खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देत त्यांना खेळाचे अद्ययावत प्रशिक्षण देऊन यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास, साहस, निडरता, चिकाटी, परस्पर आदरभाव, राष्ट्रप्रेम निर्माण करणारे कुशल मार्गदर्शक मॅथ्यू टोनी आणि 35व्या वर्षात पदार्पण करणारी त्यांची संस्था म्हणजेच ज्युदोचे प्रशिक्षण देणारी ठाणे जिल्ह्यातील आघाडीची संस्था डोंबिवलीची ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब विषयी...’
खरं तर मॅथ्यू हे कराटेचे मार्गदर्शक, परंतु कराटेला शासनमान्यता मिळत नसल्याने मॅथ्यू यांनी ‘ज्युदो’ या शासनमान्य ऑलिम्पिक क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण घेण्यास 1988 मध्ये सुरुवात केली. ज्येष्ठ ज्युदो प्रशिक्षक दिवंगत एन. टी. बंगेरा आणि नंतर दिवंगत मनोहर बंगेरा आणि यतिश बंगेरा यांकडे ज्युदोचे धडे गिरवताना मॅथ्यू यांनी आपल्या ’रोमा’ या क्लबमध्ये विद्यार्थ्यांना 1990 पासून ज्युदोचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला व त्यासाठी ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’ची स्थापना केली.
1992 मध्ये ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली होणार्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेचे आयोजन ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’तर्फे पहिल्यांदा करण्यात आले. या शासकीय स्पर्धेतील सहभागाबरोबरच ज्युदोच्या असोसिएशनच्या स्पर्धांमध्येही ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’चे खेळाडू सहभागी होऊ लागले.
काही काळ जाड सतरंज्यांवर ज्युदोचा सराव करणार्या खेळाडूंसाठी मॅथ्यू यांनी पदरमोड करत काथ्याच्या मॅट्स तयार करून घेतल्या. सरावातील सातत्य, मेहनतीची तयारी, चिकाटी, प्रामाणिकपणा हे गुण जर प्रशिक्षकामध्ये आणि त्याच्या खेळाडू शिष्यांमध्ये असतील आणि जोडीला पालकांची सुयोग्य साथ असेल, तर यशाचे शिखर सहज गाठता येते. हेच नेमके घडले ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’मध्ये!
काथ्याच्या मॅट्सवर सराव करत ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’चे जांबाज खेळाडू शासनाच्या व असोसिएशनच्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवू लागले. सीमा बोराडे, गौरी कुलकर्णी, कांचन कुलकर्णी, शारदा नायक, पल्लवी अरकडी, आसावरी पटवर्धन, दिपलक्ष्मी मातवणकर, अमित क्षिररसागर, निखिल पिंगळे, राकेश मेनन, सिद्धेश विचारे, पूर्वा क्षोत्रिय, कश्मिरा गणेश या आणि अशा अनेक ज्युदो खेळाडूंमुळे संस्था नवारूपाला येऊ लागली. राष्ट्रीय स्तरावर नाशिक विभागातून सर्वप्रथम पदक मिळवण्याचा मान पटकावणार्या गौरी कुलकर्णीने आपल्या नावाचा व खेळाचा दबदबा अनेक वर्षे कायम ठेवला. सीमा, कांचन, गौरी, शारदा या खेळाडू ज्या वजनगटात स्पर्धेत खेळत असतील, त्या वजनगटातील मुली घाबरून वजन कमी करून अथवा वाढवून इतर वजनगटांमध्ये खेळण्यासाठी धाव घेऊ लागल्या.
क्लबच्या ज्युदो खेळाडूंनी शासनाच्या व असोसिएशनच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, तर विद्यापीठ व आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्येही सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची मोहर उमटवली. सात - आठ वर्षे काथ्याच्या मॅटवर सराव करणारे खेळाडू 1997-98 पासून ज्युदोच्या मॅट्सवर (तातामी) सराव करायला लागले. अतिशय नाममात्र शुल्क आकारणार्या मॅथ्यू यांनी पुन्हा एकदा पदरमोड करत ज्युदोकांना सरावासाठी हे तातामी उपलब्ध करून दिले. या तातामीवर भरपूर सराव करत पूर्वा मॅथ्यू, सुनंदा नरसिंहन, मानसी पोळ, काश्मीरा मकाणी, समीरा मकाणी, आभा तिवारी, प्रार्थना पै, पूजा गुप्ता, प्रियांका गुप्ता या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे व क्लबचे नाव उंचावण्यास सुरुवात केली.
पूर्वा मॅथ्यूने 1998 मध्ये वयाच्या सहाव्या वर्षी जयपूर येथे आपली पहिली ‘ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया’ची राष्ट्रीय स्पर्धा खेळत कांस्यपदक पटकावले. आणि त्यानंतर 2001 ते 2019 पर्यंत शासकीय व असोसिएशनच्या तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युदोच्या तब्बल 27 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण, सहा रौप्य व दहा कांस्यपदके पटकावली. 2007-08 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत ‘आशियाई युथ ज्युदो स्पर्धे’त भारतासाठी पहिले सुवर्णपदक आणि त्याचबरोबर बेस्ट प्लेअर ऑफ एशिया’ हा 500 यु.एस. डॉलर्सचा पुरस्कारही पटकावला.
खेळाडूंच्या यशासाठी अथक परिश्रम करणारे मॅथ्यू वैयक्तिकरित्याही आपले ज्युदोचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा ‘शोदान ब्लॅक बेल्ट’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. अल्पावधीतच ‘ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया’ची ‘एनडीआयओ’ म्हणजे ‘नॅशनल डिप्लोमा इन ऑफिशिएटिंग’ (रेफरी)ची परीक्षाही उत्तीर्ण झाले. यथासांग मॅथ्यू दुसरी डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले, तर सर्व दृष्टीनेच त्यांच्या सहकारी आणि सहधर्मचारिणी असलेल्या लीना ओक ‘मॅथ्यू ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया’ची पहिली डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. ज्युदोसाठी 34 वर्षे अखंड काम करणार्या मॅथ्यू यांना मानद चौथी डिग्री ब्लॅक बेल्ट आणि लीना यांना मानद तिसरी डिग्री ब्लॅक बेल्ट नुकताच ‘ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे प्रदान करण्यात आला.
जिल्ह्याबरोबर राज्यात व राष्ट्रीय स्तरावरही क्लबच्या खेळाडूंचा दबदबा आता वाढत आहे. ‘ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया’ची तिसरी डिग्री ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पंच असलेली तसेच ‘एनआयएस कोचिंग डिप्लोमा’मध्ये भारतात सर्वप्रथम आलेली आशियाई सुवर्णपदकप्राप्त पूर्वा मॅथ्यू लोकरे आणि राष्ट्रीय खेळाडू, ‘ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया’चा राष्ट्रीय पंच व चौथी डिग्री ब्लॅक बेल्ट असलेला आशुतोष लोकरे आता क्लबची धुरा दुसरी डिग्री ब्लॅक बेल्ट असलेल्या नील मॅथ्यू, अक्षय पवार तसेच पहिली डिग्री ब्लॅक बेल्ट असलेले आर्यन म्हात्रे, हर्ष फापाळे, प्रांजल पुराणिक आणि ज्युनिअर कोच पद्मजा अय्यर, श्रावणी घरत, अनिता आगरकर यांच्या सहकार्याने सांभाळत आहेत आणि पूर्वा-आशुतोष च्या कुशल व अत्याधुनिक मार्गदर्शनाखाली राज्य-राष्ट्रीय स्तरावर क्लबचे खेळाडू यशाची मोहोर उमटवत आहेत. मनवर्धन पाटील सध्या भोपाळ येथे ‘स्पोर्ट्स थॉरिटी ऑफ इंडिया’च्या केंद्रात 2028 व 2032च्या ऑलिम्पिकसाठी असलेल्या एक्सलन्स प्रोग्रॅमअंतर्गत सराव करत आहे. त्याच्याबरोबर प्रेक्षा बोरकर, श्रेया मोरे, तेजस चव्हाण, अमृता गुप्ता, शारव शेट्टी, नमन काला हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त करत आहेत, तर आभा पंडीत, कुश पंडीत, पुष्कर कुलकर्णी, शुभम भंडारी, रुद्र देवस्थळी, अर्णव रायकर, सानिका सकपाळ असे अनेक खेळाडू राज्य स्तरावर पदके प्राप्त करत राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सज्ज आहेत.
मॅथ्यू यांनी ठाणे जिल्ह्यातील ज्युदोला राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी ‘ठाणे जिल्हा ज्युदो संघटने’चे अनेक वर्षे सचिवपद सांभाळताना अथक यशस्वी प्रयत्न केले. त्यांनी सचिवपदाच्या कार्यकाळात शासकीय शालेय राज्यस्तर ज्युदो स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन’च्या अधिपत्याखाली सब ज्युनिअर गटाच्या राज्य ज्युदो स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. अचूक तांत्रिक बाबी, राज्यभरातून आलेल्या खेळाडूंची व तांत्रिक अधिकार्यांची उत्तम भोजन व निवास व्यवस्था यामुळे या स्पर्धा सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल्या आहेत. मॅथ्यू आणि लीना हे दाम्पत्य ज्युदोसाठी घेत असलेली मेहनत बघून ‘महाराष्ट्र ज्युदो संघटने’नी मॅथ्यू यांना त्यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीत स्थान दिले, तर वयाच्या 49व्या वर्षी ज्युदोमध्ये ब्लॅक बेल्ट झालेल्या लीना ओक मॅथ्यू यांना ‘राज्य ज्युदो संघटने’नी त्यांच्या तांत्रिक समितीमध्ये स्थान दिले आणि ही जबाबदारीही या उभयतांनी समर्थपणे सांभाळली. ‘राज्य ज्युदो संघटने’कडून अनेक राष्ट्रीय ज्युदो स्पर्धांसाठी संघ मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक म्हणून सोपवलेली जबाबदारी संघातील खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून यशस्वीरित्या सांभाळली. आता जिल्हा ज्युदो संघटनेच्या तांत्रिक समितीची जबाबदारी उत्तमपणे सांभाळत आहे, ती ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’ची पूर्वा मॅथ्यू लोकरे!
पूर्वा-आशुतोष राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमधून कोच, व्यवस्थापक या भूमिका तर बजावत आहेतच, पण त्याचबरोबर या स्पर्धांमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणूनही जबाबदारीने काम करत आहेत.‘जिल्हा ज्युदो संघटने’च्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणार्या ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’ला अधिक उंचीवर नेऊन ठेवण्याचे महत्त्वाचे काम क्लबचे कोच पूर्वा मॅथ्यू लोकरे आणि आशुतोष लोकरे क्लबच्या इतर सहकार्यांबरोबर सातत्याने करत आहेत. त्यासाठी शिबिरे, सेमिनार, खेळाडूंचा आहार व मानसिक स्वास्थ्य तसेच पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा असे उपक्रम यांचे आयोजन मान्यवर ज्युदो प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, क्रीडामानसतज्ज्ञ यांच्या सहकार्याने करत आहेत. छोट्या ज्युदोकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजनही करत आहेत. नुकत्याच दि. 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या भव्य आंतरक्लब ज्युदो स्पर्धा याचे ठळक उदाहरण आहे.
समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवरांना स्पर्धांच्या निमित्ताने सहभागी करून घेत ज्युदोला अधिकाधिक लोकमान्य करण्याचे काम पूर्वा, आशुतोष, नील, अक्षय, हर्ष, प्रांजल, आर्यन आणि क्लबचे सर्व ब्लॅक बेल्टधारक ज्युदोका प्रामाणिकपणे करत आहेत.
‘कोणी नाही येथे दुर्बल अथवा कोणी नाही हतबल साधनेतूनी आम्ही कमाविले कणखर मनगट प्रखर मनोबल ही उक्ती सार्थ करण्याच्या उद्देशाने मुली व महिलांना स्वसंरक्षणासाठी स्वयंसिद्ध करण्याच्या व्रताचे प्रामाणिकपणे पालन करणार्या मॅथ्यू आणि लीना यांचा हा वसा-वारसा पुढे नेण्याचे काम आता पूर्वा आणि तिचे सहकारी करत आहेत. विविध शाळा, महाविद्यालये, महिला संस्था, कॉर्पोरेट कंपनी, वाहतूक पोलीस इत्यादी ठिकाणी मुली, महिलाच नव्हे, तर मुलगे, पुरुष आणि प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळांचे नियमित आयोजन क्लबतर्फे केले जाते. क्लबची, कोचेसची, खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीची नोंद समाजही घेत आहे. विविध सामाजिक संस्था विविध पुरस्कार देऊन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करत कौतुकाची थाप पाठीवर देत आहेत.
खेळाडूंचे कौतुक करणार्या, त्यांना प्रोत्साहन देणार्या समाजाचे ऋण खेळाडूंनी कायम स्मरणात ठेवले पाहिजे आणि समाजाप्रति आदर, नम्रता, सहकार्य या गुणांची कास धरलीच पाहिजे हा संस्कार देणारे, ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’चे प्रेरणास्थान असलेले व क्लबचा नावलौकिक वाढवताना आधारवडासारखे भक्कमपणे पाठीशी जे उभे होते आणि आपल्या संस्कारपाथेयाने आमच्यातच असल्याची आमची श्रद्धा ज्यांच्यावर आहे, असे दिवंगत सुरेंद्र बाजपेयी यांना ज्युदो क्लबमध्ये देवतास्थानी पूजले जाते, असे लीना सांगतात.
समाजमान्यता मिळालेल्या या क्लबला आता राजाश्रयही मिळू लागला आहे, ज्यामुळे क्लबच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. आणि ते अधिक जोमाने सराव करण्यास सज्ज आहेत. क्लबच्या यशाचा आलेख सतत चढता ठेवण्यासाठी ‘व्हिक्टरी ज्युदो क्लब’ सातत्याने अखंडपणे निश्चय, निष्ठा, नीती या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
निश्चय-निष्ठा-नीती यांचे कंकण
बांधून हाती, पराक्रमाच्या गाथा
गातील विश्वाच्याही मिती