जनजाती आणि ग्रामीण भागातील नागरिकांकरिता समाजसेवेच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय सेवा देणारे किशोर मोघे यांच्याविषयी...
जनजाती आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने किशोर महादेवराव मोघे गेली 30 वर्षे अविरतपणे कार्यरत आहेत. यवतमाळच्याच मारेगाव तालुका, जळका नावाच्या एका लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. घरी आईवडील आणि ही सात भावंडे. वडील शेतकरी होते. स्वतःची शेती आणि त्यासोबतच असलेले कापडाचे दुकान यावर काय तो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालायचा. अशा परिस्थितीत सातही भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास वडिलांनी घेतला होता. त्यामुळे तो काळ एकाअर्थी वडिलांसाठी अधिक संघर्षमय होता.
किशोर यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावीच झाले. आठवीचे शिक्षण जवळच असलेल्या पांढरकवडा या ठिकाणी झाले. नववी आणि दहावीचे शिक्षण त्यांनी पुढे नागपूर येथील एका महाविद्यालयात घेतले. शिवाजी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे अकरावी व बारावी झाल्यानंतर त्यांनी होमियोपॅथीमधला कोर्स केला. त्यानंतर पंचशील होमियोपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय, खामगाव, जि. बुलढाणा होमियोपॅथीमध्ये ‘एमडी’ केले. आंतरभारतीय होमियोपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे चार वर्षांचा मेडिकल कोर्स करत असताना त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची खर्याअर्थाने ओढ लागली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर झिटे यांना समाजकार्यात रस होता. ते समाजात जाऊन वैद्यकीय सेवा द्यायचे. समाजकार्याचे बाळकडू किशोर यांना तिथे मिळाले.
बुलढाण्यात ‘एमडी’चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस निरनिराळ्या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली. नागपूरला क्लिनिक सुरू केले. हे सर्व करत असताना सामाजिक कार्यात काम करणार्या ‘मित्र मिलन’सारख्या परिवाराची ओळख झाली. तेव्हा पहिल्यांदा किशोर यांच्या मनात विचार आला की, जनजाती आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कार्य केले, तर आपली वैद्यकीय सेवा खर्या अर्थाने पूर्ण होईल. त्यामुळे उपजीविका, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, मुलांचे शिक्षण असे ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’ नावाने संस्थेची स्थापना झाली.
1995 सालापासून संस्थेच्या माध्यमातून किशोर हे पूर्णवेळ यवतमाळ जिल्ह्यात काम कार्यरत आहेत. ‘ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट’ ही एक स्वयंसेवी संस्था आहे, जी ग्रामीण, जनजाती आणि नागरी समुदायांच्या शाश्वत विकासासाठी सक्रिय आहे. जीवनउपाय, आरोग्य आणि शैक्षणिक समस्या सोडवणे, ही उद्दिष्टे समोर ठेवून संस्था स्थापन करण्यात आली. हे करताना त्यांच्या शाश्वततेचा आणि पर्यावरणीय सुरक्षेचाही विचार केला जातो.
किशोर यांचा ठाम विश्वास आहे की, स्थानिक स्वशासन संस्थांचे सशक्तीकरण हेच समुदायातील कौशल्ये वाढवण्याचे प्रमुख साधन असायला हवे; जेणेकरून समुदाय स्वतःच्या समस्या स्वतः सोडवू शकतील. ही संस्था सर्वाधिक दुर्लक्षित आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या शोषित समुदायांसाठी कार्य करते आणि विशेषतः महिला सक्षमीकरणावर भर देते. आज या संस्थेकडे दीडशेहून अधिक कर्मचार्यांची एक मजबूत टीम आहे, ज्यामध्ये तांत्रिक तज्ज्ञ आणि कृषी पदवीधर, कृषी तंत्रज्ञ, स्थापत्य अभियंते, सामाजिक शास्त्रज्ञ, व्यवसाय प्रशासन, वित्त, इत्यादी अशा तळागाळातील संघटकांचा समावेश आहे.
ही संस्था लहान आणि सीमांत शेतकरी, भूमिहीन, आदिवासी आणि महिलांना गट आणि संस्थांमध्ये संघटित करून त्यांच्या गरिबी आणि असुरक्षिततेचे निराकरण करण्यासाठी काम करते. समुदायांमध्ये स्वयंपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संस्थेने 500 हून अधिक शेतकरी गट, 105 ‘सीएफआरएमसी’, 50 ‘बीएमसी’, सहा ‘एफपीओ’, दोन ‘एसएचजी फेडरेशन’ इत्यादी स्थापन केले आहेत. 50 सहभागींच्या राहण्याची क्षमता असलेले दोन पूर्ण प्रशिक्षण केंद्रे आणि ‘जीएसएमटी’ जमिनींवर प्रतिकृतीयोग्य उपजीविका मॉडेल्सची स्थापना केली आहे.
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि वातावरण बदल हा संस्थेचा कार्यरत असलेला पहिला ‘थिमॅटिक एरिया’ आहे. दुसरा सामूहिक आरोग्य व पोषण, तिसरा ‘एरिया चाईल्ड राईट्स प्रोटेक्शन एण्ड क्वॉलिटी एज्युकेशन’शी संबंधित आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यांमध्ये काम सुरूच आहे. त्यासह विदर्भातही संस्थेचे विशेष कार्य आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदल, शाश्वत शेती, वन औषधी, पाण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे, जैविक शेती, जंगलआधारित उद्योजकता, ‘मधुरस’ या ब्रॅण्डखाली मध प्रक्रिया, 16 आदिवासी गटांसोबत कार्यरत, स्वयंसाहाय्यता गटांसाठी प्रशिक्षण, स्वयंपूर्ण राहणीमानासाठी मदत ही काही प्रमुख क्षेत्रे आहेत, ज्याकडे संस्थेचा सध्या विशेष लक्ष आहे. जनजाती आणि ग्रामीण भागातील लोकांकरिता सुरू असलेल्या किशोर मोघे यांच्या कार्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!