मृत्यूच्या दाढेत नेणार्या सर्पदंशावर तातडीने उपचार करुन हजारोंना जीवदान दिलेल्या डॉ. सदानंद राऊत यांच्या कार्याविषयी...साप... या सरीसृपाच्या केवळ नाममात्र उल्लेखानेच थरकाप उडणाराचे मुळी बहुसंख्य. कारण, माणसाला भीती वाटणार्या वन्यजीवांच्या यादीत साप हा वरच्या क्रमांकावर. कारण, साप विषारी असतात आणि सर्पदंशावरील तातडीच्या वैद्यकीय उपचारांबाबतची माणसांमध्ये अनभिज्ञताच अधिक. तसे पाहता, आजच्या बदलत्या काळात सर्पमित्र आणि अन्य माध्यमातून आजची पिढी काहीअंशी का होईना, याबाबत अधिक जागृत होताना दिसते. मात्र, तरीही सर्पदंशाची भीती ही धडकी भरविणारीच! यात दुमत असण्याचे कारण नाही. हा ऊहापोह करण्याचा हेतू हाच की, आज आपण ज्या व्यक्तीची ओळख येथे करून घेणार आहोत, ज्या व्यक्तीने सर्पदंशाबाबत जनजागृती आणि शून्य सर्पदंशाचा ध्यास घेतला आहे. केवळ ध्यासच नाही, तर जवळपास १२ हजारांहून अधिक सर्पदंश झालेल्यांना त्यांनी जीवनदान दिले आहे. आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठी व्हावा, असे मानून काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सदानंद राऊत.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. राऊत हे राज्यातच नव्हे, तर देशभरात ‘शून्य सर्पदंश’ हा उपक्रम राबवित आहेत. काही वर्षांपूर्वी आपल्या गावात सर्पदंशाने मृत्यू होत आहेत, हे बघून गावात बदल घडवायचा असे त्यांनी मनाशी ठरविले. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्यात अनुभव घेऊन पुन्हा गावचा रस्ता धरला. जुन्नर तालुयातील नारायणगाव येथील रहिवासी व ‘जागतिक आरोग्य संघटने’चे सदस्य असलेले डॉ. सदानंद राऊत हे गेल्या अनेक वर्षांपासून घोणस, फुरसे, मण्यार, कोब्रा यांसारखे अनेक विषारी साप चावल्याने होणारे मृत्यू आटोयात आणण्यासाठी झटत आहेत. याविषयीची व्याख्याने, माहितीपटाद्वारे सर्पदंशबाबत जनजागृती असे त्यांच्या कामाचे स्वरुप.
जुन्नर तालुयातील उंब्रज येथे धरणग्रस्त कुटुंबात जन्मलेल्या डॉ. राऊत यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर आर्थिक परिस्थितीवर मात करीत, पुणे येथील बी. जे. मेडिकल महाविद्यालयामधून ‘एमबीबीएस’ व पुढे केईएम रुग्णालयामधून ‘एमडी मेडिसीन’ हे शिक्षण पूर्ण केले. जहाँगीर तसेच केईएम रुग्णालयातील कामाचा अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत त्याचा उपयोग व्हावा, यासाठी नारायणगाव ही कर्मभूमी म्हणून निवडली आणि गरिबांच्या रुग्णसेवेचा वसा हाती घेतला. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून १९९४ साली ‘विघ्नहर नर्सिंग होम’द्वारे गरजूंवर मोफत उपचार करण्यास डॉ. राऊत यांनी प्रारंभ केला. ‘सर्पदंश उपचार’ व ‘विष-विज्ञान संशोधन केंद्र’ स्थापन करून अनेकांना त्यांनी जीवदान दिले. काही ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला गावातील मंदिरात ठेवले जायचे. साप बिनविषारी असला, तर प्राण वाचायचे. मात्र, साप विषारी असेल, तर उपचारांअभावी त्या व्यक्तीचा मत्यू व्हायचा. असे प्रकार थांबण्यासाठी डॉ. राऊत यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीत राज्यभरात अंधश्रद्धा असलेल्या भागात जाऊन जनजागृती केली व सर्पदंशामुळे होणारे अनेकांचे प्राण वाचविले. डॉ. राऊत यांनी केलेल्या विधायक कार्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहातील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन, विषारी तसेच बिनविषारी सापांविषयी डॉ. राऊत जनजागृती करतात. सर्पदंश व त्यावरील प्रथमोपचार, सापांविषयीचे गैरसमज, अंधश्रद्धा, सापांपासून आपले संरक्षण याद्वारे डॉ. राऊत यांनी राज्यभरातील ग्रामीण, तसेच आदिवासी भागांतील शाळा-महाविद्यालये, तसेच घाटावर जाऊन जनजागृतीद्वारे चळवळ उभारली. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर आणि संगमनेर तालुयातील गरीब आणि आदिवासी रुग्णांसाठी डॉ. राऊत यांचे रुग्णालय ‘लाईफलाईन’ ठरले. अतिगंभीर रुग्णांवर अगदी क्लिष्ट शस्त्रक्रियाही केल्या जातात. ‘शून्य सर्पदंश’ मृत्यूदर प्रकल्प सुरू करून आतापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना डॉ. राऊत यांनी जीवदान दिले आहे. महाराष्ट्रात राबविलेल्या ‘शून्य सर्पदंश मृत्यूदर’ प्रकल्पांमुळे अनेकांचे प्राण वाचवून अपंगत्व व मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण घटले आहे. सामाजिक जाणीवेतून गरजूंवर मोफत उपचाराला प्राधान्य देत डॉ. राऊत यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
‘विघ्नहर मेडिकल फाऊंडेशन’द्वारे राऊत दाम्पत्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिरांद्वारे गेल्या ३५ वर्षांमध्ये नगर, पुणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील दोन लाख, ५० हजार नागरिकांना वैद्यकीय लाभ मिळवून दिला. डॉ. राऊत हे ‘सर्पदंश’ या विषयाचा वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी देखील प्रयत्नशील आहेत. त्यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, ‘ऑसफर्ड युनिव्हर्सिटी’, नेपाळ आणि अबुधाबी येथेही सर्पदंशाबाबत प्रबोधन केले आहे. कोलकाता, बंगळुरु, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हैदराबाद येथेही यासंदर्भात व्याख्याने दिली आहेत.
देशभरातील दहा हजारांपेक्षा अधिक वैद्यकीय अधिकार्यांना प्रशिक्षण, शेतकर्यांमध्ये सर्पदंश जागरूकता व प्रतिबंधासाठी ५०० पेक्षा अधिक व्याख्याने, देशभरात २० हजारांपेक्षा जास्त डॉटर्स, वैद्यकीय विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत व्याख्याने, पुणे जिल्ह्यातील तीन हजार, ५०० हून अधिक आशा सेविकांना प्रशिक्षण, अशी विधायक कामे त्यांनी केली. त्यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
शशांक तांबे९७६६५८७६७६