पेणमधील वंदनीय मातृशक्ती!

    23-Jan-2023   
Total Views |
Vasanti Dev


पेण, रायगडमधील सामाजिक स्थितीवर लक्ष केंद्रित करून समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणार्‍या वासंती देव. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सारांश रूपात घेतलेला हा मागोवा...

१९९२ साल होते ते... पेणमधून वासंती देव अयोध्येत कारसेवा करायला दोनवेळा गेल्या. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्या, सख्यांसोबत त्यांनी पेण गावात श्रीरामजन्मभूमी अयोध्येतील कारसेवेबाबत जनजागृती केली होती. पेणमधील आडवळणाच्या गावामध्ये प्रभू श्रीरामांच्या नामाने चेतना जागृत झाली होती. बाबरी ढाँचा पाडल्यानंतर देशभरात पोलिसांनी चौकशी आणि पुढील कारवाईचे सत्र सुरू केले होते. त्या अंतर्गत वासंती यांचीही चौकशी झाली. त्यांना पोलिसांनी सांगितले, “तुम्हाला आम्ही सांगू तेव्हा पोलीस स्थानकात हजर राहावे लागेल. तुमच्यासोबत आणखीन कोण महिला होत्या? त्यांचे नाव-पत्ता द्या.” यावर वासंती देव म्हणाल्या, “त्या आयाबायांची चौकशी करण्याचे काही कारण नाही. काही कारवाई करायची असल्यास माझ्या एकटीवर करा.


धर्माच्या कामासाठी अटक केली आणि तुरूंगात टाकले तरी चालेल. मी तयार आहे. ही पाहा माझी बॅगही भरून ठेवलेली आहे.” वासंती यांचे उत्तर ऐकून आलेले पोलीस अवाक् झाले. पण, वासंती देव यांच्यासाठी त्यांनी काही वेगळे केले असे नव्हते.याचे कारण वासंती यांचे माहेर आणि सासर दोन्हीही देशभक्त आणि समाजशील. वासंती यांचे पिता रामेश्वर कर्वे आणि आई शकुंतलाबाई. मूळ किहीमचे कुटुंब. पण, कामानिमित्त रामेश्वर जिराड येथे स्थायिक झाले. ते संस्कृतचे पंडित आणि शिक्षक. मराठी साहित्यातील नामवंतांशी त्यांची मैत्री, अनेक नामवंत, साहित्यिक, कवी त्यांच्या घरी आस्थेने येत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. त्यावेळी रामेश्वर त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांनी त्यांना सांगितले की, “तू संस्कृतचा विद्वान आहेस. बहुजन समाजाला संस्कृत शिकव. त्यांच्यासाठी कार्य कर.” तेव्हापासून ते वयाच्या १०२ वर्षांपर्यंत रामेश्वर यांनी संपूर्ण रायगड तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांत विनामूल्य संस्कृत शिकवायला सुरुवात केली.४० हजार विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवले. अशा पित्याची कन्या वासंती. घरात जातिभेद नव्हताच. शकुंतला बाई वासंती यांना नेहमी सांगत की, “आपल्या सोबत असणार्‍या सगळ्यांची आपण जबाबदारी घेतली पाहिजे आणि एकदा जबाबदारी घेतली की, ती पूर्ण केलीच पाहिजे.” अशा समाजशील आणि संस्कारी वातावरणात वासंती यांचे संगोपन झाले.पुढे त्यांचा विवाह पेणच्या श्रीकांत देव यांच्याशी झाला. श्रीकांत यांचे पिता पुरुषोत्तमहे हिंदू महासभेचे कार्यकर्ते. सासरी संयुक्त कुटुंब. नणंदा आणि दीर यांनी गोकुळ असलेले सासर. संसार सुरू होता. वासंती यांना दोन अपत्यं झाली. पुढे याच काळात डॉ. अशोक भोईर यांच्या पत्नी मंगला भोईर यांच्या संपर्कातून वासंती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सहभागी झाल्या.


गंगापूजनचा कार्यक्रम होता. पेणमधील २५ हजार घरांना या गंगापूजनात सहभागी करून घ्यायचे होते. त्यासाठी वासंती आणि इतर सर्व महिला कार्यकर्त्यांनी संपूर्ण पेणमधील घरांशी संपर्क साधला. घराघरात संपर्क झाल्याने वासंती यांना पेणमधील समाजजीवनाची सांगोपांग ओळख झाली. अनेक प्रश्न नव्याने समजले. लोकांची असलेली धर्माप्रति आस्था आणि तितकेच अज्ञानही. महिलांच्या कौटुंबिक समस्या, युवकांचे प्रश्न आणि वृद्धांचेही जगणे. या सगळ्यापेक्षा मोठी समस्या होती, लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन होणारे धर्मांतरण. वासंती आणि विश्व हिंदू परिषदेच्या त्यांच्या सहकार्‍यांनी या धर्मांतरांविरोधात एक मोहीमच सुरू केली. वाड्यापाड्यात लोकांना प्रत्यक्ष भेटणे आणि तिथे कुणी धर्मांतराचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्याविरोधात ठळक कारवाई करणे, हे काम सुरू केले.

याच काळात वासंती या नाशिक येथे विश्व हिंदू परिषदेच्या अभ्यासवर्गाला गेल्या. तिथे दामूअण्णा दाते, अनिरूद्ध देशपांडे, निशिगंधा मोगल यांच्यासारख्या मार्गदर्शकांकडून त्यांना जाणीव झाली की, आपण जिथे आहोत तिथून समाजकल्याणाला सुरुवात केली पाहिजे. तसेच एका कार्यक्रमात वासंती यांनी अत्यंत मोठे सामाजिक काम उभे करणार्‍या दुर्गम भागातील महिला पाहिल्या. त्यांना पाहून वासंती यांना वाटले की, आपण तर काहीच काम करत नाही. त्यामुळे मग सहकार्‍यांच्या मदतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पेण येथे ९०च्या दशकामध्ये ‘अहिल्या महिला मंडळ’ स्थापन केले. आज याच अहिल्या महिला मंडळाच्या सेवाकार्याचा वटवृक्ष झाला. पेणमधील सामाजिक जीवनाला भेडसावणार्‍या जवळ जवळ सर्वच समस्यांच्या निराकरणासाठी ‘अहिल्या मंडळ’ दिवसरात्र काम करते. वृद्धाश्रम, वनवासी गरजू विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, आरोग्य शिबीर, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार अशा अनेक आयामातून अहिल्या महिला मंडळ काम करते.रायगड जिल्ह्यात पूर-आपत्ती असे वादळ असो की कोरोनाची आपत्ती असो, या सर्व कठीण समयी वासंती पेणवासीयांच्या सोबत आईच्या मायेने उभ्या राहिल्या. त्यामुळेच पेण-रायगड जिल्ह्यामध्येच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करणार्‍या संस्थांमध्ये ‘अहिल्या महिला मंडळ’ आणि वासंती यांचे नाव अग्रणी आहे. मात्र, या कार्याबाबत त्या म्हणतात की, ”हे ईश्वरीकार्य आहे आणि त्यामध्ये सर्व सज्जन समाजाचे सहकार्य आहे.” पुढील आयुष्यात वासंती यांना अयोध्येच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्या आशीर्वादाने शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्य करायचे आहे. अशा या वासंती देव खरेच रायगड जिल्ह्यातील दैवीकार्य करणार्‍या मातृशक्ती आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.