अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सिंधुदुर्गातील रविंद्र विष्णू जाधव यांनी समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
सर एकदा संधी द्या. मला एकदा फॉर्म भरू द्या.” असे तो विद्यार्थी म्हणाला. त्यावेळी संतापाने सर म्हणाले, “नाही. तीन तीन वेळा नापास झालास. आता काय उजेड पाडणार आहेस? तुझ्यामुळे शाळेचे नाव खराब होते. तू आता दहावीच्या परीक्षेला बसूच नकोस.” शिक्षकांचे बोलणे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याने दहावीची परीक्षा द्यायचीच, असा निश्चय केला आणि तो मुलगा त्यावर्षी दहावी उत्तीर्ण झाला. दिवसा मोलमजुरी करत असल्याने त्याने गावातल्या रात्र महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर तिथल्या प्राचार्यांनी म्हटले, “दहावीची परीक्षा चार वेळा दिलीस? कशाला वेळ घालवतोस, जा मजुरी कर. तुला आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही.” त्यांचे म्हणणे ऐकून तो मुलगा कॅबिनच्या बाहेर रडत रडत थेट रस्त्यावर आला. तिथे त्याला प्रा. सतीश बागवे भेटले. त्या मुलाबद्दल त्यांना कणव वाटली. त्यांनी त्याचा प्रवेश त्यांच्या महाविद्यालयात करून घेतला. दहावी सातत्याने नापास झालेला हाच मुलगा पुढे ‘बीए’, ‘एमए’ आणि ‘एमफिल’ही उत्तीर्ण झाला, तेही प्रथम श्रेणीत! इतकेच नाही, तर ज्या महाविद्यालयात त्याला प्रवेश नाकारला होता, त्याच महाविद्यालयात तो विद्यार्थी प्राध्यापक म्हणून रुजूही झाला. तोच विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक, 24 तास लोकांच्या मदतीला धावणारा, अत्यंत समाजशील सामाजिक कार्यकर्ता म्हणून अख्ख्या सिंधुदुर्गात प्रसिद्ध आहे. त्यांचे नाव आहे रविंद्र विष्णू जाधव.
सिंधुदुर्गातील आर्थिक, सामाजिक मागास बांधवांसाठी रात्रीचा दिवस करणारे रविंद्र. रविंद्र रात्री जिल्हा रुग्णालयातच भेटतील. कारण, रुग्णालयात साप, विंचूदंशाने किंवा अपघात झालेले रुग्ण रात्रीच्या वेळेस येण्याचे प्रमाण अधिक असते. या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होऊ नये, म्हणून रविंद्र रात्री रुग्णालयात तळ ठोकून असतात. रुग्णांना वेळेत सहकार्य मिळण्यास मदत होते. तसेच, अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्यास सहसा पुढे कोणी येत नाही. मात्र, रविंद्र यांनी आजपर्यंत 60 व्यक्तींना वेळेत रुग्णालयात नेले आहे.
त्यांचे प्राण वाचवले आहेत. इतकेच नाही, तर प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने रविंद्र यांनी प्रशासनाचा पाठपुरावा केला. त्यातून त्यांनी आज गावातील आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या 11 कुटुंबांना हक्काची घरं मिळवून दिली आहेेत. नैसर्गिक आपत्ती असू दे की मानवनिर्मित, रविंद्र आणि त्यांचे सहकारी त्या आपत्तीतून लोकांचे रक्षण करायला सदैव तत्पर असतात.
रविंद्र जाधव यांच्या विचारकार्याचा आढावा घेतल्यावर जाणवते की, ‘अत्त दीप भव!’ हे सूत्र त्यांनी जीवनात कार्यान्वित केले. संकटे आली, निराश करणारे आणि घेरणारे अनेक प्रसंगही आले. मात्र, प्रत्येकवेळी रविंद्र यांनी त्या परिस्थितीवर मात केली. कधी समन्वय तर कधी संघर्ष; पण हार मानली नाही. जे जे समोर आले, त्यावर विचार करून मानवी मूल्यांच्या आदर्शानुसार जे योग्य तेच त्यांनी केले, तर रविंद्र जाधवांचे कुटुंब मूळचे सिंधुदुर्ग मधलेच. विष्णू आणि लक्ष्मी जाधव यांंचे सुपुत्र रविंद्र. हिंदू महार समाजाचे हे कुटुंब अत्यंत सज्जन आणि तितकेच कष्टाळू. विष्णू आणि लक्ष्मी हे मजुरी करत. गावात कुणाला साप चावला की, विष्णू त्यावर उतारा द्यायचे. गाववाल्यांना त्यांचा आणि त्यांना गाववाल्यांचा आधार होता. असे जरी असले, तरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची. अनेकदा उपाशीपोटी राहावे लागे. तसेच, दुसर्यांनी वापरलेल्या कपड्यांवर सणसुद साजरा करावा लागे.
रविंद्रही लहानपणापासून छोटीमोठी काम करायचे. शैक्षणिक वातावरण नसल्याने अभ्यासाचे विशेष महत्त्व नव्हते. त्यातच विष्णू यांचा मृत्यू झाला. घरची जबाबदारी रविंद्र यांच्यावर आली. मजुरी आणि अभ्यासाचे गणित जुळले नाही.
रविंद्र दहावीला तीन वेळा अनुत्तीर्ण झाले. त्याचेही त्यांना काही वाटले नसते. मात्र, त्यांच्या बरोबरची मुलं महाविद्यालयात शिकू लागली. आपल्यासोबतचे मित्र आयुष्याचा विचार करतात आणि आपण काय करतो? या विचारांनी रविंद्र यांचे आयुष्य बदलले. पुढे त्यांनी उच्चशिक्षण घेतले. महाविद्यालयात ते काही वर्षे ‘अभाविप’चे कार्यकर्तेही होते. या सगळ्या काळात त्यांना प्रा. सतीश बागवे, प्रा. दिगंबर राणे आणि डॉ. देविदास बोर्डे यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. पुढे प्राध्यापकाची कंत्राटी नोकरी लागली. कंत्राट संपल्यावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून गावच्या गोरगरीब युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच, ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थे’तर्फे सामाजिक कार्य सुरू केले. ते म्हणतात, “जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. वंचित व्यक्ती कोणत्याही समाजाची असू शकते. त्या व्यक्तीच्या संकटात मी त्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कर्तव्य मी पार पाडणार.”
किसी की मुस्कराहटो पे हो निसार,
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
जिना इसी का नाम हैं