फ्लेमिंगो अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रात वाढ; प्रस्ताव केंद्राकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2021   
Total Views |
flamingo_1  H x
(फोटो - दक्षा अचवल)मुंबई (अक्षय मांडवकर) -
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या 'पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रा'त (इएसझेड) वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील अंतिम मंजुरीचा प्रस्ताव नुकताच राज्य शासनाने केंद्र सरकारला पाठवला आहे. यापूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या 'ईएसझेड' क्षेत्रात १४.२६ चौ.किमीची वाढ करण्यात आली असून यामुळे अभयारण्याचे एकूण 'ईएसझेड' क्षेत्र ४८.३२ चौ.किमी झाले आहे.
 
 
 
अभायारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालचा विकासाचा दबाव कमी करुन त्या क्षत्राचे संरक्षण करण्यामध्ये 'ईएसझेड' एक कवच क्षेत्रासारखे काम करते. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या खाडीमध्ये 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' आहे. हे अभयारण्य १६.९०५ चौ.किमी क्षेत्रावर पसलेले आहे. या अभयारण्याच्या 'ईएसझेड' क्षेत्राचा अंतिम प्रस्ताव मंजुरीकरिता बुधवारी राज्य शासनाकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठविण्यात आला. यापूर्वी अभयारण्याच्या ३४.०६ चौ.किमीच्या 'ईएसझेड' क्षेत्राच्या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारच्या समितीने फेब्रुवारी, २०२० मध्ये सुधारणा सुचवल्या होत्या. त्यानुसार अभयारण्याच्या संरक्षणासाठी उत्तरेकडील कांदळवनाचे राखीव वनक्षेत्र यामध्ये समाविष्ट करण्याची सूचना समितीने केली होती. ही सुधारणा करुन 'ईएसझेड'चा प्रस्ताव पुन्हा केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
 
 
 
 
 
अभयारण्याचे मूळ 'ईएसझेड'चे क्षेत्र हे पूर्व आणि पश्चिम सीमांवर विस्तारित होते. तसेच 'ईएसझेड'चे बफर क्षेत्र हे ० ते ३.५ किमीपर्यंत परसलेले होते. आता नव्याने समाविष्ट केलेल्या १४.१६ चौ.किमी क्षेत्रामुळे या संपूर्ण क्षेत्रात वाढ झाली आहे. 'ईएसझेड'च्या नव्या क्षेत्रामध्ये ठाण्यातील कोपरी, चंदने, खारीगाव आणि कळव्यामधील कांदळवनाचे राखीव वनक्षेत्र समाविष्ट केल्याची माहिती 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'चे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी दिली. तसेच 'ईएसझेड'चे कमाल बफर क्षेत्र ० ते ३.८९ किमीपर्यंत विस्तारीत करण्यात आले असून काही ठिकाणी ते २.२ किमीपर्यंत विस्तारित केल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये कांदळवनांच्या १२ प्रजाती, ३९ कांदळवन सहयोगी प्रजाती, १६७ पक्ष्यांच्या प्रजाती, ४५ माशांच्या प्रजाती, फुुलपाखरांच्या ५९ आणि कीटकांच्या ६७ प्रजाती आढळतात.
 
 
 
'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य' हे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या विकसनशील शहराच्या मध्यभागी वसल्याने या अभयारण्याच्या संरक्षणासाठी 'ईएसझेड' क्षेत्र महत्त्वाचे आहे. राज्य सरकराने अभयारण्याच्या सुधारित 'ईएसझेड' प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीकरिता केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून राजपत्र प्रसिद्ध करुन अभ्यारण्याच्या 'ईएसझेड' क्षेत्राची घोषणा होईल - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष

 
@@AUTHORINFO_V1@@