स्त्रीनं घरातील आपली गरज अबाधित ठेवणं गरजेचं : डॉ. उज्वला बरदापूरकर

    07-Mar-2023   
Total Views |
Dr. Ujwala Bardapurkar

घर, संसार आणि नोकरीच्या रहाटगाडग्यात महिलांचे बरेचदा आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तेव्हा, आज, दि. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांना त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे संतुलित राखता येईल, यासाठी भिवंडी येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ, ‘यश नर्सिंग होम’ आणि ‘सोनोग्राफी सेंटर’मध्ये प्रॅक्टिस करणार्‍या आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन, भिवंडी’च्या प्रेसिडेंट डॉ. उज्वला बरदापूरकर यांच्याशी केलेली ही खास बातचित...


बरेचदा महिला आरोग्याची हेळसांड करताना दिसतात. त्याविषयी तुमची निरीक्षणे आणि अनुभव...


आज जागतिक महिला दिन साजरा करताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, हे कित्येकदा आपण महिलांना सांगतो. पण, मूळात ही वेळच का येते? याचा अर्थ असा की, महिला स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच कुचराई करतात. साधारणपणे,घरात एक स्त्री जेव्हा निरोगी असते, तेव्हा घर नीट चालतं. पण, जेव्हा ती आजारी पडते तेव्हा तुम्ही पाहताच की घराची काय परिस्थिती होते. स्त्रिया सर्वप्रथम आपल्या घरातल्यांचा विचार करतात. सासू-सासरे, नवरा, मुले, आणि त्यानंतर सवड झाली की, मी! तसेच खाण्याच्या बाबतीत, इतरांना देऊन झाल्यावर उरलेच तर स्वतः घेते, नाहीतर स्वतःच्या पानात इवलसं वाढून घेते. हे सगळं करताना तिचं साहजिकच स्वतःकडे दुर्लक्ष होतं. आहारासोबतच औषधपाण्याकडेही पुरेसं लक्ष नसते. ज्यावेळी काळजी घेणं गरजेचं असतं, त्यावेळी महिलांकडून ती घेतली जात नाही आणि म्हणून त्यांना चाळीशी पार करायच्या आतच बरेचसे आजार जडतात. रक्तदाब, मधुमेह, कॅल्शियमची कमतरता यामुळे मग गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास जाणवतो. तसेच मुलं जन्माला घालायच्या वयात, पाळी जायच्या पूर्वी आणि पाळीनंतरच्या वयात महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
 
आज महिलांना धावपळीचं आयुष्य जगावं लागतं, अशावेळी मग त्यांनी त्यांची काळजी कशी घ्यावी?

स्त्री कोणत्याही काळातील असो, कोणत्याही सामाजिक-आर्थिक परिस्थितीला वा कुटुंबातील असो, धावपळ ही तिच्या पाचवीला पुजलेली. स्त्रीने फक्त स्वयंपाक आणि नोकरीसाठी स्वतःची काळजी घ्यावी, असे नाही, तर दर महिन्याला पाळीच्या निमित्ताने कितीतरी रक्त जातं, गरोदर तीच राहते, बाळंतपण, मुलांना पाजतेही तीच. आरोग्य आपण नेहमीच दोन प्रवाहात विभागतो. शारीरिक आणि मानसिक. परंतु, जेव्हा शरीर स्वस्थ असतं, तेव्हाच मनःस्वास्थराहतं. त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती प्रथिनं, कर्बोदके, जीवनसत्व आणि कॅल्शियम हे सर्व योग्य त्या प्रमाणात घ्यायला हवं, त्यासाठी चौरस आहार गरजेचा. आपला भारतीय आहार हा संपूर्ण जगात उत्तम मानला जातो. कारण, त्यात सर्वच गोष्टींचा समावेश असतो. रोज व्यायाम करायलाच हवा. मी रोजच्या तुमच्या कामांना ‘व्यायाम’ अजिबात म्हणणार नाही. व्यायाम हा शरीरापेक्षा मानसिक जास्त व्हायला हवा आणि मुख्यत्वे तो ‘व्यायाम’ म्हणून व्हायला हवा, काम म्हणून नको. तसेच तुपामुळे आनंद निर्माण होतो. कडधान्ये, डाळी, पालेभाजा, फळे, सुकामेवा आणि त्याचबरोबर योग्य तेवढे पाणी शरीराला मिळायला हवे.

रजोनिवृत्ती आणि स्त्रियांचं शारीरिक-मानसिक आरोग्य याविषयी काय सांगाल?
 
रजोनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक काळ. हार्मोन्स बदलत असतात. त्यामुळे बर्‍याचशा शारीरिक तक्रारी सुरु होतात. सांधेदुखी, लघवीच्या समस्या, घाम आल्यासारखे होणे, सोबतीनेच मानसिक त्रास, चीडचीड होणं. त्यावेळी या सर्वातून अडकून न पडता इतर कार्यात स्वतःला गुंतवून घेणं योग्य. याच काळात आपल्याकडे मुलांची लग्न झालेली असतात, ती आत्मविश्वासाने पुढे जात असतात. तेव्हा तिला वाटतं, आता माझी घरातली गरज संपली आहे. नवर्‍यालाही आता माझी गरज उरणार नाही. असं जेव्हा वाटू लागतं, तेव्हा तुम्ही तुमचे राहिलेले छंद जोपासा. प्रवास करा. तुम्ही तुमची तुमच्या घरातली गरज जीवंत ठेवणं गरजेचं असतं. कारण, तुमची इतरांना गरज असणं, हेच तुम्हाला सुदृढ ठेवतं!
 
घर आणि हॉस्पिटल सांभाळताना नेमकी कोणती आव्हानं येतात आणि त्याचा सामना तुम्ही कसा करता?

मी मूळची इचलकरंजीची. लग्न होऊन भिवंडीला आले. यावर्षीच माझ्या वैद्यकीय सरावाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नानंतरही माहेरच्या सारखे साहाय्य कुटुंबीयांकडून मिळाले. मुले लहान असतानासुद्धा मला वैद्यकीय सराव करता आला. त्यात खंड पडला नाही. म्हणूनच माझे सर्व महिलांना एकच सांगणे आहे, एकमेकींची ताकद बना. सुनेला मुलगी समजून वागवा, वहिनीला मैत्रीण समजा, एकमेकांसोबत सलोख्याने जगलात, तरच तुमच्या स्त्रीत्वाचे वैशिष्ट्य टिकून राहील!आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.