कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान भाग १९

    08-Mar-2023
Total Views |
Kundalini Shakti


प्रत्येक स्वर समूहाला धरून एक दिव्य स्पर्श गायक श्रोत्याला त्या दिव्य गंधस्वरूप रासक्रीडेचा अनुभव देत असतो. असल्या दिव्य अवस्थेत ‘वाहवा’ म्हणायला कोणीच देहभानावर नसतो. ‘देहभाव हरपला तुज पाहता विठ्ठला’ अशी सर्वांची अवस्था होऊन जाते. तसल्या दिव्य अवस्थेत भक्त भगवंतास आलिंगन देऊन धन्य होत असल्यास नवल नाही, असल्या गीताला ‘सम्+गीत’ म्हणजे ’संगीत’ असे म्हटले आहे. गायक व श्रोता दोघेही सम् म्हणजे एकरस होत, त्या दिव्य गीताकडे गमन करीत असतात. नादब्रह्मातील हा स्पर्शगुण होय. भगवंताशी खेळली जाणारी गोपींची रासक्रीडा ती हीच होय!
 
दिव्य सुगंध


असल्या दिव्य स्पर्शावस्थेत असतानाच दिव्य सुगंधाचा सतत अनुभव येत असतो. घ्राणेंद्रियातील मखमली त्वचा असलेल्या पेशीतील तंतू स्वच्छंदाने नर्तन करीत असतात. या तंतूंवर गंधाचे कण आदळल्यास त्यातून जी मोड उत्पन्न होते, त्यावर त्या गंधाची जाणीव अवलंबून असते. अशा दिव्य अवस्थेत प्रत्यक्ष गंधकण नाकात न जाताच त्यातील तंतुजाल त्या-त्या मोडीवर येऊन मोडीला धरून साधकाला दिव्य सुगंध सतत येत असतात. प्रत्यक्ष पाहावे, तर जवळ उदबत्ती अथवा अत्तर नसते. दिव्य स्पर्श व तंतूंच्या नर्तनामुळे असला दिव्य सुगंधाचा अनुभव येत असतो. गंधर्व अवस्थेचा असाच दिव्य आशय आहे. ‘गंध’ म्हणजे गंध अथवा वास आणि ‘अरुव:’ म्हणजे त्याप्रमाणे असलेली चित्ताची धारणा होय. ज्यांच्या अस्तित्वातून दिव्य गंध प्रक्षेपित होत असतात, असल्या महान साधकाला ‘गंधर्व’ असे म्हणतात. गानयोग्याची ही उच्च अवस्था होय. असल्या दिव्य अवस्थेतून सरणार्‍या दिव्य अनुभूतींना ‘अप्सरा’ (अप + सरा) असे म्हणतात. गंधर्व आणि अप्सरा साधकाची दिव्य अवस्था व त्याला धरून त्यांची दिव्य अनुभूती होत. भगवान शिवाच्या संगतीत असले गंधर्व व अप्सरा सतत नृत्य करीत असतात. गायकांचे दैवत भगवान शिवच आहेत. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर असल्या दिव्य सुगंधाचा अनुभव साधकाला येऊ शकतो. दिव्य सुंगध नसले तरी प्रत्येक माणसागणिक असलेल्या विभिन्न शारीरिक गंधाची जाणीव कुत्र्यांना असल्याने ते गुन्हेगारांना आजही पकडू शकतात.

दिव्य चव अथवा रस


कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाचा आहार अतिशय कमी होऊन अल्प आहारातच त्याची तृप्ती होत असते. प्रत्येक पदार्थात एक दिव्य रस असल्याचा त्याला अनुभव येत असतो. कित्येकवेळा काही न खाताच त्याची तृप्ती होत असते. जिभेवरील भागावर काही उंचवटे असतात. त्यातील पेशी तंतूवर लाळेत विरलेले पदार्थ पसरतात व त्यांच्या रसाचा आस्वाद जिव्हेवरील पेशी तंतूंवर होऊन त्या त्या रसाची भावना व्यक्तीला होत असते. कुंडलिनी जागृत झाल्यावर रसग्रंथी स्वतःत रममाण झाल्यामुळे साधकाला दिव्य रसाचा सतत अनुभव येऊन तो तृप्त होऊन जातो. असल्या अवस्थेत त्याला जेवणाची आवश्यकताच वाटत नसते. आणखी उच्च साधनांनी साधकाला ‘बला अतिबला विद्या’ प्राप्त होऊन तो कमीत कमी अन्न ग्रहण करीत असतो. आपल्या गळ्यात मध्यभागी एक ग्रंथी असते. तिला ‘चुल्लिका ग्रंथी’ असे म्हणतात. या ग्रंथी योग्य कार्य करीत असल्यास साधकाला हळूहळू त्यावर संयम आणून तो भोजनाशिवाय बरेच दिवस राहू शकतो. असल्या विद्यांना ‘बला अतिबला विद्या’ असे म्हणतात, ‘बला’ म्हणजे जेवणाव्यतिरिक्त आणि ‘अतिबला’ म्हणजे पाण्याविना राहता येण्याची जीवनातील श्रेष्ठ कला होय.
 
बला अतिबला विद्या


‘बला’ म्हणजे बराच काळ राहणे आणि ‘अतिबला’ म्हणजे पाण्याविना राहू शकणे होय. आपल्या कंठाखाली एक ’चुल्लिका’ नामक ग्रंथी असून त्यावर संयम साधल्यास साधक अन्न-पाण्याशिवाय राहू शकतो. झाडे अन्न ग्रहण न करता राहू शकतात. ते आपल्या पानांद्वारे हवेतील कर्बाचे आणि सूर्यकिरणांद्वारे आवश्यक त्या पदार्थाचे सेवन करून राहू शकतात. वृक्षांचे असले जीवन योगी अंगवळणी पाडू शकतो. पण, वृक्ष पृथ्वीतून जल व आवश्यक त्या क्षारांचे सेवन करीत असतात. योगीसुद्धा सूर्यकिरणांद्वारे व हवेतून आवश्यक ते अन्न व जल शोषण करू शकतात. ज्या दिव्य जीवनाचे केंद्रस्थान ‘चुल्लिका’ग्रंथी आहे. त्यावरील संयम योग्याला प्रत्यक्ष अन्न व जलसेवनाशिवाय राहू देतो. असले महान योगी जवळजवळ नसल्यासारखीच स्थिती आहे. लेखक अन्नपाण्याशिवाय १३ दिवस विनाकष्ट राहू शकला, एवढा अल्प अनुभव लेखकाला आहे. यावरून अन्नपाण्याशिवाय राहता येणे शक्य असावे, असे वाटते. प्रापंचिक माणसाला असल्या दिव्य साधनाो व शक्ती प्राप्त करणे कठीण असते.

काळगतीचे दिव्य ज्ञान

 
प्रकाशाच्या वेगाला धरून काळ मापन केले जाते. पतंजली आपल्या कैवल्यपादात म्हणतात, ‘अतीत अनागत.’ ज्ञान हे काळधर्माच्या विरूद्ध गतीवर अवलंबून असते, मुळात काळ नसतोच. त्याच्या विभिन्न भासमान गतीमुळे भूत, भविष्यकाळाचा भास होत असतो. जो काही आहे तो वर्तमानकाळच असतो. योगी आपले चित्त विभिन्न काळातील घटनांशी एकचित्त करून त्या त्या काळाशी समरस होऊ शकतो. त्याच्यासाठी भूत-भविष्यकाळ नसतो. एडिंग्टन या वैज्ञानिकाने असे सिद्ध केले आहे की, आपल्याला जर प्रकाशवेगापेक्षा अधिक गतीने वेग धारण करता आला, तर आपण विपरित उलट अनुभव घेऊ शकू.

योगी आपले चित्त कोणत्याही काळगतीशी एकरूप करून त्या त्या काळातील व्यक्तींशी बोलू शकतो आणि घटनांचा अनुभव घेऊ शकतो. योगी नेहमी काळाच्या वर असतो. म्हणून काळाला धरून असणारी शरीराची तरूण वृद्धावस्था त्याला लागू नसते. खरा योगी चिरतरूण दिसतो. त्याचे खरे वय इतर जाणू शकत नसतात. राम-कृष्ण व विष्णू या देवता काळाच्या वर असल्याने त्यांना दाढीमिशा दाखविल्या गेल्या नाहीत. ते चिरतरूण आहेत. एखाद्या अवकाश यानात काही अंतराळयात्री ठेवून ते अवकाश यान सतत प्रकाशवेगापेक्षा अधिक गतीने संचालित केल्यास त्या यानातील प्रवासी पृथ्वीवरील युगायुगानंतरही त्याच वयाचे राहतील. कारण, मारक असा काळ त्या अवस्थेत नसतो. पृथ्वीवर येणार्‍या तबकड्यातील यात्री ज्या क्षणी त्यांच्या ग्रहावरून निघतात, त्याच क्षणी ते विश्वाचा फेरफटका करून आपल्या ग्रहावर परत जाऊ शकतात, नव्हे एडिंगट्नच्या सिद्धांतानुसार ते आपल्या ग्रहावरून निघालेल्या वेळेच्या अगोदरसुद्धा परत जाऊ शकतात. कारण, त्यांचा वेग प्रकाशवेगापेक्षाही अधिक राहील. आपल्या चित्तनामक उपकरणाद्वारे योगी या सर्व दिव्य अवस्थांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. म्हणून कुंडलिनी जागृत योगी इतरांपेक्षा अधिक तरूण दिसतो. रामकृष्णांचे जीवन असेच आदर्श व काळातीत जीवन होय.
 
 

 
योगिराज हरकरे

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे) ९७०२९३७३५७



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.