नवोदित साहित्यिकांच्या हृदयातील ‘हृदयसम्राट’

    24-Nov-2022
Total Views |
madhu karnik


मुंबईच्या ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी दि. 25 नोव्हेंबर रोजी चव्हाण केंद्राचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने...


कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, 1991 साली रत्नागिरी येथे झालेल्या 64व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले व साहित्य क्षेत्रात अनेक मानसन्मान मिळवलेले ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म दि. 28 एप्रिल, 1931 रोजी करूळ, ता. देवगड, जि. रत्नागिरी (सध्याचा ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ येथील प्राथमिक शाळेत 1938 ते 1942 पर्यंत झाले. कणकवली येथील एस. एम. हायस्कूल शाळेत 1942 ते 1951 पर्यंत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले.

इच्छा असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे व आई-वडिलांचे लहानपणी निधन झाल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. त्यांच्या नोकरीची सुरुवात 9 फेब्रुवारी, 1952, ‘एसटी कार्पोरेशन’मध्ये कारकून म्हणून झाली. शिक्षण जरी कमी असले, तरी अफाट बुद्धिमत्ता, चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी असल्यामुळे गोवा प्रशासनामध्ये प्रकाशन अधिकारी, महाराष्ट्र प्रशासनमध्ये साहाय्यक प्रसिद्धी संचालक, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे ‘जनरल मॅनेजर’पर्यंत कर्णिक यांनी मजल मारली व दि. 30 सप्टेंबर, 1983 रोजी मधुभाईंनी स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारून पूर्णपणे साहित्यनिर्मितीकडे लक्ष दिले.

मधुभाईंचा विवाह दि. 10 मे, 1954 रोजी शशिकला शंकर कुलकर्णी यांच्याशी झाला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, तशीच मधुभाईंच्या मागे शुभदा वहिनी खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांनी स्वतः संसाराची जास्त धुरा सांभाळली व मधुभाईंना साहित्याचा संसार करण्यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे मधुभाई साहित्यनिर्मिती करू शकले.
मधुभाईंना वडिलांमुळे वाचनाची आवड बालपणापासूनच लागली व त्यातूनच लेखनाची आवडसुद्धा निर्माण झाली. भाईंनी शालेय जीवनात हस्तलिखिताचे संपादकत्व केले व त्यात कविता व गोष्टीही लिहिल्या.

 भाईंची पहिली कविता 1945 मध्ये ‘बाल सन्मित्र’मध्ये प्रसिद्ध झाली. यानंतर ‘मौज’, ‘साधना’, ‘दीपावली’, ‘वीणा’ इत्यादी दिवाळी अंकांतून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या असल्यातरी त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘शब्दांनो मागुते या’ हा दि. 28 एप्रिल, 2001 रोजी प्रसिद्ध झाला. त्यात 85 निवडक कवितांचा समावेश आहे. ज्येष्ठ कवींच्या मते, भाईंच्या कवितांत अंतरीचा उमाळा आहे. प्रासादिकता, उत्स्फूर्तता, उत्कटता हे यातील कवितांचे विशेष आहेत.मधुभाई लहानपणापासून कथा लिहीत असले, तरी ‘कृष्णाची राधा’ ही पहिली लघुकथा 1951 साली रत्नागिरीच्या ‘रत्नाकर’ या मासिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक अंकात त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.

madhu karnik books


 ‘कोकणी गं वस्ती’ नावाचा पहिला कथासंग्रह 1958 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी 700च्यावर कथा लिहिल्या असून 36 कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘तोरण’ व ‘तहान’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कार मिळाला आहे. कर्णिक यांच्या अनेक कथा परभाषांतून अनुवादित झाल्या आहेत.कर्णिक यांची पहिली कादंबरी ‘माहिमची खाडी’ 1969ला प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘देवकी’, ‘निरभ्र’, ‘जुईली’, ‘भाकरी आणि फूल’, ‘सनद’, ‘वारूळ’, ‘सूर्यफूल’, ‘कातळ’, ‘संधीकाल’ अशा दहा कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. कर्णिक यांची ललित गद्यात समाविष्ट होणारी ‘सोबत’, ‘नैऋत्त्येकडला वारा’, ‘जिवाभावाचा गोवा’, ‘माझा गाव माझा मुलुख’ या पुस्तकांचा समावेश होतो.

कर्णिक यांच्या ‘स्वप्नपूर्ती’ या कथेवर ‘घुंगरु’ हा हिंदी चित्रपट प्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. अरुणा राजे यांच्या कथेवरील ‘पतितपावन’ या चित्रपटाची पटकथा, संवाद व गाणी कर्णिक यांनी लिहिली.कर्णिक यांनी लिहिलेल्या ‘देवकी’ या नाटकाचा पहिला प्रयोग 1962 साली रंगमंचावर झाला. ‘केला तुका झाला माका’ हे नाटक प्रकाशित झाले नसले तरी मच्छींद्र कांबळी यांनी त्याचे 350 प्रयोग सादर केले.‘भाकरी आणि फुल’, ‘जुईली’, ‘रानमाणूस’, ‘सांगाती’ या दूरदर्शन मालिका कर्णिक यांनी लिहिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे अराजकीय चरित्र कर्णिक यांनी ‘दूत पर्जन्याचा’ या नावाने 1994 साली प्रसिद्ध केला.

कर्णिक यांची ‘लागेबांधे’, ‘अमीरगुलाल’ ही व्यक्तिचित्रे तसेच ‘जगन्नाथ आणि कंपनी’, ’शाळेबाहेरील सवंगडी’ हे बालवाड्मय प्रसिद्ध झाले आहे. कर्णिक यांनी अनेक नियतकालिकांत स्तंभलेखन केले आहे. आकाशवाणीवर अनेक नभोनाट्य, श्रुतिका, भाषणे, मुलाखती, कथावाचन, व्यक्तिचित्रवाचन इत्यादी अनेक कार्यक्रम कर्णिक यांनी सादर केले आहेत.कर्णिक यांनी फक्त साहित्यनिर्मिती केली नाही, तर साहित्यिक निर्मितीसाठी दि. 24 मार्च, 1991 रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून नवोदित लेखकांना सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे.

कर्णिक यांनी नवोदित लेखकांस त्याच्या साहित्यातील उणिवा कणाएवढ्या करून तसेच त्यातील गुणवत्ता मणाएवढी करून प्रोत्साहित करत असल्याने 1991 पासून अनेक नवोदित मान्यवर कवी लेखक म्हणून नावारूपाला आले आहेत. कर्णिक यांच्याच प्रयत्नाने मालगुंड येथे ‘केशवसुत स्मारक’ उभारण्यात आले आहे.आकर्षक व्यक्तिमत्व, ऐकत राहावे असे वक्तृत्व व लक्षात राहील असे कर्तृत्व यांचा संगम झाल्यामुळे मधु मंगेश कर्णिक नवोदित साहित्यिकांच्या हृदयातील ‘हृदयसम्राट’ झाले आहेत. मधुभाईंनी प्रसिद्धीपेक्षा सिद्धीला जास्त महत्त्व दिले आहे. नवोदित साहित्यिकांचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. साहित्य हाच त्यांचा श्वास आहे, ज्ञानदान हेच त्यांचे जीवन आहे. वादापेक्षा संवाद आणि संघर्षापेक्षा समन्वयावर जोर देऊन अर्थपूर्ण जीवन जगणे हाच त्यांच्या जीवनाचा यशस्वितेचा मंत्र आहे.

कर्णिक यांचे सामाजिक कार्य


हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक समिती, करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री ग्लास वर्क्स लिमिटेड, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्र, कोकण कला अकादमी, नाथ पै वनराई ट्रस्ट, कविवर्य केशवसुत स्मारक समिती, महाराष्ट्र गोमंतक मैत्री संघ, भाऊसाहेब वर्तक फाऊंडेशन, कवी माधव स्मारक ट्रस्ट, जागतिक मराठी अकादमी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्व संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषवली.

कर्णिक यांना मिळालेले मानसन्मान


2002 साली मधु मंगेश कर्णिक यांना राष्ट्रपतींकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याव्यतिरिक्त ‘मॅजेस्टिक पुरस्कार’, ‘अनंत काणेकर पुरस्कार’, ‘दमाणी साहित्य पुरस्कार’, ‘रणजित देसाई साहित्य पुरस्कार’ इत्यादी अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. वयाच्या 91व्या वर्षीही तरुणांना लाजवतील, अशा उत्साहाने काम करणार्‍या भाईंना दीर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

-दिलीप गडकरी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.