय, असे तज्ज्ञ लोक म्हणतात. दुसर्‍या महायुद्धात पराभूत झालेले नि बेचिराख झालेले जर्मनी-जपान कुठल्या कुठे पोहोचलेत, पण ब्रिटन मात्र चाललाय आपला कडेकडेने. ते कसेही असो, पण पुन्हा वर येण्याची इच्छा ब्रिटिशांच्या अंतर्मनात आहे, हे दाखवणारे चिन्ह म्हणजे ‘ब्रिटिश लायब्ररी’चा अर्थसंकल्प. नव्या युगात ज्ञानाला अतोनात महत्त्व आहे. किंबहुना, ज्ञान आणि शक्ती यांच्या जोरावरच आपण पुन्हा वर येऊ, हे ब्रिटिशांनी नेमके जाणलेले आहे आणि म्हणूनच ‘ब्रिटिश लायब्ररी’चा वार्षिक अर्थसंकल्प आहे, १४७.६ दशलक्ष स्टर्लिंग पौंड!


असो. तर एवंगुणविशिष्ट ‘ब्रिटिश लायब्ररी’ने आपल्या संग्रहातल्या साडेत्रेचाळीस लक्ष नकाशांपैकी निवडक अशा फक्त २०० नकाशांचे एक प्रदर्शन सध्या भरवलेले आहे. अगोदर उल्लेख केलेले नकाशा विभागाचे प्रमुख टॉम हार्पर यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनीच हे २०० नकाशे निवडले आहेत. प्रदर्शन पाहणार्‍याची भूगोलाची, नकाशाशास्त्राची, इतिहासाची, त्यातही विशेषतः गतशतकाच्या इतिहासाची समजूत हे नकाशे पाहता पाहता वाढावी, अशा अंदाजाने त्यांनी हे नकाशे निवडलेले आहेत. म्हणून त्यांनी प्रदर्शनाला नाव दिलेय ‘मॅप्स अ‍ॅण्ड दि ट्वेंटियथ सेंचुरी!’


नकाशा बनवण्याचे शास्त्र कुणी शोधून काढले, हा अर्थातच वादग्रस्त विषय आहे. पण, आधुनिक काळापुरते बोलायचे, तर सध्या प्रचलित असलेल्या नकाशाशास्त्राची-कार्टोग्राफीची सुरुवात युरोपात झाली. गेराडर्स मर्केटर या फ्लेमिश भूगोलतज्ज्ञाने सन १५६९ साली पहिला आधुनिक नकाशा रेखाटला, असे मानले जाते.


पण, यानंतरही पुढची ३००-३२५ वर्षे सर्वसामान्य माणसाला नकाशाचा फारसा उपयोग नव्हता. लष्करी सेनापती, अधिकारी, दर्यावर्दी, व्यापारी, संशोधक हेच मुख्यतः नकाशे काढून घ्यायचे नि त्यांचा उपयोग करायचे. सन १८९८ मध्ये अमेरिकेत हेन्री फोर्डने मोटार या नवीन वाहनाचा शुभारंभ केला. लोक अगोदरही घोड्यावरून आणि घोडागाडीतून प्रवास करीतच होते. पण, मोटारमुळे प्रवास करण्याचे प्रमाण वाढले नि तिथपासून पुढे जगभर सतत वाढतच गेले. त्यामुळे नकाशा या वस्तूची मागणी वाढली.


१९१४ साली युरोपात जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात युद्ध जुंपले. पाहता पाहता, या युद्धाने अत्यंत विक्राळ रूप धारण करून संपूर्ण जगालाच कवेत घेतले. म्हणून त्याला ‘महायुद्ध’ असे म्हणू लागले. महायुद्धामुळे विविध देशांच्या सेनादलांनी आपापल्या उपयोगानुसार लाखांनी नकाशे छापले. १९१८ साली संपलेल्या या महायुद्धाने खुद्द जगाचाच नकाशा बदलून टाकला. काही साम्राज्ये, काही देश नाहीसे झाले, तर काही देश नव्याने जन्मले. तशी साम्राज्यांची पतने आणि उत्थाने इतिहासाच्या प्रत्येक वळणावर होतच आलेली आहेत. पण, यावेळेस ही पतने, नकाशांच्या माध्यमातून, जगभर सर्वत्र, सर्वसामान्यांच्या हातात गेली.


त्यानंतर १९३९ ते १९४५ या कालखंडात अधिक संहारक, अधिक भीषण असे दुसरे महायुद्ध झाले. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या महासत्ता संपल्या; तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या नवीन महासत्ता उदयाला आल्या. म्हणजे नेमके काय घडले, हे शब्दांप्रमाणेच नकाशाच्या रेषांमधून जगभरच्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले.


दुसर्‍या महायुद्धाने वैज्ञानिक संशोधनाचा वेग प्रचंड वाढवला. तशी नकाशाशास्त्रातही भर पडली. समुद्रतळाचे नकाशे यापूर्वीही काढले गेले होते. पण, त्यांचे उद्दिष्ट समुद्री वनस्पती, जलचर प्राणी, प्रवाळ बेटे इत्यादींचे शास्त्रीय संशोधन एवढेच होते. महायुद्धानंतर अमेरिकन नौदलाने, युरोप खंड आणि अमेरिका खंड यांदरम्यान पसरलेल्या अटलांटिक महासागराच्या तळाचा, अतिशय तपशीलवार नकाशा बनवला. कशासाठी, तर आपल्या अत्याधुनिक आण्विक पाणबुड्या कुठेकुठे लपवून ठेवता येतील, हे पाहण्यासाठी. अमेरिकन नौदलाने बनवलेला हा अत्यंत सुंदर नकाशा या प्रदर्शनात मुद्दाम मांडलेला आहे.


अलीकडे वेगवेगळे विषय पटकन समजून देण्यासाठी जे तक्ते किंवा चाटर्स वापरले जातात, तेही मुळात नकाशेच होत. अलीकडेच दिल्लीमध्ये धुयामुळे वाहतुकीचा प्रचंड घोळ झाला. हे धुके नैसर्गिक नसून प्रदूषणामुळे निर्माण झालेले होते. त्यानिमित्ताने भारतातल्या आणि एकंदरच जगातल्या कोणकोणत्या प्रगत शहरांमध्ये किती नि कसे प्रदूषण आहे, हे दाखवणारे अनेक तक्ते प्रसिद्ध झाले होते. हे सगळे एक प्रकारचे नकाशेच होत.


नकाशांचा उपयोग प्रचारासाठीही करण्यात आलेला आहे. उदा. व्हिएतनाम युद्धात सततच्या संघर्षामुळे नि अमेरिकेने वापरलेल्या ‘नापाम बॉम्ब’ नावाच्या अतिशय बदनाम अस्त्रामुळे लोकजीवन कसे उद्ध्वस्त झाले, हे नकाशाद्वारे दाखवून युद्धविरोधी प्रचार करण्यात आला होता. दुसर्‍या महायुद्धात प्रारंभी हिटलरच्या झंजावाती चढायांनी जवळजवळ सगळा युरोप पादाक्रांत केला होता. पण, १९४२ नंतर दोस्त राष्ट्रांनी हळूहळू जर्मनीला मागे रेटायला सुरुवात केली. हे सगळे त्यावेळी वृत्तपत्रांमधून नकाशांद्वारे दाखवून एक प्रकारे प्रचारच करण्यात आला होता. जनतेचे मनोबल वाढवण्यासाठी असा प्रचार आवश्यकच असतो.


म्हणून नकाशा पाहणे आणि समजून घेणे, हे फार फार आवश्यक आहे. आताचाच विषय पुढे न्यायचा म्हटले तर, भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा नकाशा आपण जर नीट बघितला, तर आपल्या लक्षात येईल की, ‘द ग्रेट गेम’मध्ये रशियाला थोपवण्यासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तान भारतापासून कसा तोडला, नंतर पाकिस्तान बनवताना पंजाब प्रांत कसा अर्धा पाककडे आणि अर्धा भारताकडे ठेवला, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या वायुदलाने नेमके कुठे कुठे हल्ले चढवून पाकचे कंबरडे मोडून टाकले, हे सर्व जेव्हा आपल्याला समजते, कळते किंवा खरे म्हणजे आकळते, तेव्हा आपल्याला खरा वाचनानंद मिळतो आणि मन उत्साहाने भरून जाते.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.