मुंबई : ठाण्यातील कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून आता या मार्गावरील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि सुरक्षित होणार आहे. मेट्रोशी संलग्न असणारा हा उड्डाणपूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साकार झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे कासारवडवली उड्डाणपूलाचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी खुला झाला आहे.
दळणवळण क्षमता वाढवणारा प्रकल्प
ठाणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, वसई, विरार यामधील वाहतूक या पुलामुळे अधिक सुलभ होणार आहे. याचसोबत घोडबंदर रोडवरील जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षणीय कमी होईल. गुजरात–जेएनपीटी आणि वाशी–ठाणे दरम्यानच्या आंतरराज्यीय व कार्यालयीन वेळेतील प्रवाशांसाठी प्रवास आता या नव्या पुलामुळे अधिक गतीमान झाला आहे. याचसोबत गायमुख ते वाघबीळ दरम्यान नवीन भूमिगत मार्गामुळे वाहतूक अखंड व सुरळीत झाली आहे. सातत्याने वाहतूक कोंडी असणाऱ्या घोडबंदर रोडवरील प्रवासाचा कालावधी कमी होऊन सरासरी वेग वाढणार आहे. दररोज प्रवास करणारे नागरिक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना या पुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पुलाची तांत्रिक वैशिष्ट्ये
- २ लेन रचना
- ७.५ मीटर रुंदी
- २x२ अंडरपास
- एकूण रॅम्पची लांबी: ७२१ मीटर
- ७३,३३३ पीसीयूपर्यंत वाहतूक हाताळण्याची क्षमता
हा स्वप्नवत क्षण प्रत्यक्षात उतरला याचे समाधान
आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माझ्या हस्ते पार पडले. लोकप्रतिनिधी या नात्याने घोडबंदर, गायमुख, कासारवडवली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी पाठपुरावा करत होतो. आज हा स्वप्नवत क्षण प्रत्यक्षात उतरला याचे समाधान आहे. उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूची मार्गिका आजपासून खुली झाली असून, उजव्या बाजूचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करत राहणार.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री