
मुंबई: भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट म्हणून ओळख असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जनेप प्राधिकरण) ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. जनेप प्राधिकरणाने शनिवार, २१ जून २०२५ रोजी जनेप प्राधिकरण टाउनशिप, उरण येथे “योग संगम” या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या भव्य योग सत्राचे आयोजन केले. यंदाच्या वर्षी या उत्सवाची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्य याकरता योग’ ही होती.
महाराष्ट्राची नोडल समन्वयक संस्था असलेल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, वरळी, मुंबई (आरआरएपी) यांनी समन्वयित केलेल्या या योग सत्रात सहभागी होण्यासाठी जनेप प्राधिकरण टाउनशिपमधील १६,५०० चौ.मी.क्षेत्रफळावर पहाटे जवळपास १०,००० लोक एकत्र आले होते. या दिवसाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन आणि पाठबळ म्हणून, सर्व सहभागींना ‘योगा किट’ प्रदान करण्यात आले.
पहाटे ६ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी महासंचालक उन्मेष शरद वाघ यांच्य उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्टचे सर्व विभागप्रमुख, विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
''योग संगम सारख्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सवाचे यजमानपद मिळणे हा जनेप प्राधिकरणासाठी अभिमानाचा क्षण आहे. पहाटेच्या वेळी हजारो सहभागींचा उत्साह, ऊर्जा आणि सजगता यांचा संगम घडवणारा हा योग दिन खरोखरच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मूळ औचित्याचे प्रतिबिंब आहे. या योग उद्यानाच्या शुभारंभासह, केवळ एका दिवसाच्या उत्सवाच्या पलीकडे, निरोगीपणा हा आपल्या समुदायाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होईल अशी आम्हाला आशा आहे.”
- उन्मेष शरद वाघ, जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष व व्हीपीपीएलचे अध्यक्ष