विक्रोळी उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण

उर्वरित कामे येत्या लवकरच पूर्ण होणार; लवकरच पूल वाहतुकीस खुला होणार

    02-Jun-2025
Total Views |

vikhroili flyover


मुंबई,दि.२ : प्रतिनिधी 
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवेउभारणी कामे प्रगतिपथावर आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व - पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात आली आहे.

या पुलाच्या एकूण १९ स्तंभांपैकी पूर्वकडील बाजूस १२ तर पश्चिमेकडील बाजूस ७ स्तंभ उभारले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते , मार्गिकांवरील कॉंक्रिट, मास्टिक, ध्वनी रोधक, अपघातरोधक अडथळा ही सर्व कामे दि. ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसात एका बाजूकडील ध्वनिरोधक, रंगकाम आणि पश्चिमेकडील बाजूवर मार्ग रेषा आखणी आदी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. रस्ते आणि वाहतूक विभागाने पश्चिमेकडील बाजूवर वाहतूक थांबा क्षेत्र तयार केले आहे. सध्या वाहतूक बेट उभारण्यात येत आहे. वाहतूक दिवे अर्थात सिग्नल बसवायचे काम सुरू आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे .