मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील बफर झोन मधील एका गावात काळ्या रानकुत्र्याचे दर्शन घडले आहे. पर्यटक दिग्विजय पाटील यांना या रानकुत्र्यांचे दर्शन घडले (melanistic dhole (wild dog). रानकुत्रा हा संकटग्रस्त प्राणी असून यापूर्वी काळ्या म्हणजेच मेलेनिस्टिक स्वरुपाच्या रानकुत्र्याचे दर्शन हे तामिळनाडूमध्ये झाले आहे. (melanistic dhole (wild dog)
कराड येथील दिग्विजय पाटील हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ७ मे रोजी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना बफर क्षेत्रातील एका गावात दोन रानकुत्रे दिसले. त्यामधील एक रानकुत्रा सर्वसामान्य मातकट रंगाचा होता, तर दुसरा कुत्रा हा काळ्या रंगाचा होता. त्यांनी लागलीच या काळ्या रंगाच्या रानकुत्र्याचे छायाचित्र टिपले. टिपलेले छायाचित्र त्यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना पाठवले. भाटे यांनी तज्ज्ञांकडून ओळख पटवून हा प्राणी रानकुत्रा असण्यावर शिक्कामोर्तब केले.
वनविभागाच्या नोंदीनुसार १९३६ मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर वन विभागातील गड्डेसल येथे निसर्गशास्त्रज्ञ स्कॉट्समन आर.सी. मॉरिस यांनी एका काळ्या रानकुत्र्याची (मेलेनिस्टिक) नोंद केली होती. प्रकल्पात दिसलेला रानकुत्रा हा पूर्णपणे काळा होता. वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे 'मेलेनिन' रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत: काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. प्रकल्पातील या नोंदीची माहिती विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी कळविण्यात आली असून त्या परिसरात कॅमेरा लावून अधिक माहिती आणि अभ्यास करण्याच्या सूचना वनरक्षकांना देण्यात आल्या आहेत.