मुंबई, दि. २ : विशेष प्रतिनिधी मेट्रो ४ वडाळा–गाईमुखअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या कापुरबावडी स्थानक प्रकल्पामध्ये एका रात्रीत ८ यू-गर्डर्स यशस्वीरित्या स्थापित करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिरकरणाने दिली आहे. ही कामगिरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील एक महत्त्वपूर्ण प्रगतीचा टप्पा म्हणून नोंदविण्यात आली आहे. हे स्थानक मेट्रो मार्ग क्रमांक ५ (ठाणे–भिवंडी–कल्याण) सोबत एकात्मिक होणारे प्रमुख स्थानक असून तत्वज्ञान विद्यापीठ जंक्शन येथे विकसित केले जात आहे. एका रात्रीत या मार्गासाठी एकूण ८ गर्डर्स उभारत मुंबई मेट्रोने नवा विक्रम रचला आहे. यातील प्रति गर्डर वजन ९७.९२ मेट्रिक टन इतके आहे. तर एकूण वजन ७८३.३६ मेट्रिक टन इतके आहे.
या कार्यासाठी एकूण ९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते, ज्यामध्ये २८ रिगर्स, १० कुशल कामगार, २० अकुशल कामगार तसेच ३५ वाहतूक समन्वय अधिकाऱ्यांचा समावेश होता. कार्याच्या सुरक्षित आणि कार्यक्षम अंमलबजावणीसाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री वापरण्यात आली, ज्यामध्ये ५५० टन क्षमतेची १ क्रेन,५०० टन क्षमतेच्या ३ क्रेन्स, ४ मल्टी-अॅक्सल वाहने, ४ व्होल्वो पुलर्स, ११ काउंटरवेट ट्रेलर्स, ६ मॅनलिफ्ट्स, ६ फराणा क्रेन्स, ४ आयशर ट्रक्स आणि ४ एस्कॉर्ट वाहने यांचा समावेश होता.
हे काम चालू वाहतुकीमध्ये सुरक्षित आणि अचूक उभारणी करत संबंधित वाहतूक विभागाशी प्रभावी समन्वय साधत करण्यात आल्याने या प्रकल्पाने शहरी मेट्रो बांधकामात नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे ही प्रगती अभियांत्रिकी उत्कृष्टता, ऑपरेशनल अचूकता आणि अखंड टीमवर्क प्रतिबिंबित करते. मुंबई महानगर क्षेत्रातील भविष्यातील प्रवास जलद, पर्यावरणपूरक व अधिक जोडणीसह वाटचाल वेगवान करतो, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.
📍कापुरबावडी स्थानकाची संक्षिप्त माहिती
* स्थान: घोडबंदर रोड, ठाणे
* लांबी: १८५ मीटर
* संरचना: ३ लेग्ड पोर्टल फ्रेम
* भूमिका: मेट्रो मार्ग ४ व ५ साठी परस्पर जोडणी सुलभ करणारे स्थानक (ठाणे - भिवंडी )
🚇 मेट्रो मार्ग क्रमांक ४ – प्रमुख वैशिष्ट्ये
* एकूण लांबी: सुमारे ३५.२ किमी
* एकूण स्थानके: ३२
* कॉरिडॉर प्रकार: उच्च क्षमतेसह पूर्णपणे स्वयंचलित
* गाडी रचना: ८ डब्यांची (१८२ मीटर), स्टँडर्ड गेज
* ट्रॅक प्रणाली: स्वयंचलित डेपोसह बॅलेस्टलेस
* सिग्नल प्रणाली: CBTC (GoA-4), UTO/DTO यांसह सुसज्ज
* विद्युत पुरवठा: २५ केव्ही AC ओव्हरहेड
* ऊर्जा व ट्रॅक्शन नियंत्रण: SCADA प्रणाली
* भाडे संकलन प्रणाली: स्वयंचलित (AFC)
* दूरसंचार प्रणाली: CCTV, PAS, PIDS, TETRA रेडिओ, IP फोन यांसह अत्याधुनिक प्रणाली