हिंदुत्वासाठी तत्पर नाना शिंदे

    27-Jun-2025   
Total Views |

दिव्यांग असूनही त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत हिंदूहितासाठी पुढाकार घेतला. जाणून घेऊया सामाजिक व कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाना आबाजी शिंदे यांच्याविषयी...

मनमाड शहरातील एक उत्साही, सळसळत्या रक्ताचे, कट्टर हिंदुत्ववादी, सामाजिक जाणीव व संवेदनशील वृत्तीचे कार्यकर्ते असे म्हटले की, आपसूकच नाना आबाजी शिंदे यांचे नाव समोर येते. अतिशय संघर्षात बालपण व्यतित केलेल्या नाना शिंदे यांनी, आपल्या आयुष्यात दिव्यंगत्वावर नेहमीच मात केली. किंबहुना ते दिव्यंगत्वाला पुरून उरले. नानांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. जन्मतःच नानांना डावा हात नव्हता, तरीही शालेय जीवनात क्रिकेटसह सर्वच खेळांमध्ये ते आघाडीवर होते. नाना इंडियन हायस्कूलमधून १९८१ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी मनमाड महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यासात फारशी चुणूक जरी ते दाखवू शकले नाही, तरी त्यांनी शिक्षण मोठ्या कष्टाने व जिद्दीने पूर्ण केले. शैक्षणिक प्रवासात नानांचा शालेय पुस्तकांशी फारसा संबंध आला नाही, किंबहुना ते पुस्तकांपासून चार हात दूरच राहिले. परंतु, त्यांना सर्व ज्ञान समाजाने, अनुभवाने दिले.

आपली स्वतःची श्रद्धांजली आपल्या डोळ्यांनी बघितलेले कदाचित जगातील एकमेव व्यक्ती म्हणून नानांचे नाव घ्यावे लागेल. महाविद्यालयीन जीवनात झालेल्या एका अपघातात नाना ज्या रिक्षात बसले होते, ती पुलावरून कोसळली व त्यांच्या निधनाची अफवा सर्वदूर पसरली. महाविद्यालयातील मित्रांनी महाविद्यालयात नानांना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे, त्यादिवशी महाविद्यालयास सुटी देण्यात आली. दुसर्या दिवशी नाना महाविद्यालयात गेले, तेव्हा श्रद्धांजली वाहणारे मित्र नाना रागावेल, या भीतीने पुढील आठ ते दहा दिवस महाविद्यालयात फिरकलेच नाहीत. ‘त्रैलोक्य मित्र मंडळा’च्या माध्यमातून दत्त मंदिर रोडवर गणेशोत्सव, रंगपंचमी, होळी, दहीहंडी आदी उपक्रमांत त्यांचा सर्वाधिक सहभाग असतो. नानांवर बालपणापासूनच संघाचे संस्कार झाले. संघ स्वयंसेवक असलेले नाना कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतातही आले. आपसूकच त्यांची पाऊले श्रीरामजन्मभूमी आंदोलनाकडे वळली. श्रीराम मंदिराच्या शीलान्यास कार्यक्रमाच्या शीला पूजनात, त्यांचा मोठा सहभाग होता. मनमाड शहरासह पंचक्रोशीत शीला पूजनाचे कार्यक्रम करण्यात ते आघाडीवर होते. मनमाड शहरात श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या श्रीरामरथयात्रा संयोजनात, आजही त्यांच सक्रिय सहभाग असतो. ‘ओम मित्र मंडळा’द्वारे आयोजित करण्यात येणार्या रक्तदान शिबिरातही ते सक्रियपणे सहभागी होतात. दिव्यांग असूनही आजपर्यंत त्यांनी किमान १२५ वेळा रक्तदान केले आहे पण, या गोष्टीचा त्यांनी कुठेही गाजावाजा केला नाही. संघातून सुरू झालेला प्रवास पुढे भाजपकडे न जाता, तो शिवसेनेकडे वळला आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. १९९० साली अयोध्या येथे झालेल्या कारसेवेत ते सहभागी होते. दिव्यांग असूनही त्यांनी प्रभू श्रीरामांबद्दल असलेल्या प्रेमापोटी कारसेवेत सहभाग घेतला. १९९१ सालापासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिरीरीने प्रचार केला. मनमाड नगर परिषदेची निवडणूकदेखील लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. पराभव झाला तरी खचून न जाता, त्यांनी काम सतत सुरू ठेवले. शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. शिवसेनेचा शहरातील एक महत्त्वाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख सर्वदूर झाली.

आपल्या आयुष्यात त्यांनी प्रचंड काबाडकष्ट केले. चहाची टपरी चालवली, आंगडियाचे काम केले, पोस्टर लायब्ररी चालवली, धाब्यावर नोकरी केली, पतसंस्थेचे व्यवस्थापकपदही सांभाळले. ‘एसटीडी बूथ’ चालवून, हॉटेलिंगचा व्यवसायदेखील करून बघितला. उदरनिर्वाहासाठी सुरू केलेल्या या सर्व प्रयत्नांमुळे ते अनेक अनुभवांनी समृद्ध झाले. या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ लाभली ती सहचारिणी सविता यांची. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ या गीतातील काव्यपंक्तीप्रमाणे, सविता यांचा सहवास लवकर संपला. पण, आजही नानांची दोन्ही मुले आईच्या संस्कारामुळे स्वतःच्या पायावर उभी आहेत.

पत्नी सविताची आठवण कायम राहावी, यासाठी नाना सरस्वती विद्यालयातील माता-पालक सोहळ्यातील भाग्यवान माता पालकांना पैठणी भेट म्हणून देतात. परिसरातील सर्व हिंदू संमेलनात ते सहभाग घेऊन, हिंदूहितासाठी ते कायम पुढाकार घेतात. परिसरातील भोलेनाथ मंदिरात स्वाध्याय केंद्रही नाना चालवतात. या केंद्रात लहान मुलांकडून दररोज हरिपाठ, मनाचे श्लोक, हनुमान चालिसाचे पठन करून घेतले जाते. या केंद्रात २५ ते ३० मुलं रोज हजेरी लावतात तसेच, सात ते आठ महिलाही या केंद्रात येतात. "कुठल्याही संकटाला तोंड देण्याकरिता स्वतःमध्ये असलेली शक्ती जागृत करावी. जीवन जगताना समाजाने आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, असे काम आपण केले पाहिजे,” असे ते सांगतात. दिव्यांग असूनही आपली वेगळी ओळख निर्माण करत, हिंदूहितासाठी कायम पुढाकार घेणार्या नाना शिंदे यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.