कर्मयोगी ते भक्तियोगी

    05-Jul-2025
Total Views | 9

Shikshashtakam Das
 
 
विविध क्षेत्रांतील लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करून आपले प्रचारकार्य भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ‘इस्कॉन’चे प्रचारक शिक्षाष्टकम दास यांच्याविषयी...
 
एक धाडसी, शिस्तप्रिय देशसेवक व सध्या ‘इस्कॉन’चे प्रचारक, आध्यात्मिक मार्गदर्शक शिक्षाष्टकम दास यांचा जन्म दि. 11 सप्टेंबर 1973 रोजी, रायगडमधील खोपोली या गावी झाला. लहानपणापासूनच शिक्षाष्टकम यांनी त्यांच्यामधील असाधारण शिस्त आणि उत्कृष्टतेचे दर्शन घडवले. हीच गुणवैशिष्ट्ये त्यांनी भारतीय हवाई दलातील सेवा आणि नंतरच्या आध्यात्मिक जीवनातही कायम जपली. 1990 साली वयाच्या 17व्या वर्षी भारतीय हवाई दलात प्रवेश केलेल्या शिक्षाष्टकम यांनी, 1998 पर्यंत म्हणजेच आठ वर्षांच्या सेवाकाळातच त्यांची निवड ‘फायटर पायलट’ म्हणून झाली. येथे त्यांनी अपवादात्मक कौशल्य आणि जबाबदारीचे दर्शन घडवले. या कर्तृत्वामुळे त्यांची निवड ‘लॉन टेनिस सर्व्हिसेस टीम’मध्येही झाली. तेथेही त्यांनी पूर्ण समर्पण भावनेने राष्ट्रीय स्तरावर हवाई दलाचे प्रतिनिधित्व करताना, शिक्षाष्टकम यांनी एकप्रकारे देशाची सेवा करण्याचेच काम केले. ही देशसेवा सुरू असतानाच्या काळातच शिक्षाष्टकम 1993 साली ‘आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघा’च्या (इस्कॉन) संपर्कात आले. येथूनच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.
 
1995 साली परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडून दीक्षा प्राप्त करत, आपल्या आयुष्याला एका गहन आध्यात्मिक दिशेकडे वळवले. 1998 मध्ये हवाई दलातील प्रतिष्ठित नोकरीचा राजीनामा देत, पूर्ण वेळ ब्रह्मचारी आणि ‘इस्कॉन’चे प्रचारक म्हणून स्वतःला समर्पित करण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला. कर्मयोग पूर्ण करून शिक्षाष्टकम भक्तियोगाच्या मार्गावर आपल्या जीवनाला घेऊन गेले. तेव्हापासून अनुसारलेला अध्यात्माचा मार्गावरचा प्रवास शिक्षाष्टकम यांनी आजपर्यंत सुरु ठेवला असून, आता ते ‘इस्कॉन’मध्ये पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या लष्करी शिस्तीचा आणि आध्यात्मिक गहनतेचा उत्तम मिलाप करून, हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम ते करतात. युवकांच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ते प्रभावी मार्गदर्शनही करतात. वैदिक ज्ञानाचे शास्त्रीय आणि तर्कसंगत विश्लेषण सादर करून, हजारो युवकांना कृष्णभक्तीशी जोडण्याचे काम नित्यनेमाने करत आहेत. शिवाय ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयएम’ यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्येही प्रभावी ‘लाईफस्टाईल सेमिनार’ घेत, विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यांनी सुलभ बनविले.
 
शिक्षाष्टकम यांची कॉर्पोरेट आणि औद्योगिक जगतात आधुनिक नेतृत्व आणि व्यवस्थापनासाठी आध्यात्मिक तत्त्वांवर आधारित व्याख्याने, अत्यंत लोकप्रिय आहेत. इतकेच नव्हे, तर मीडिया आणि इतर प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना वेळ मिळेल तसे ते मार्गदर्शनही करतात. युरोप, युके आणि मध्यपूर्व देशांमध्ये सतत प्रवास करून, ते आध्यात्मिक सेमिनार घेतात. जगप्रसिद्ध ‘ऑक्सफर्ड’, ‘कॅम्ब्रिज’ आणि ‘बर्मिंगहॅम’ यांसारख्या विद्यापीठांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना आवर्जून निमंत्रित केले जाते. असे साधे सरळ सेवामयी जीवन जगत असताना, इतर प्रचारकांनाही प्रेरणा देऊन कणखर नेतृत्वाची भूमिका लीलया निभावतात. सध्या ते ‘इस्कॉन’ नाशिकच्या प्रेसिडेन्शियल बोर्ड सदस्याच्या रुपात, अनेक श्रद्धाळूंना आध्यात्मिक मार्गदर्शन करतात. ‘इस्कॉन यूथ फोरम’चे नेतृत्व करताना तरुण पिढीला आध्यात्मिक ज्ञान देऊन, त्यांच्यात स्पष्टता, करुणा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्यही ते करतात. यामुळे अनेक तरुण भक्तिमार्गाचे पालन करून, आपले भौतिक आयुष्य सांभाळत जीवनसमतोल राखण्यास यशस्वी झाले आहेत.
 
शिक्षाष्टकम दास यांची प्रवचने श्रोत्यांवर प्रभाव पाडतात याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यांची जीवनपद्धती आणि आध्यात्मिक सादरीकरण हे आधुनिक युगाशी सुसंगत असल्याने, त्यांची व्याख्याने विनोद, प्रज्ञा आणि व्यवहार्यतेचे उत्तम मिश्रण असल्याचे भक्तांकडून नेहमीच सांगितले जाते. आपल्या अगाध वाणीने गहन आध्यात्मिक सत्य सामान्य लोकांपर्यंत ते सहज पोहोचवतात. त्यामुळे ते जगभरातील सर्व वयोगट आणि क्षेत्रांतील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. सध्या शिक्षाष्टकम दास यांनी एक मोठे ध्येय हाती घेतले असून, ‘नाशिकसाठी आशेचे मंदिर’ (20202027) साकारण्याच्या कार्यात मग्न आहेत. नाशिककरांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी श्री श्री राधा मदन-गोपालजींच्या भव्य मंदिराच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला आहे. या भव्य मंदिराचे 2027 मध्ये कुंभमेळ्याच्या काळात लोकार्पण होणार असून, ते एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जावे अशी त्यांची इच्छा आहे. एक फायटर जेट उडवणारा तरुण ते लाखो लोकांच्या आध्यात्मिक जीवनाला उंच भरारी देणारे व्यक्तिमत्त्व, असा शिक्षाष्टकम दास यांच्या जीवनातून प्रत्येकाला प्रेरणादायी वारसा मिळाला आहे. शिस्त, भक्ती आणि उच्च उद्दिष्टांचा संगम करून आयुष्य सफल करण्यासाठी ते अध्यात्माचा मार्ग दाखवतात. अखंड सेवाभाव, सद्भावनेने केलेले मार्गदर्शन आणि समर्थ व्यवहार्य उपदेशांमुळे जगभरातील लोकांना कृष्ण भावनाभावित व अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरित करणार्‍या आध्यात्मिक गुरूला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
 - विराम गांगुर्डे
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121