संघमय जीवनाची समरस जाणीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2021   
Total Views |

rss leader  _1  
 
 
अवघं आयुष्य समरसतेच्या वाटेवर समाज घडवण्यासाठी काम करणारा एक ध्रुरवतारा. वेळ-काळ-स्थळ बदलले, पण विश्वनाथ सुतार यांचे संघशील जीवन बदलले नाही. त्यांच्याविषयी...
 
 
 
विश्वनाथ सुतार... ईशान्य मुंबई, त्यातही घाटकोपर परिसरात ज्यांनी तब्ब्ल दोन पिढ्या घडवल्या असे व्यक्तिमत्त्व. १९७७ पासून ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक.रा. स्व. संघाच्या अनेक जबाबदार्‍या चोख पार पाडत त्यांनी वयाची पासष्टी गाठली. आता आपण तरुणाईला प्रोत्साहित करावे, त्यांच्या अनेक सकारात्मक कार्यांमध्ये मदत करावी, संघाच्या शाखेत जे जे काही संस्कार घडले, ते ते जिथे असू तिथे वस्ती पातळीवर बालकांना, तरुणांना द्यावे, असा त्यांनी पण केला. सध्या ते नेरळला असतात, पण देशभराच्या अनेक समस्यांवर आवाज उठवणे, तसेच सकारात्मक कार्यामध्ये पुढाकार घेणे हे काही त्यांनी सोडलेले नाही. ७०च्या दशकात घाटकोपर परिसरामध्ये ‘कमलदीप’ संस्थेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंदांच्या नावाने तीन अभ्यासिका सुरू झाल्या.
 
 
बर्वेनगरच्या अभ्यासिकेत तर हजारो विद्यार्थी येत. ते सगळे भटवाडी, बर्वेनगर, सिद्धार्थनगर आणि भीमनगरचे युवक. या सगळ्या सेवावस्त्या. गरिबी आणि त्या अनुषंगाने येणारे सगळेच दुर्भाग्य या वस्तीत चांगलेच पसरलेले. पण, या वस्तीतल्या मुलामुलींनी शिकावे, आयुष्यात स्वत:साठी, कुटुंबासाठी समाजासाठी काहीतरी सत्कार्य करावे, ही इच्छा निर्माण करणार्‍या या अभ्यासिका. या अभ्यासिकेने पुढील पिढ्यांना शिक्षण आणि त्यापुढील सकारात्मक महत्त्वाकांक्षेचे अमृत मिळाले, त्या या अभ्यासिकांमुळे आणि विश्वनाथ सुतार आणि त्यांच्या सहकार्‍यांमुळे. या अभ्यासिकेतले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अगदी सीएही झाले. यातले किमान २५ विद्यार्थी उद्योग-व्यवसायानिमित्त अमेरिकेमध्ये आहेत. घाटकोपरचे आमदार राम कदम हेसुद्धा या अभ्यासिकेचे विद्यार्थी.अभ्यासिकेबद्दल इतके सविस्तर लिहिण्याचे कारण की, यामध्ये विश्वनाथ सुतार यांचे कर्तृत्व आहे.
 
 
 
 
रा. स्व. संघ आणि भारतीय जनता पक्षातर्फे ही अभ्यासिका चालवली जाते. परिसरातील हजारो विद्यार्थी अभ्यासिकेत येतात. हे त्या परिसरातील समाजकंटकांना आवडले नाही. त्यांनी या अभ्यासिकेबद्दल पोलिसांमध्ये तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विश्वनाथ यांना पोलिसांनी बोलवले. त्यांनी अभ्यासिकेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. तसेच या अभ्यासिकेत हजारो मुलांचे भविष्य घडवले जाते, हे सिद्ध केले. पोलिसांना जाणवले की, तक्रारीत तथ्य नाही. त्यामुळे अभ्यासिका पूर्ववत सुरू राहिली. पण, त्या समाजकंटकांस हा अपमान वाटला. दुसर्‍या दिवशी काही गुंडांनी अभ्यासिकेवर हल्ला केला. खुर्च्या-टेबल लाथेने उडवले, पण विश्वनाथ घाबरले नाहीत. दुसर्‍या दिवसापासून अभ्यासिका पूर्ववत सुरू झाली.
 
 
विश्वनाथ स्वयंसेवक आहेत, त्याचबरोबर ते भाजपचेही काम करत, पण राजकारण त्यांना मानवले नाही. त्यांनी राजकारणाला पूर्णविराम दिला. ते पूर्णवेळ रा. स्व. संघाचे काम करत. त्यावेळी ‘तरुण भारत’ पुण्याहून प्रकाशित व्हायचा. ‘तरुण भारत’चा रोजचा अंक मिळवण्यासाठी ते छशिमटच्या एका विशिष्ट दुकानात जात. दि. ६ सप्टेंबर, १९८२च्या अंकात त्यांनी बातमी वाचली की, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणास समर्थन म्हणून भाजप पक्ष मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. विश्वनाथ तत्काळ आझाद मैदानात गेले. तिथे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, धरमचंंद चोरडीया, किरीट सोमय्या वगैरे उपस्थित होते. पोलिसांनी या सगळ्यांसह आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या विश्वनाथ सुतार यांनाही अटक केली. त्यांना तुरुंगात डांबले. तिथे त्यांचा प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी नित्य संवाद होत असे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी विश्वनाथ यांची आस्थेने चौकशी केली. पक्षकार्यामुळे घरी काही समस्या तर नाही ना, अशीही आपुलकीने विचारपूस केली.
 
 
असो. मुंबईत हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे विश्वनाथ हे मूळचे दुधणी, अक्कलकोट, सोलापूरचे. वडील रामचंद्र सुतार हे सुतारकाम करत. आई लक्ष्मीबाई या गृहिणी. आई विश्वनाथांना सांगे की, कुणी कितीही वाईट वागले तरी आपण चांगले वागावे आणि नेहमीच चांगले वागावे. कारण, कर्माचे फळ मिळत असते. विश्वनाथ यांनी आईचे संस्कार कायमच लक्षात ठेवले. ते पुढे शिक्षणासाठी मुंबई भटवाडीमध्ये आले. भावांसोबत राहू लागले. पण, गरिबीमुळे त्यावेळच्या मॅट्रिकचे शिक्षण अर्धवट शिक्षण सोडावे लागले. ते छोटी-मोठी कामे करू लागले. कामे करता करता ते रात्रशाळेत जाऊ लागले. सेवावस्तीत अभ्यास करायला किती समस्या असतात, हे त्यांनी अनुभवले. पण, पर्याय नव्हता. ते दहावी उत्तीर्ण झाले. त्यांनी विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.
 
 
सकाळी ७ ते ९ महाविद्यालयात आणि त्यानंतर ते कामाला जायचे. त्यावेळी त्यांनी सोमय्या महाविद्यालयातून प्रौढ शिक्षण केंद्र सुरू केले. भटवाडी, बर्वेनगर, भीमनगर येथील कष्टकरी जीव इथे शिकू लागले. विश्वनाथ यांचा वस्तीपातळीवर दांडगा संपर्क सुरू झाला. या सेवावस्तीमध्ये त्यांनी विचार रूजवला की, आपण सगळे एक आहोत.जातीपाती पाळू नका, मुलांना शिकवा.कुटुंब आणि समाजाचे त्याद्वारे रक्षण करा. त्याचा सकारात्मक परिणाम घाटकोपर परिसरात आजही दिसून येतो. विश्वनाथ सुतार यांच्यासारखी व्यक्ती हीच समाजाची ताकद आहे. ते सध्या नेरळला राहतात. त्या परिसरात सकारात्मक सज्जनशक्तीला सोबत करण्याचा, सहकार्य करण्याचा आणि एक देशभक्त समाजशील पिढी घडवण्याचा विश्वनाथ यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्याबद्दल विचारले असता ते म्हणतात की, “मी काही वेगळे केले नाही. संघाने जे मला दिले, ते माझ्या परिसरात पेरण्याचा प्रयत्न मी केला. मी एकटा नाही तर संघ विचार आणि कार्य माझे सांगाती आहेत.”



@@AUTHORINFO_V1@@