ट्रम्प यांचा 'टॅरिफ' बॉम्ब! १४ देशांवर लादले आयात शुल्क; कोणत्या देशांवर किती टक्के टॅरिफ? वाचा संपूर्ण यादी...

    08-Jul-2025   
Total Views |

वॉशिंग्टन : (Donald Trump Announced Tariffs) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्कासंदर्भात (टॅरिफ) घोषणा केली. दक्षिण कोरिया आणि जपानवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात आयात शुल्क लागू केल्यानंतर या यादीत आणखी १२ देशांची भर ट्रम्प यांनी घातली आहे. त्यामुळे आता एकूण १४ देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले आहे. अमेरिकेच्या सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया आणि जपान या देशांवर टॅरिफ लागू केले. या निर्णयाच्या काही वेळातच ट्रम्प यांनी आणखी १२ देशांची यादी जाहीर केली. या यादीतील देशांवर ट्रम्प यानी लागू केलेल्या टॅरिफमध्ये सर्वाधिक कर तब्बल ४० टक्के इतका आहे. म्यानमार व लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक या दोन देशांवर सर्वाधिक कर लागू करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच कर लागू करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर पत्रे विविध देशांना पाठवली जातील, असे जाहीर केले होते. त्यानुसार या १४ देशांना नव्या टॅरिफ दरांसंदर्भात पत्रं पाठवली आहेत. यासंदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

कोणत्या देशांवर किती टक्के टॅरिफ? 

१. म्यानमार - ४० %
२. लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक - ४० %
३. कम्बोडिया - ३६ %
४. थायलंड - ३६ %
५. बांगलादेश - ३५ %
६. रिपब्लिक ऑफ सर्बिया - ३५ %
७. इंडोनेशिया - ३२ %
८. दक्षिण आफ्रिका - ३० %
९. बोस्त्रिया अँड हर्झगोविना - ३० %
१०. जपान - २५ %
११. दक्षिण कोरिया - २५ %
१२. मलेशिया - २५ %
१३. कझाकिस्तान - २५ %
१४. रिपब्लिक ऑफ ट्युनिशिया - २५ %



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\