मुंबई, दि. २ : प्रतिनिधी गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदर विभागाने त्यांचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. या प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तर प्रवासाचा वेळ केवळ ४० मिनिटे इतका असेल.
मंत्रालयात सोमवार,दि.२ रोजी वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्या टप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन जलटॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भागांशी मुंबईचे कनेक्टिव्हिटी सुधारेल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या जलटॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. या सेवांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. मुंबईतील जलवाहतुकीच्या या नव्या योजनेमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.