रक्तदान शतकपूर्तीचे ‘मंत्री’

    07-Mar-2023
Total Views |
Ramakant Mantri

मनमाडमध्ये रक्तदानाची मोठी चळवळ उभी करणारे रमाकांत मंत्री. नुकतेच त्यांनी रक्तदानाची शतकपूर्ती केली. त्यांच्या कारर्किदीचा हा समाजोपयोगी प्रवास उलगडणारा हा लेख...

रमाकांत मंत्री यांचे वडील संघाचे स्वयंसेवक यशवंत विष्णू मंत्री रेल्वेत नोकरीला. घरात संघ परिवाराची शिस्त आणि आदर्शमूल्यात रमाकांत मंत्री यांचे संगोपन झाले. मंत्री यांनी नाशिकमध्ये आर. पी. विद्यालयात रा. स्व. संघाचे प्रथम वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या निधनानंतर रमाकांत यांना अनुकंपा तत्त्वावर रेल्वे खात्यात नोकरी लागली. नोकरी करतानाच पुण्याच्या त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवली. याच काळात ’सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन’मधून त्यांनी ’कामगार शिक्षक’ हा विशेष शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यामुळे रमाकांत मंत्री यांना भारतीय मजदूर संघात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रेल्वेतील नोकरीमध्ये ‘इरकॉन कंपनी’द्वारे रमाकांत मंत्री यांना इराकमध्ये जाण्याची तसेच तेथे काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, रमाकांत मंत्री यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनात पहिल्या आणि दुसर्‍या कारसेवेत सक्रिय सहभागही घेतला. डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी ढाँचा पडला, त्या ऐतिहासिक क्षणाचे मंत्री हे साक्षीदार राहिले आहेत. त्या आठवणी सांगताना मंत्री म्हणतात, “दि. ६ डिसेंबर रोजी अयोध्येत नाशिक विभागाच्या निवास व्यवस्थेच्या तंबूत त्यांची राहण्याची व्यवस्था होती.

आम्ही पहाटेच अंघोळ करुन शरयू नदीची वाळू घेऊन प्रतीकात्मक कारसेवा करणार होतो. त्यावेळी काही कारसेवक विवादास्पद ढाँचाभोवती जमा झाले. शरयू नदीतील वाळू टाकून प्रतीकात्मक कारसेवा करण्याचे ठरल होते. मात्र, काही काही कारसेवक ढाँचावर चढले आणि दुपारपर्यंत १ नंतर एक तिन्ही घुमट, चबुतरे पाडण्यात आले. आजही तो ऐतिहासिक क्षण डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. कारसेवेला जाताना प्रत्येक स्थानकावर जाताना आमचे स्वागत झाले आणि दि. ७ डिसेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा देशभर दंगे उसळल्याने ’कर्फ्यू’ लागलेला. आम्ही प्रवास करत असलेल्या बसवर दगडफेकही झाली.”स्वातंत्र्यवीर सावकरकरांचा रमाकांत मंत्री यांच्यावर प्रचंड प्रभाव. मनमाड येथील हुडको वसाहतीला स्वा. सावरकर असे नाव देण्याच्या चळवळीत मंत्री यांनी सक्रिय योगदान दिले. पुढे ते रक्तदान चळवळीशी जोडले गेले. स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी १९८३ पासून पुढे सातत्याने ‘आयएमए’च्या व नंतर जनकल्याण रक्त पेढीच्या रक्तदान शिबिरात रक्तदानातून मानवतेचे कार्य करत आहेत. वयाच्या २२व्या मंत्री त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. त्यावेळी त्यांनी अनिल चांदवडकर, भिकाजी कुलकर्णी, प्रदीप गुजराती, किशोर नावरकर यांच्यासह अनेक तरुणांना सोबत घेऊन ’ओम मित्रमंडळा’ची स्थापना केली. त्यातून गरजूंसाठी रक्तदानाचा यज्ञ सुरू झाला.

मंडळाच्या माध्यमातून रक्तदानासाठी मोठी ‘लोकचळवळ’उभी राहिली. मंत्री यांनी नाशिकसह जळगाव, मुंबईसह अनेक जिल्ह्यात जात गरजू रुग्णांना रक्तदान केले आहे. “त्याकाळी रक्तदानाविषयी समाजात भयंकर भीती होती. रमाकांत मंत्री जेव्हा नगरपालिकेच्या रुग्णालयात रक्तदान करत तेव्हा नागरिक अत्यंत भयप्रद नजरेने त्यांच्याकडे बघत. जणूकाही रक्तदान केल्यानंतर हा व्यक्ती संपणार की काय, असे भाव त्यावेळी लोकांच्या नजरेत असत, असे मंत्री सांगतात. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देता यावे म्हणून १९९६ मध्ये रमाकांत मंत्री यांनी काही स्वयंसेवक सहकार्‍यांना सोबत घेऊन ’संस्कृती संवर्धन समिती’ची स्थापना केली. समितीतर्फे दरवर्षी विवेकानंद व्याख्यानमाला घेतली जाते. गेली २७ वर्षं व्याख्यानमाला अव्याहत सुरू आहे. अनेक दिग्गजांनी व्याख्यानमालेत मनमाडकरांना ज्ञानामृत वाटले आहेत. समितीतर्फे आजही पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर, पाठांतर, चित्रकला, अशा देशभक्तीपर स्पर्धा आयोजित केल्या जातात.रमाकांत मंत्री यांनी वयाच्या ६२व्या वर्षी नुकतीच रक्तदानाची शतकपूर्ती केली. नाशिकमधील जनकल्याण रक्तपेढीतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी मंत्री यांचा यथोचित सत्कार केला.

“रक्तदानाच्या चळवळीत मला शंभरहून अधिक रुग्णांचे प्राण वाचवता आले, याचे समाधान शतकपूर्तीने मिळाले. हा विलक्षण आनंदाचा क्षण होता,” असे मंत्री सांगतात. मनमाडमध्ये कामगार म्हणून सुरू केलेल्या मंत्री यांनी ‘सीनियर सेक्शन इंजिनिअर’ पदापर्यंत यशस्वी वाटचाल केली. भारतीय रेल्वे मजदूर संघटनेच्या माध्यमातून काम करत त्यांना ‘झोनल अध्यक्ष’ पदापर्यंत जाऊन रेल्वे कामगारांचे प्रश्न सोडवले. रेल्वे सेवेंतर्गत नागरिक सुरक्षा संघटनेतही त्यांनी काम केले. त्यात ‘मनमाड प्रमुख’ म्हणून मंत्री यांना सात वर्षे उत्कृष्ट काम केले आहे. ते ‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळा’च्या मनमाड येथील सरस्वती विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष म्हणूनही गेली काही वषेर्र् कार्यरत आहेत. रमाकांत मंत्री हे रा. स्व. संघाचे शहर, तालुका, जिल्हा अशा विविध स्तरांवर कार्य करून आज गेली चार वर्षे प्रांत प्रचार मंडळ सदस्य म्हणून काम करत आहेत. विवेकानंद व्याख्यानमालेतील मान्यवरांची भाषणे लेखी स्वरुपात पुस्तकात रुपात वाचकांना देण्याचा मंत्री यांचा मानस आहे. रमाकांत मंत्री यांना या आणि एकूणच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनस्वी शुभेच्छा.!


 
-निल कुलकर्णी


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.