पुन्हा सावरकर...

    30-Mar-2023
Total Views |
Swatantryaveer Savarkar

राजकीय सोयीसाठी आम्ही आमच्या एकसंध समाजाचे किती तुकडे करणार आहोत? सत्तेच्या साठमारीत आमच्या देशाच्या महापुरुषांचे सातत्याने चरित्र हनन करताना, येणार्‍या पिढ्या पुढे कोणतेही आदर्श शिल्लकच राहणार नाहीत, याची जाणीव, आजच्या समाजमाध्यमांना, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या राजकीय नेत्यांना राहिलेली नाही, असेच खेदाने म्हणावे लागते.

मागील आठवड्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडली. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे बदनामीच्या खटल्यात सुरत न्यायालयात दोषी आढळल्याने त्यांना दोन वर्षे कारावास आणि सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही, असा निवाडा दिला गेला. त्याचा परिणाम म्हणून लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रद्द करणारा अध्यादेशही काढला. यावरून काँग्रेस व अनेक विरोधी पक्षांनी न्यायालयात तसेच रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. या राजकीय घडामोडी, शह-काट-शह हे चालूच राहणार आहेत. पण, या संपूर्ण प्रकरणात कोणतेही कारण नसताना पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना लक्ष्य केले. मागील अनेक वर्षांपासून राहुल गांधी हे एवढे एकच काम इमानेइतबारे करताना दिसतात. या बेताल आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे आपण काय करीत आहोत, याची त्यांना उमज नक्कीच नाही. नाहीतर त्यांनी सातत्याने सावरकर आणि संघावर अश्लाघ्य टीका टाळली असती. तसेच अगदी परवा ’ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांनीदेखील असेच एक विधान केले आहे. नेमाडे म्हणतात की, “धर्म आणि राष्ट्रीयत्व या दोन संकल्पनांनी देशाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. या देशाला राष्ट्र म्हणून जे अनेक घटक ओळख देतात, त्या संकल्पनांना व प्रतीकांनाच उद्ध्वस्त करण्यात काही लोकांचा सातत्यपूर्ण सहभाग दिसतो.”

‘राष्ट्रवाद’ या ग्रंथात, राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी घटक सांगताना इतिहासकार जी. पी. गूच असे म्हणतात की, “एकच राजकीय पूर्वचरित्र, एकच राष्ट्रीय इतिहास, त्या इतिहासातून घेतलेल्या आठवणींचा एकच ठेवा आणि त्याच भूतकालीन घटनांबद्दल वाटत असलेला सामुदायिक अभिमान नि अवमान, आनंद वा दुःख, हे राष्ट्रीयत्वाचे सर्वाधिक प्रबळ घटक आहेत.” या प्रदेशाला राष्ट्रीयत्व देणारे प्रमुख घटक म्हणजे आमचा राष्ट्रीय इतिहास आणि हिंदू संस्कृती वा हिंदुत्व होय. या देशाच्या कानाकोपर्‍यात हे दोन प्रमुख घटक आढळून येतात. स्वातंत्र्य पूर्व काळातील आमचा इतिहास एकच होता आणि आहे. पण, आज आमच्या देशाच्या राजकारणात त्याची काय अवस्था झालेली दिसते? आज आसामचा बडफूकन महाराष्ट्र राज्यातील सामान्य माणसाला माहिती नसतो. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे महाराष्ट्राबाहेरील माणसांना माहीत नसतात. पहिले बाजीराव पेशवे, तर महाराष्ट्रातदेखील चुकीच्याच पद्धतीने सांगितले जातात, तर इतर प्रांतांची काय कथा. काश्मीरचा ललितादित्य, केरळमधील सामान्य माणसाला माहिती असण्याची शक्यताच नसते. शालेय अभ्यासक्रमात फक्त आणि फक्त मुघलांचा इतिहास शिकवला जातो. भावनिकदृष्ट्या त्या-त्या प्रदेशातील अस्मिता या जास्त टोकदार असतात, हे जरी मान्य केले तरी त्या पलीकडे एक राष्ट्रीय अस्मिता जपणे आवश्यक असते. राजकीय सोयीसाठी आम्ही आमच्या एकसंध समाजाचे किती तुकडे करणार आहोत? सत्तेच्या साठमारीत आमच्या देशाच्या महापुरुषांचे सातत्याने चरित्र हनन करताना, येणार्‍या पिढ्या पुढे कोणतेही आदर्श शिल्लकच राहणार नाहीत, याची जाणीव, आजच्या समाजमाध्यमांना, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या राजकीय नेत्यांना राहिलेली नाही, असेच खेदाने म्हणावे लागते.
 
मुद्दा सातत्याने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मरणोत्तर पाणउतारा करण्याचा आहे. सावरकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान, सोसलेले कष्ट, राहुल गांधींना व त्यांच्या सल्लागारांना माहिती नसतील, असे नाही. नेमाडेंना देश आणि राष्ट्र यांतील फरक कळत नसतो, असे नाही. पण, आपली राजकीय विचारधारा व संस्कृती आज जर जीवंत ठेवायची असेल, तर सतत सावरकरांना उणेदुणे बोलणे त्यांना आवश्यक वाटते. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आणि आजही या देशात दोन ठळक राजकीय विचारप्रवाह अस्तित्वात होते. एक गांधी-नेहरू यांचा सर्वधर्मसमभाव सांगणारा विचारप्रवाह. दुसरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदू राष्ट्रवादी विचारप्रवाह. गांधी-नेहरूंचा विचारप्रवाह असे मानतो की, हा प्रदेश हा हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा विविध धर्मीयांचा देश आहे. त्यामुळे या प्रदेशाला राष्ट्र बनविण्यासाठी ते सर्वधर्मसमभाव, विविधतेत एकता, वगैरे घटक अग्रक्रमाने घेतात. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती, हिंदू जीवनदृष्टी, भारतीय भाषा (संस्कृत) या राष्ट्र घडवणार्‍या घटकांना एकतर सरळ नाकारतात किंवा गौण ठरवतात. या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून मग महत्त्वपूर्ण घटक नाकारून गौण घटकांचा उदोउदो या देशात सुरू झाला. त्यामुळेच अपघाताने स्वतःला ‘हिंदू’ म्हणणार्‍या जवाहरलाल नेहरूंना गांधीजींनी निवडणूक निकालाच्या विरोधात जात पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केले. सुभाषचंद्र बोस, गांधीजींच्या मर्जीविरुद्ध काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हादेखील हिंदुत्व समजणारा, त्याची बूज राखणारा आणि आपले निर्णय गांधींच्या मनाविरुद्ध घेत, पण बहुसंख्य हिंदूंचे हित साधणारा माणूस म्हणून त्यांना सक्तीने पायउतार केले गेले, हे आणखी एक उदाहरण वाचकांच्या लक्षात असेलच.


 गांधी-नेहरू तत्त्वज्ञान इतर धर्मीयांना लहान भाऊ मानणारे आहे. यातूनच या लहान भावांच्या दुर्गुणांवर सतत पांघरूण घातले गेले. खरंतर गांधी-नेहरू तत्त्वज्ञानाचे तीन-तेरा काळाच्या ओघात स्वातंत्र्यप्राप्तीबरोबरच वाजू लागले होते. या लहान भावाने आपला हिस्सा पाकिस्तानच्या रूपाने पदरात पाडून घेतला तेव्हा एकूण लोकसंख्येत मुस्लीम लोकसंख्या फक्त आठ ते दहा टक्के एवढीच होती. सिंध प्रांत, पंजाबचा काही भाग, आजचा बांगलादेश येथे ते फक्त बहुसंख्य होते, त्या बळावर इस्लामने या देशाचा लचका तोडला, पाकिस्तान मिळवला. एवढ्याने इस्लामची भूक भागली नाही, त्याने काश्मीर घशात घालण्याचे सगळे प्रयत्न केले. हे दिसत असूनही गांधी-नेहरू तत्त्वज्ञान व त्या आधारे सत्ता मिळवणारे, या तत्त्वज्ञानात योग्य ते बदल करण्यास वा सोडण्यास तयार झाले नाहीत. यातच मग सत्तेसाठी एकगठ्ठा मतं मिळवून देणारे हातखंडे प्रयोग केले गेले. ‘हज हाऊस’ उभारणी, हज यात्रेसाठी ‘सबसिडी’, घटनेचा आधार नसलेले ‘वक्फ बोर्ड’, अल्पसंख्याक आयोग, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ हे उफराटे प्रयोग करून सत्ता राखली गेली. यातूनच मग देशातील संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे, असे विधान करताना ‘सेक्युलर’ देशाच्या पंतप्रधानपदी बसलेले असतानादेखील, मनमोहन सिंग यांना काहीही वावगे वाटले नाही. तुम्ही काहीही केले, तरी इस्लामची ’जर, जोरू आणि जमीन’ यांची भूक शमणारी नाही आणि गांधी-नेहरू तत्त्वज्ञान म्हणजे सर्वधर्मसमभावाच्या आवरणाखाली मुस्लीम लांगूलचालन हे गांधी-नेहरू विचारांचे फोलपण जनतेला, उशिराने का होईना, पण आता चांगलेच समजून येऊ लागले, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.


या देशातील दुसरा विचारप्रवाह हा सावरकरांच्या विचारांचा म्हणजे हिंदूराष्ट्रवादी विचारांचा प्रवाह. सावरकर विचारप्रवाह असे मानतो की, हा प्रदेश मुख्यत्वे हिंदूंचा आहे. इथे अनादी काळापासून हिंदू समाज व त्या समाजाने डोळसपणे निर्माण केलेली संस्कृती नांदते आहे. हा हिंदुस्थान आहे. हिंदू मुळात सहिष्णू आहे. इतर धर्मांचा आदर करणारा आणि इतर धर्मीयांचे सहअस्तित्व स्वीकारणारा, उदार असा धर्म आहे. मात्र, येथील संस्कृती, निसर्ग, जीवनविषयक तत्त्वज्ञान, कलाविषयक विचार यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. ही गरज प्रामुख्याने एकेश्वरवादी, मध्य-पूर्व व पाश्चात्य आक्रमक धर्मांनी निर्माण केली आहे. या मुस्लीम व ख्रिश्चन धर्मांना येथील संस्कृती नष्ट करून त्या ठिकाणी त्यांची वैचारिक गुलाम असलेली संस्कृती स्थापन करायची आहे. त्यामुळे याला विरोध करण्यासाठी, आता आम्ही हिंदुत्व हा पवित्रा घेतला आहे. तेव्हा या मातीशी, संस्कृतीशी, जीवनपद्धतीशी तादात्म्य न पावता, तिला अनैसर्गिकरित्या, अनैतिक पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या विचारधारांनी स्वतःमध्ये परिवर्तन केले पाहिजे, अशी भूमिका घेणारा हा विचारप्रवाह आहे आणि आज तो व्यवस्थेच्या सत्तास्थानी आहे. त्यामुळेच आज आम्हाला या देशाची मूळ संस्कृती संवर्धित होताना दिसते. श्रीराम मंदिर उभारणी, महाकाल लोक उज्जैन, काशिविश्वनाथ कॉरिडॉर, ‘कलम ३७०’ रद्द होऊन काश्मीर या देशाचा अविभाज्य भाग आहे हे जाहीर होणं, हे प्रत्यक्षात येते आहे. या सर्व गोष्टी गांधी-नेहरू तत्त्वज्ञानाच्या पराभवाची साक्ष देणार्‍या आहेत. त्यामुळे जर गांधी-नेहरू तत्त्वज्ञान जीवंत ठेवायचे असेल, तर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू राष्ट्रवाद यांना सतत उणेदुणे बोलणे भाग आहे. हा राहुल गांधी यांच्यासारख्या लोकांचा व काँग्रेसी राजकीय विचारसरणीच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. म्हणून स्वातंत्र्य वीर सावरकरांना सतत उणेदुणे बोलणे राहुल गांधी व काँग्रेस बोलताना दिसतात.



-डॉ. विवेक राजे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.