मुंबई :पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईतील लोकलसेवेवर होतो. अनेकदा पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ट्रॅकवर पाणी साचून मुंबईची लोकल सेवा रखडते. हेच पाहता मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नालेसफाई आणि इतर पावसाळापूर्व तयारी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने भुयारी नाल्यांच्या सफाईवर निरीक्षण ठेवण्यासाठी तरंगते कॅमेरे आणि थेट काल्वर्टमध्ये जात निरीक्षण करू शकणाऱ्या कामेरी मदत घेतली आहे. पावसाळ्यात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही विना अडथळा सेवा देण्यासाठी पश्चिम रेल्वे विविध उपाययोजना करत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
मान्सूनपूर्व तयारीमध्ये पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून नालेसफाई, भुयारी नाल्यांची सफाई, छोट्या बोगद्यांची बांधणी, उच्च क्षमता असणारे पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यासर्व तयारीमध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे अशा नाल्यांची सफाई जे वरून झाकलेले असतात, त्यांच्या आतमध्ये निरीक्षण करणे अवघड असते. अशा नाल्यांमध्ये आणि ट्रक खालून गेलेल्या नाल्यांमध्ये सफाईसाठी यंदा सार्वधिक तंत्रज्ञानाचा वापर पश्चिम रेल्वेने केला आहे. यात हाय डेफिनेशन वायरलेस ड्रेन कॅमेरा, मॅनहोल कॅमेरा वापरात आणला जात आहे. हे कॅमेरा भुयारी नाल्याच्या टोकाजवळ आत सोडले जातात. या कॅमेराची रेंज ही किमान १ किलोमीटर अंतरापर्यंत जाते. या कॅमेराच्या मदतीने या भुयारी नाल्यांमधील सद्यस्थिती टिपली जाते. यातूनच खात्री होते की पाणी वाहून जाण्याच्या मार्गात कोणताही अडथळा तर नाही ना? यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी समर्पित टीम आहे. ही टीम एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणावर असे संपूर्ण मार्गिकेवर सतत लक्ष ठेऊन असतात. ही संपूर्ण टीम कौशल्यपूर्ण आणि समर्पित आहे. त्यांच्या सतत निरीक्षणातून माहिती मिळत असते. यानंतर दुसरी टीम एखाद्या ठिकाणाहून काही अडथळा किंवा तक्रार आली तर तात्काळ ती दुरुस्त करण्यासाठी किंवा स्वच्छता करण्यासाठी काम करते.
याव्यतिरिक्त, रिमोटने नियंत्रित होणारे ड्रेन कॅमेराही वापरात आहेत. जे ड्रेनवर तरंगत आतमध्ये पर्यंत सोडले जातात. यातूनही या नाल्याच्या सफाईची परिस्थिती दिसून येते. तसेच, पाण्याची पातळी तपासणे, पावसाचे प्रमाण तपासणे यासाठी तंत्रज्ञान वापरात आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी असे पूल आहेत ज्यावर सतत पाणी पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. अशाठिकाणीही तंत्रज्ञानाच्या मदतीने पाणी पातळीवर लक्ष ठेवले जाते. या सर्व प्रणाली कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत आहेत. याचा रिअल टाइम डेटा आणि संदेश सतत येत असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.