मुंबई : राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंडळाच्या स्वमालकीच्या २६४० बसेस घेण्यात आल्या आहेत. यातील १७२७ बसेस प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती दिली.
दरम्यान, अहिल्यानगर, नागपूर, सांगली, परभणी, सोलापूर, मुंबई, ठाणे, बीड, जळगांव, पुणे, नांदेड, भंडारा, अमरावती, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, इत्यादी जिल्ह्यामध्ये तसेच चिपळूण येथील एसटी बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आवश्यक क्षमतेपेक्षा कमी बस, बसेसची दुरवस्था तसेच कालबाह्य झालेल्या नादुरुस्त बसेस यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करुन नादुरुस्त व जप्त केलेल्या, सर्वाधिक आयुर्मान पूर्ण झालेल्या भंगार बस गाड्या निष्कासित करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, राज्यातील दुर्गम भागांमध्ये व गड किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटन वाढीच्या दृष्टीने मिनी बस सेवा सुरू होण्याबाबत तसेच विशेष ग्रामीण सेवा, मिनी बस अथवा साप्ताहिक फेऱ्या सुरू करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा. उपमुख्यमंत्री यांना माहे जानेवारी, २०२५ मध्ये लेखी निवदेन दिले आहे का?, असे प्रश्न राज्याच्या विविध जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केले होते.
याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी लेखी उत्तरात, बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंडळाच्या स्वमालकीच्या २६४० बसेस घेण्यात आल्या आहेत, आजअखेर यातील १७२७ बसेस प्राप्त झाल्या आहेत. तसेच स्वमालकीच्या ३००० नवीन साध्या बसेस घेण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. रा.प. बसस्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निधी तसेच सार्वजनिक खाजगी सहभाग (पीपीपी) तत्वावर विकसनाचे नियोजन आहे, अशी माहिती दिली.