
खरंतर न्यूझीलंडला ‘अंब्रेला कंट्री’ म्हणून ओळखले जाते. कारण, येथे सर्व धर्म आणि संस्कृती शांततेत नांदतात. परंतु, शांती आणि सौंदर्यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेला न्यूझीलंड सध्या येथील अशांततेमुळे चर्चेत आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक माओरी समाजाचे लोक रस्त्यावर उतरून गैर-ख्रिश्चन धर्मीय, स्थलांतरित, पॅलेस्टिनी समुदाय यांसह ‘जागतिक आरोग्य संघटने’विरोधात निदर्शने करीत आहेत. आंदोलनांदरम्यान माओरी युद्धनृत्य ‘हाका’ आणि विविध धर्माचे ध्वज जाळण्यासारखे भडकावू प्रकारदेखील घडले. हा सर्व प्रकार न्यूझीलंड ‘अंब्रेला कंट्री’ या प्रतिमेला धक्का पोहोचवत आहेत. या निदर्शनांचे नेतृत्व माओरी मूलचा धार्मिक नेता ब्रायन तमाकी करत असून, तो ‘डेस्टिनी चर्च’ नावाचे एक संघटन चालवतो, अशी माहिती आहे. १९९८ साली स्थापन झालेले ‘डेस्टिनी चर्च’ हे त्यांच्या कठोर धार्मिक विचारांसाठी ओळखले जाते. हे विचार अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. ऑकलंड शहरात झालेल्या एक आंदोलनाने देशातील धार्मिक सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
आपण पाहिले तर, न्यूझीलंडची लोकसंख्या साधारण ५३ लाख. हा देश तसा स्थलांतरितांसाठी आजवर कायमच खुला राहिला. मात्र, ‘कोविड’नंतर स्थलांतरितांची संख्या याठिकाणी झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे घरांची कमतरता, घरभाड्यांमध्ये मोठी वाढ, नोकर्यांची कमतरता अशा अनेक समस्या निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्थलांतरित त्यांच्या संसाधनांवर गदा आणत आहेत. न्यूझीलंडमध्ये ख्रिस्ती धर्माचे लोक सर्वाधिक आहेत. त्यात अँग्लिकन, कॅथोलिक, प्रेस्बिटेरियन इत्यादी उपपंथ आहेत. माओरी हे न्यूझीलंडचे मूळ निवासी आहेत. असे असले तरी न्यूझीलंड सरकार आणि समाज सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करतात. इथल्या शाळांमध्येही विविध संस्कृतीचे शिक्षण दिले जाते. विशिष्ट धर्मावरून कधी भेदभाव करण्यात आला नाही.
हा तोच तमाकी आहे, ज्याने अनेकदा राजकारणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण, यश काही मिळाले नाही. तमाकी याचा प्रभाव मर्यादित असला, तरी त्याची भडकाऊ विधाने चर्चेत राहतात. एकूणच त्याचा जीवनप्रवास आजवर वादग्रस्तच राहिला आहे. आता न्यूझीलंडमध्ये पुन्हा अशांतता पसरवून तेथील राजकारणात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न तो करतो आहे. परंतु, विविध धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन तमाकींच्या कृतीचा निषेध केला आणि सांगितले की, न्यूझीलंडची खरी ताकद तिच्या विविधतेतच आहे.
या पार्श्वभूमीवर ब्रायन तमाकी आणि त्यांच्या ‘डेस्टिनी चर्च’ने गैर-ख्रिश्चन धर्मीय आणि स्थलांतरितांविरोधात निदर्शने सुरू केली. दि. २१ जून रोजीदरम्यान झालेल्या निदर्शनावेळी विविध धार्मिक ध्वज जाळण्यात आले. निदर्शकांनी माओरी युद्धनृत्य ‘हाका’ सादर केले. तमाकीच्या म्हणण्यानुसार, जर स्थलांतरित न्यूझीलंडची संस्कृती आत्मसात न करता येथे राहात असतील तर ते अतिक्रमण आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या परिस्थिती अत्यंत वाईट नसली, तरी तमाकी यांच्यासारखे नेते आणि त्यांच्या उत्तेजक विधानांमुळे अस्थिरतेचे वातावरण तयार होत आहे. जर यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर देशाच्या शांतता आणि सामाजिक एकतेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
जर धार्मिक आणि स्थलांतरित समुदायांविरोधात द्वेष वाढला, तर देशाची बहुसांस्कृतिक ओळख धोयात येईल. याचा परिणाम पुढे पर्यटन, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरही होऊ शकतो. गुन्हेगारी आणि हिंसेच्या घटना वाढू शकतात. धार्मिक संघटनांनी सरकारकडे द्वेषपूर्ण भाषणांवर कठोर कायदे बनवण्याची मागणी केली आहे. जेणेकरून अशा घटना थांबवता येतील. न्यूझीलंडने आतापर्यंत सर्व धर्म, जाती आणि संस्कृतींचे स्वागत करून ‘अंब्रेला कंट्री’ म्हणून आपली एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. पण, अशा धर्मविरोधी आंदोलनांनी त्या ओळखीवर गडद सावल्या टाकण्याचा धोका निर्माण केला आहे. सरकारने यावर कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. यासोबतच, समाजातील सर्व घटकांनी एकमेकांप्रति सन्मान, सहिष्णुता आणि संवाद राखणे ही काळाची गरज आहे. एकतेशिवाय शांतता नाही आणि शांततेशिवाय प्रगती नाही. हे सूत्र न्यूझीलंडसारख्या देशासाठी आज अधिक महत्त्वाचे आहे.