...म्हणून मीरा-भाईंदरमधील मोर्चाला परवानगी नाकारली ! काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

    08-Jul-2025   
Total Views | 25

मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवार, ८ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली यामागचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी पोलीस आयुक्तांना ही परवानगी का दिली नाही, असे विचारले. कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. त्यावर मला आयुक्तांनी सांगितले की, त्यांच्याशी मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा सुरु होती. परंतू, ते जाणीवपूर्वक ज्यातून संघर्ष होईल अशा प्रकारचा मार्ग मागत होते. त्यावर पोलिसांनी त्यांना अशाप्रकारचा मार्ग न घेता मोर्चाचा नेहमीचा मार्ग घेण्यास सांगितले. पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला आणि आम्ही हाच मार्ग घेणार, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली, असे मला आयुक्तांनी सांगितले आहे."

"मनसेच काय कोणालाही मोर्चा काढण्यासाठी परवानगी हवी असल्यास ती मिळेल. मात्र, आम्हाला इथेच मोर्चा काढायचा आहे, असाच काढायचा आहे ,अशाप्रकारे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास तो योग्य नाही. आपल्या सर्वांना राज्यात एकत्रितपणे राहून राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य मार्ग निवडून त्यांनी मोर्चासाठी परवानगी मागितल्यास ती कधीही मिळेल. आजही मिळेल आणि उद्याही मिळेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

विशिष्ट मार्गावर मोर्चा काढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

"व्यापाऱ्यांना जो मार्ग निश्चित केला होता, त्याच मार्गावर त्यांचा मोर्चा निघाला. त्यांनी कुठल्याही मार्गाचा आग्रह केला नाही.परंतू, यांनी विशिष्ट मार्गाचा आग्रह केला, जिथे मोर्चा काढणे कठीण आहे. त्यांना सभा घेण्याचीही परवानगी देण्यात आली होती. पण विशिष्ट मार्गावर मोर्चा काढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाच्या इतिहासात आणि वर्तमानात मराठी माणसाचे मोठे योगदान

"निशिकांत दुबे यांचे वाक्य नीट ऐकले तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. त्यांनी सरसकट मराठी माणसाला म्हटलेले नाही. तरीसुद्धा अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. कारण त्यातून निघणारे अर्थ लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. महाराष्ट्रात मराठी माणसाचे ऐतिहासिक योगदान फार मोठे आहे. आजही देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात जास्त योगदान देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या देशाच्या इतिहासात आणि वर्तमानात महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. कुणी ते नाकारत असल्यास अत्यंत चुकीचे आहे," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121