हरिश्चंद्रगडावरुन धनगरी फेट्याच्या नव्या प्रजातीचा शोध; वाचा धनगरी फेट्याविषयी...

    19-Jun-2025
Total Views |
new species of Eriocaulon



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
हरिश्चंद्रगडावरुन धनगरी फेटा म्हणजेच इरिओकॉलोन या वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला (new species of Eriocaulon). या नव्या प्रजातीचे नामकरण 'इरिओकॉलोन मनीलालियानंम' असे करण्यात आले आहे (new species of Eriocaulon). त्यामुळे गिर्यारोहनासाठी प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड जैवविविधतेच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचा असल्याचे समोर आले आहे. (new species of Eriocaulon)
 
पश्चिम घाटातील उत्तरेकडील भाग हा उत्तर पश्चिम घाट या नावाने ओळखला जातो. पश्चिम घाट हा पर्वतरांगांनी बनलेला असून विविध प्रकारच्या वातावरणामुळे याठिकाणी विविध परिसंस्था उदयास आलेल्या आहेत. पश्चिम घाटाचा अभ्यास करताना दरवर्षी विज्ञानामध्ये उल्लेख न झालेल्या नवनवीन प्रजातींचा शोध लागतो. पश्चिम घाटातील प्रजाती या शक्यतो प्रदेशानिष्ठ किंवा दुर्मिळ या गटामध्ये मोडल्या जातात. अशाच उत्तर पश्चिम घाटामधील हरिश्चंद्रगडावरून धनगरी फेटा वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा उलगडा झाला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, मोखाडा येथील प्रभारी प्राचार्य आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. अरुण चांदोरे, तेथील संशोधक विद्यार्थी देविदास बोरुडे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेज, नाशिकचे वनस्पतिशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुमार विनोद गोसावी आणि संशोधक विद्यार्थी निलेश माधव या संशोधक टीमने पश्चिम घाटाच्या वनस्पतींचा अभ्यास करताना हरिश्चंद्रगड येथून नवीन फुल वर्गीय वनस्पतीच्या प्रजातीचा शोध लावला आहे.
 
नवीन प्रजाती ही धनगरी फेटा (Eriocaulon) या गणातील असून तिचे नाव इरिओकॉलोन मनीलालियानंम (Eriocaulon manilalianum) असे देण्यात आलेले आहे. प्रजातीचे नाव हे केरळच्या कलिकत विद्यापीठाचे प्रसिद्ध वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ स्वर्गीय के. एस. मनिलाल यांच्या वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील भरीव कामगिरी सन्मानार्थ ठेवण्यात आले. प्रोफेसर मनीलाल यांना भारत सरकारने २०२० साली पद्मश्री किताब देऊन गौरव केला होता. इरिओकॉलोन कुळातील प्रजातींचा फुलोरा छोट्या पण गच्च फुलांनी शक्यतो पांढऱ्या रंगाचा धनगराच्या फेट्यासारखा दिसतो त्यावरुन या कुळाचे नाव मराठीत धनगरी फेटा, असे पडले आहे.
 
इरिओकॉलोन या गणात (धनगरी फेटा) भारतातून ११२ प्रजातींची नोंद आहे. त्यापैकी तीनच धनगरी फेटा कंदवर्गीय प्रजातींची नोंद होती. त्यात आता या नवीन प्रजातीची भर झालेली आहे. नवीन प्रजाती ही इरिओकॉलोन ट्यूबेरीफेरम या प्रजातीच्या जवळची आहे. परंतु तिच्या बाह्य रंगांमध्ये बरीचशी भिन्नता आहे. नवीन प्रजातीचा अभ्यास करून ती वेगळी प्रजाती ठरवण्यासाठी संशोधकांना तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला.
 
नव्या प्रजातीची वैशिष्ट्ये:
• वनस्पतीची उंची १५ ते २० सेंटिमीटर.
• फुलोरा १५ ते २० सेंटीमीटर उंचीचा, गोलार्ध आणि एक सेंटिमीटर व्यासाचा पांढरा रंगाचा असतो
• मुळांमध्ये साधारण अर्धा सेंटीमीटर जाडीचे पाच ते सात कंद आढळतात.
• नर फुलांच्या पाकळ्या एकसमान असतात.
• बिया अतिशय लहान गोलाकार असतात.