अरण्यऋषींचे देहावसान; मारुती चितमपल्ली यांचे निधन

    18-Jun-2025
Total Views | 25
maruti chitampalli


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक आणि अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांचे बुधवार दि. १८ जून रोजी सोलापूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले (maruti chitampalli). ते ९३ वर्षांचे होते. त्यांना नुकताच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार स्वीकारला होता (maruti chitampalli). ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार' म्हणून गौरविण्यात आलेल्या त्यांनी पक्षीकोषाच्या माध्यमातून पक्ष्यांना भारतीय नावे देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. (maruti chitampalli)
 
 
मारुती चितमपल्ली यांनी मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली. निसर्ग आणि माणूस यांच्यातील नात्याचा शोध त्यांच्या ललित प्रतिभेने घेतला. बुधवारी सायंकाळी सोलापूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चुलत पुतण्यांचा परिवार आहे. सूक्ष्म निरीक्षण, गाढा व्यासंग, संशोधकाची दृष्टी, सृष्टिविषयक जागते कुतूहल या गुणांमुळे मारुती चितमपल्ली यांनी केलेले वन्यजीवांचे, कीटकसृष्टीचे आणि एकूणच निसर्गजीवनाचे चित्रण लक्षणीय ठरले आहे. सोलापुरातील टी. एम. पोरे स्कूल व नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. नांदेड येथील संस्कृत पाठशाळेत तसेच पुणे, पनवेल येथील संस्कृत पंडितांकडे संस्कृत भाषेचे व साहित्याचे अध्ययन केले. जर्मन व रशियन भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना १९९० साली ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे.

 
वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने चितमपल्ली यांना वनांचे साहचर्य लाभले. आपल्या व्यवसायाचा सांधा अभ्यास विषयाशी जोडून घेत ऋषिवत जीवन त्यांनी व्यतीत केले. पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सालिम अली, नरहर कुरुंदकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी. दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली. प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढून देशोदेशीच्या दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह त्यांनी केला, त्यांचे वाचन परिशीलन केले. त्यातून त्यांच्यातला ललितलेखक आणि वनविद्येचा अभ्यासक घडला. १८ भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव आपल्या २१ ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. ललितगद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्मय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले.पक्षी जाय दिगंतरा (१९८३), जंगलाचं देणं (१९८५), रानवाटा (१९९१), शब्दांचं धन (१९९३), रातवा (१९९३), मृगपक्षिशास्त्र (१९९३), घरट्यापलीकडे (१९९५), पाखरमाया (२०००), निसर्गवाचन (२०००), सुवर्णगरुड (२०००), आपल्या भारतातील साप (२०००), आनंददायी बगळे (२००२), निळावंती (२००२), पक्षिकोश (२००२), चैत्रपालवी (२००४), केशराचा पाऊस (२००५),चकवाचांदण : एक वनोपनिषद (२००५), चित्रग्रीव (२००६), जंगलाची दुनिया (२००६), An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev (2000), नवेगावबांधचे दिवस (२०१०) अशी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली. चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्य जीवनावरील अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली.


चितमपल्ली यांच्या ललित लेखनाचा, त्यांच्या वनविद्येच्या अभ्यास व संशोधनाचा गौरव त्यांना अनेक झळकती मानचिन्हे देऊन करण्यात आला. नुकताच त्यांना पद्मश्री हा भारत सरकारचा नागरी पुरस्कार देण्यात आला होता. तीन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१६), दमाणी साहित्य पुरस्कार (१९९१), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९१), अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान (१९९६), महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार (२००३), वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड (२००७), नागभूषण पुरस्कार (२००८), वसुंधरा सन्मान (२००९), भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार (२०१३) अशा अनेक सन्मानांचे ते धनी ठरले. १९८७ साली नासिक येथे झालेले पहिले पक्षिमित्र संमेलन, २००० साली औदुंबर येथे झालेले ५७ वे विदर्भ साहित्य संमेलन, २००० साली उमरखेड येथे झालेले ५१ वे विदर्भ साहित्य संमेलन आणि २००६ साली सोलापूर येथे झालेले ७९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
आईची माया हरवली, पण प्रभुणे काकांची सावली लाभली

आईची माया हरवली, पण प्रभुणे काकांची सावली लाभली

समाजयोद्धा गिरीश प्रभुणे यांच्या कार्याला समर्पित या विशेषांकात, त्यांच्या छत्रछायेत घडलेल्या आणि आज समाजात मानाने उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनकथा दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वाचकांसमोर यानिमित्ताने सादर करीत आहेत. पारधी, आदिवासी आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षण, संस्कार, स्वाभिमान आणि माणूसपण देत गिरीश प्रभुणे यांनी हजारो कुटुंबांचे आयुष्य उजळवले. केवळ शिक्षकच नव्हे, तर एक पालक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत म्हणून त्यांनी समाजपरिवर्तनाची व्यापक चळवळ उभी केली. तेव्हा गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121