मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईत 'ब्राॅन्झबॅक ट्री स्नेक' म्हणजेच रुका किंवा रुखई या सापाची नवीन प्रजात सापडण्याची शक्यता संशोधनाअंती व्यक्त करण्यात आली आहे (new species of bronzeback). 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेने मुंबईतून रुखई साप रेस्क्यू केले होते (new species of bronzeback). त्यामधील दोन नमुने हे पश्चिम घाटात आढळणाऱ्या रुखईच्या तीन प्रजातींपेक्षा आकारशास्त्राच्या अनुषंगाने वेगळे असल्याचे सिद्ध झाले आहेत (new species of bronzeback). त्यामुळे मुंबईत रुखई सापाची नवी प्रजात वास्तव्य करत असल्याची दाट शक्यता असून त्यावर शास्त्रीय संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. (new species of bronzeback)
वृक्षवासी असणारा रुखई हा साप बिनविषारी आहे. १८२६ साली या सापाचा शोध लावण्यात आला होता. मुंबईत हा साप सर्वसामान्यपणे नागरी वस्तीच्या आसपासही आढळतो. नागरी वस्तीनजीक आढळणाऱ्या या सापांच्या बचावाचे काम 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते. संस्थेने ४ फेब्रुवारी, २०२१ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मुंबईच्या वेगवेगळ्या भागामधून एकूण १० रुखई सापांचा बचाव केला. मात्र, त्यापैकी दोन साप हे पश्चिम घाटात आढळणाऱ्या रुखईच्या तीन प्रजातींपेक्षा वेगळे असल्याचे जाणवले आहे. यासंबंधीचे संशोधन सिद्धार्थ परब, अनिल कुबल, महेश इथापे, पवन शर्मा आणि पूर्वेंद्र जठार यांनी केले आहे. याविषयीचा शोध निबंध 'रेपटाइल्स अॅण्ड हॅम्पिबियन्स' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे.
संस्थेने रेस्क्यू केलेल्या १० सापांपैकी आठ साप हे 'काॅमन इंडियन ब्राॅन्झबॅक' प्रजातीचे होते. मात्र, महेश इथापे यांनी विक्रोळी आणि कांजुरमार्ग येथून रेस्क्यू केलेल्या दोन सापांच्या जीभेचा लाल रंग आणि शरीराचा रंग गडद मातकट होता. जो पश्चिम घाटात सापडणाऱ्या रुखईच्या इतर तीन प्रजातींची साधर्म्य साधणारा होता. म्हणून या दोन्ही सापांची तुलना गिरी ब्राॅन्झबॅक, अशोक ब्राॅन्झबॅक आणि बोलेंजर ब्रॉन्झबॅक या प्रजातींसोबत करण्यात आली. परंतु, या दोन्ही सापांची आकारशास्त्रीय वैशिष्ट्य या तिन्ही प्रजातींच्या आकारशास्त्रीय वैशिष्ट्यांशी जुळली नाहीत.
नव्या प्रजातीची शक्यता
विक्रोळी आणि कांजुरमार्गमधून रेस्क्यू करण्यात आलेल्या दोन ब्रॉन्झबॅक सापांची आकारशास्त्रीय वैशिष्ट्ये सारखी आहेत. मात्र, आम्ही या प्रजातींची तुलना आकारशास्त्राच्या अनुषंगाने गिरी, अशोक आणि बोलेंजर ब्रॉन्झबॅक या प्रजातींसोबत केल्यावर आम्हाला लक्षात आले की, खवल्यांची संख्या, डोर्सोलॅटरल रेषा, वेंट्रोलॅटरल रेषा, शरीराचा आकार, चेहऱ्यांवरील अंग या कोणत्याच स्तरावर दोन्ही साप या तिन्ही प्रजातींसोबत जुळत नाहीत. त्यामुळे मुंबईतील ब्रॉन्झबॅकची ही प्रजात नवीन असण्याची शक्यता असून त्याचा अनुवांशिक अभ्यास होणे गरजेचा आहे. - महेश इथापे, बचाव कार्यकर्ता