संजय राऊतांकडून शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव! बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
23-Jun-2025
Total Views | 94
मुंबई : शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव मांडला होता, असा गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या विधानाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनासुद्धा आमच्यासोबत गुवाहाटीला यायचे होते. परंतू, जवळपास ३० ते ३५ आमदारांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे ते एकनाथ शिंदेंवर एवढी टीका करतात, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
त्यानंतर आता या विधानाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, "संजय राऊत यांनी शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण एकनाथ शिंदेंनी तो प्रस्ताव फेटाळला. संजय राऊतच सर्वात आधी फुटणार होते," असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे ४० आमदारांना सोबत घेत बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. दरम्यान, खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंचेच असल्याचा निकालही न्यायालयाने दिला. तेव्हापासूनच या दोन्ही पक्षांतील नेते सातत्याने एकमेकांवर आगपाखड करत असतात. मात्र, आता गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्या दाव्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.