जाहीरात क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि अनेकांना मार्गदर्शन करणाऱ्या पूजा आंबूलकर यांच्याविषयी...
प्रयोगशिलता आणि परिवर्तन या दोन गोष्टी हातात हात घेऊन चालतात. समाजाला जर प्रगतिपथावर चालायचे असेल, तर प्रयोगशील तरुणांची फळी उभी राहायल हवी. व्यक्तीच्या विकासाबरोबरच आपण ज्या समाजाचा अविभाज्य भाग आहोत, त्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण तत्परतेने काम करण्याची भावना, काहींच्या मनात तयार होते. त्यानुसार आपल्या कामाच्या माध्यमातूनच काहीजण या समाजाचे ऋण फेडतात. आपल्या कामाच्या माध्यमातून, जाहिरात क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्या या व्यक्तीचे नाव म्हणजे पूजा आंबुलकर.
पूजा आंबुलकर यांचे बालपण नागपूर येथे गेले. आजीच्या सहवासात त्यांची जडणघडण झाली. पूजा यांचे वडील दत्तात्रय आंबुलकर यांच्या नोकरीमुळे, वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची त्यांना संधी मिळाली. आपल्या लहानपणीचे अनुभव सांगताना पूजा म्हणतात की, “त्या काळात टिव्हीवरच्या जाहिरातींनी त्यांना आकर्षित केले होते.” नकळत कुठेतरी ‘जाहिरात’ या माध्यमानेच त्यांना लहान वयात निवडले होते, असे आता त्यांच्या कामाकडे बघून म्हणावेसे वाटते. आपल्या करिअरचा मार्ग निवडताना बर्याचदा सरधोपटपणे डॉक्टर, इंजिनिअर या मार्गांचा निवड करण्याचा तो काळ होता. अशातच पूजा यांनी मात्र हा विचार नाकारून, स्वतःसाठी वेगळी वाट निवडली. अहमदाबाद इथल्या ‘मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स’ येथून त्यांनी, जाहिरात क्षेत्रासाठी आवश्यक ते शिक्षण घेतले. याच शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची पुढची कारकीर्द आकाराला आली. आपल्या या शिक्षणाच्या काळातील अनुभव सांगताना त्या म्हणतात की, या प्रवासात त्यांना अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील अंतरंगाची जाणीव त्यांना झाली. त्याचा भविष्यातील व्यावसायिक आयुष्यात त्यांना उपयोगही झाला.
2008 सालापासून जाहिरात क्षेत्रामधील वेगवेगळ्या पदांवर त्या कार्यरत आहेत. मागच्या दोन दशकांच्या कालावधीत भारत जितक्या वेगाने बदलत गेला, तितक्याच वेगाने जाहिरात क्षेत्र, ब्रॅण्डिंग यामध्येसुद्धा आमूलाग्र बदल झाले. एखाद्या वस्तूची विक्री करताना केवळ ते उत्पादन जनसामान्यांपर्यंत जात असते असे नाही, तर त्या वस्तूमागचा एक विचारसुद्धा लोकांपर्यंत जात असतो. हा विचार पोहोचवण्याचे काम जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ करतात.
सामान्य माणसांना ब्रॅण्डच्या मागचा झगमगाट दिसतो परंतु, तो ब्रॅण्ड जगासमोर मांडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ लोक करतात. पूजा आंबुलकर यांनी याच तंत्रावर मांड ठोकत, आपल्या कामाच्या माध्यमातून आपला वेगळेपणा सिद्ध केला. एवढेच नाही, तर अनेकांना मार्गदर्शनही केले. पूजा आंबुलकर यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवरही स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. भारतातील ‘जिलेट’ या नामंकित ब्रॅण्डसाठी काम करताना, ‘शेविंग स्टीरीओटाईप्स’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची निर्मिती त्यांनी केली. रुढार्थाने न्हावी म्हटल्यावर तो पुरुषच असावा, अशी सर्वसाधारण प्रतिमा असते. परंतु, आपल्या वडिलांचे केशकर्तनालयाचे दुकान चालवणार्या दोन मुलींची गोष्ट त्यांनी, या माध्यमातून ‘सेलिब्रेट’ केली. त्यांच्या या आणि अशा अनेक कामांसाठी ‘कान्स सिल्व्हर लायन’ हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. अनेक तज्ज्ञ या पुरस्काराला जाहिरात क्षेत्रातील ‘ऑस्कर’ असे संबोधतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या लेकीचा या पुरस्काराने झालेला सन्मान, ही सगळ्यांसाठीच अत्यंत सुखावह बाब होती. त्याचबरोबर त्यांच्या या उपक्रमाला संयुक्त राष्ट्रांचा ‘युएन पॉप्युलेशन फंड’चा सन्मानसुद्धा मिळाला. या सर्जनशील उपक्रमावर त्या थांबल्या नाहीत. ‘कोविड’च्या काळात अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले होते. अशातच देशभरातील अनेक न्हावींना मदतीचा हात म्हणून, ‘बारबर सुरक्षा प्रोगॉर्म’ या योजनेच्या माध्यमातून त्यांनी कित्येकांना आर्थिक मदत केली. आपले जीवन कार्यमग्न असतानासुद्धा दुसर्यांना मदतीचा हात पुढे करत पूजा आंबुलकर यांनी, सामाजिक दायित्वाचा आदर्श घालून दिला आहे. ‘क्रिएटिव्ह डिरेक्टर’ या पदावर काम करत असताना त्यांना अनेक अनुभव आले, नव्हे नव्हे अजूनही येत आहेत. आपल्या या अनुभवविश्वावर भाष्य करताना त्या म्हणतात की, “शिकणे हाच माझा अजेंडा आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला जे अनुभव येतात, ते केवळ व्यक्तिगत जीवनापुरते मर्यादित नसतात. त्याचा आपल्या कामावरसुद्धा परिणाम होतो. आपल्या अनुभवांचे हे संचित वाया जात नाही. त्याचे प्रतिबिंब आपल्या कामावर उमटवते, त्यातूनच माणसांच्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.”
‘कान्स लायन्स लीडरशीप प्रोग्रेम’अंतर्गत ‘सीबी कोर्हट’ या परिषदेत त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. सदर परिषदेमध्ये जगभरातून केवळ 20 विदुषींची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये पूजा आंबुलकर यांचाही समावेश आहे. जाहिरात क्षेत्रावर भाष्य करताना त्या म्हणतात की, “माझ्या निदर्शनास असे आले आहे की, इथे अजूनही हव्या तितक्या प्रमाणात स्त्रिया कार्यरत नाहीत. जाहिरात क्षेत्रात सर्जनशीलतेला वाव आहे. परंतु, त्याच वेळेला आपल्याला इथे वेगवेगळ्या भूमिकासुद्धा पार पाडायच्या असतात. वेळेच्या आणि कौटुंबिक जबाबदार्यांमुळे महिलांची संख्या या क्षेत्रात कमी आहे.” पूजा आंबुलकर आजसुद्धा वेगवेगळ्या जबाबदार्या सांभाळत, यशाची नवनवीन शिखरं गाठत आहेत. त्यांच्या या वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!