वृक्षप्रेमींची अशीही ‘लिटमस टेस्ट’

    14-May-2025
Total Views | 11
 
litmus test for tree lovers
 
इमारतीच्या आवारातील वृक्षराजींचे, तसेच सोसायटीतील सदस्यांनी कुुंड्यांमध्ये लावलेल्या विविध झाडांचे नेमके काय करायचे, हा प्रश्न इमारतीच्या पुनर्विकासावेळी हमखास उपस्थित होतो. तसाच प्रश्न सुधीर कुलकर्णी यांनाही पडला. या समस्येवर वृक्षप्रेमींनी तोडगा काढला आणि यानुसार एक ‘लिटमस टेस्ट’च झाली. त्याविषयी...
 
दि. 30 एप्रिल रोजी सुधीर कुलकर्णींचा फोन आला. “अरे अजित, आमची इमारत पुनर्विकासासाठी जात आहे. माझ्या फुलझाडांच्या कुंड्या कुठे ठेवता येतील का?” नवरात्रीत त्यांच्याकडे ’गार्डन शो’ झाला. त्यामुळे मला कल्पना होती की, त्यांच्याकडे मोगरा, जास्वंद, चाफा, सोनटक्का अशी भरपूर फुलझाडे आहेत. मी त्यांना सूचवले की, आपण जयप्रकाश उद्यानात लावू. त्यांनाही कल्पना आवडली आणि त्यांनी टेम्पोचे भाडे द्यायचीही तयारी दाखवली.
 
मी लगेचच सोमनाथला टेम्पोसाठी फोन लावला. संध्याकाळी आम्ही त्यांच्या गच्चीत जाऊन झाडे बघूनही आलो. दोन तरी हमाल लागतील, त्यामुळे मी हमाल बघतो, असे सोमनाथने सूचविले. यावेळीही तसेच काहीसे घडले. दोन दिवस झाले हमाल काही दिवस, वेळ आणि मजुरी सांगायला तयार नाहीत. आणखी एक पर्याय म्हणजे मी खैरे यांना टेम्पोसाठी फोन केला. त्यांनी टेम्पो आणि हमाल मिळून हजार रु. खर्च सांगितला. मी ‘डन’ केले. अर्ध्याच तासात त्यांचा फोन, हमाल 500 रु. तयार नाही, झाडे बघितल्याशिवाय मजुरी सांगणार नाही.
 
मी लगेचच गोरेगावातील माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टवर (साधारण हजार गोरेगावकरांना) मेसेज पोस्ट केला, “उद्या सकाळी तासभर कुंड्या बागेत आणण्यासाठी श्रमदान; ज्यांना वेळ असेल त्यांनी मला कळवा.” रात्रीपर्यंत सागर मोरे, अरुण गोसावी, संजीव होंकण आणि हेमा चौधरी यांचा होकार आला. हजारात फक्त चारजण उपलब्ध! चारजणांनी सर्व कुंड्या हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे खैरेंना 9 वाजता टेम्पो आणि हमाल घेऊन बोलावले. रात्री उशिरा यशवंत नाईक यांचा मेसेज आला, “अरे बाबा, कितीजण तयार झाले? बागेत फिरायला येतील ते मदत करतील. माझ्यासारखे लुळे-पांगळे आहेतच मदतीला. कुठे यायचे?” 83 वर्षांचा तरुण बागेतील कुठल्याही कामाला तयार, हेच आपल्याला काम करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा देते. त्यांना रिप्लाय केला, “आजचा मेसेज ही ‘गोपूं’ची ’लिटमस टेस्ट‘ आहे; आपण साद घातली, तर किती ’गोपू’ येतील? का? तुम्ही व्हा पुढे, आम्ही आहोत कपडे सांभाळायला.”
 
पूर्वी संघात ‘आपत्काल’ असा एक प्रयोग केला जायचा. अचानक एखाद्या रात्री निरोप यायचा, उद्या सकाळी अमूक अमूक ठिकाणी जमायचे आहे. निरोप दुसर्‍याला सांगायचा, म्हणजे त्याच्या घरी जाऊनच. कारण, त्या काळी मोबाईल काय, साधे टेलिफोनही नव्हते. उद्देश तोच असायचा, आयत्या वेळी निरोप आला, तर आपली कामे बाजूला ठेवून समाजासाठी प्राथमिकता देणारे किती स्वयंसेवक आहेत, एक ’लिटमस टेस्ट’च! दि. 3 मे रोजी अरुण गोसावी, संजीव होंकण शाखेतच भेटले. सकाळी 7.30 वा. शाखा आटोपल्यावर बागेत गेलो. सागर मोरे वाट बघत होता. सोबत अनिल वालावरकर (अनिलची खासियत म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला वेळेच्या 10 मिनिटे आधी हजर. मग ‘मसुराश्रम’मधील रोजचा योगवर्ग असो की महिन्यातील पहिल्या रविवारचा ’वृक्षमित्र कट्टा.’) मी बागेत फेरी मारली आणि संजय शर्मा आणि शैलेश केणी यांना म्हटले, चला. नाही म्हणता म्हणता आम्ही सातजण इथेच झालो. बागेतून बाहेर पडतोय, इतक्यात अवधूत सामंत जॉईन झाला. ‘समाधान’ बिल्डिंग पाशी गेलो, तर हेमाताई उभ्या होत्याच. आम्ही गच्चीवर जाईपर्यंत डीजे (दिलीप जोशी) आला. कालची चारची संख्या आज दहावर; मोगॅम्बो खुश हुआ!
 
गच्चीत गेलो आणि कुठली झाडे पहिल्यांदा खाली घेता येतील, कुंड्या, प्लास्टिक पिशव्या, आंबा, पिंपळ, शेवगा अशी काही मोजकी मोठी झाडेही होती. एकूण तीन मजले झाडे उतरवायची म्हणून आम्ही प्रत्येक मजल्यावर दोन दोनजण उभे राहून एक एक मजला झाडे खाली पास करत जायचे ठरवले. ‘साथी हाथ बढाना.’ तेवढ्यात आमचा हनुमान (केवल सामंत) हजर झाला. विशेष म्हणजे त्याला ऑफिसला जायचे असूनही तो थोडावेळ श्रमदान करून मग पुढे ऑफिसला निघणार होता. 11 जण झाले आता.
 
अरुणा कुलकर्णी आणि सुधीर कुलकर्णी यांनी गेली 25-30 वर्षे जपलेली ही बाग. आपली मुलगी लग्नानंतर सासरी जाते, तशाच भावना त्यांच्या मनात होत्या. पण, कन्यादान करायचे म्हणजे, दोघांनीही कंबर कसली. कुंड्या खाली न्यायला सुरुवात केली. बहुदा ते झाडांच्या कानांत सांगत होते, ‘दिल्या घरी तुम्ही सुखी राहा.” अर्ध्या तासात अर्धी गच्ची खाली झाली. मला साधारण अंदाज आला की, पुढील अर्ध्या तासात काम संपेल आणि टेम्पो वेळेत आला, तर वरात काढायला मोकळे. तेवढ्यात यशवंत नाईक आणि समीर नवघरे आले. समीरजींना म्हटले, “तुम्ही जरा समोसे घेऊन या.” ते बिल्डिंगमधून बाहेर पडताना म्हटले, “जिलबीपण आणा.” (अनिल गोड सोडून बाहेरचे काही खात नाहीत, हे डोक्यात होते.) एवढ्या कामाची कुणालाच सवय नसते. सगळ्यांनीच थोडी विश्रांती घेतली आणि घोट घोट पाणी घेतले. मी खैरे यांना फोन केला; पण ते अजून ऐरोलीतच होते. लक्षात आले, यांचा टेम्पो काही मिळणार नाही. लगेचच सोमनाथला फोन लावला. बहुदा माझ्या फोननेच त्याची सकाळ झाली असावी! त्याला म्हटले, “झाडे सगळी खाली आली आहेत. तू लगेचच टेम्पो घेऊन ये.”
 
विश्रांतीनंतर पुन्हा कुंड्या उतरवायला सुरुवात झाली. एवढ्यात ‘मराठा लाईट इन्फ्रंटी’चे कमांडो गणेश गावकर आले. एक तर ते कमांडो. नियमित बागेत व्यायाम आणि ताज्या दमाचे. त्यामुळे त्यांनी आल्या आल्या शेवग्याचे मोठे झाड आणि मग आंब्याचे मोठे झाड एकट्याने खाली आणले. थोडक्यात ‘सो सुनार की, एक लुहार की।’ मग काय, पुन्हा सगळ्यांच्यात जोश संचारला. मध्ये विश्रांतीमुळे आणि पाण्यामुळे थोडी एनर्जी रिस्टोअर झाली होती. कुणीतरी कुजबुजले, “नाश्ता आलाय हं.” मला लगेच अरुण गोसावीने विचारले, “चहा आहे ना?” आधीपासून नियोजन केले नसल्यामुळे चहा सांगायचा राहून गेला होता. लगेचच हनुमानाला म्हटले, “जा रे पटकन; बाईकवरून जा आणि महिन्दर चहावाल्याकडून किटली घेऊन ये.” पुढील 10-15 मिनिटांत सगळी गच्ची खाली झाली. तासाभरात जवळपास 55-60 झाडे उतरवली की हो! टाकीतील शिल्लक पाण्याने हात धुतले आणि समीरजींना म्हटले, “उघडा पुड्या.” त्यांनी वडे, समोसे आणि जिलबी आणली होती. माणसांपेक्षा नग जास्तच होते. त्यामुळे सगळे तुटून पडले. सगळेच उत्तम होते. तेव्हा कुणीतरी म्हणाले, “एवढी मेहनत झाल्यावर सगळेच गोड आणि चविष्ट लागते.”
 
हेपण खरे आहे. नाश्त्याला सुरुवात केली आणि केवळे चहाची किटलीही घेऊन आला. सोमनाथही टेम्पो घेऊन आला. चहा-नाश्ता आटोपल्यावर दोघेजण टेम्पोत कुंड्या भरू लागले आणि बाकी फौजेने बागेकडे कूच केली. टेम्पोच्या दोन राऊंड झाल्या, इतकी झाडे होती. लगेच रामपालला (तोही उत्तर प्रदेशचाच) सांगून पाणी चालू केले आणि ट्यूबने पाणी फवारले. सगळे गेल्यावर सोमनाथला हळूच विचारले, “टेम्पोचे किती भाडे देऊ रे?” टेम्पो श्रीनिवास शाकाचा. तोही समाजकार्य करतो आणि हे समाजाचेच काम. त्यामुळे त्यांनी काही पैसे घेतले नाहीत. केवलने चहाचे पैसे भरले आणि समीर यांनी नाश्ता ‘स्पॉन्सर’ केला. थोडक्यात, झाडांचे ’शिफ्टिंग’ ‘झिरो बजेट’मध्ये पार पडले.
 
वृक्षमित्र जिंदाबाद!
 
- अजित वर्तक 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121