मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमध्ये सोमवार दि. २३ जून रोजी एका पिशवीत भरलेले मगरीचे मृत शरीर बेवारस अवस्थेत सापडले (crocodile carcass). महत्त्वाचे म्हणजे हे मृत शरीर टॅक्सीडर्मी स्वरुपाचे होते आणि त्याचे पंजे आणि शिर कापलेल्या अवस्थेत होते. वन विभागाने हे शरीर ताब्यात घेतले असून त्याची फाॅरेन्सिक तपासणी होणार आहे. (crocodile carcass)
आरे दुग्ध वसाहतीमध्ये बेवारस अवस्थेत मगरीचे शरीर आढळ्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला कळवली. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना त्याठिकाणी पिशवीत भरलेले मगरीचे शव दिसले. पिशवी खोलून पाहिले असता, मगरीचे पंजे आणि शिर हे धडासोबत नसल्याचे निदर्शनास आले. पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये केवळ तुटलेले पंजे आढळले. महत्त्वाचे म्हणजे या मृत धडामध्ये भुसा भरलेला होता. म्हणजेच ते टॅक्सीडर्मी स्वरूपाचे शव होते. हे शव शेजारीच असलेल्या चित्रनगरीमधून कोणीतरी याठिकाणी आणून टाकल्याची शक्यता आहे. दरम्यान मगरीची कातडी ही खरी वाटत असल्याने वन विभागाने ती ताब्यात घेतली असून तिची फाॅरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे.