देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्याची परंपरा आपल्याकडे अनादिकालापासून आहे. त्यात देशातील सर्व समाजघटकांचा समावेश आहे. जाती, संप्रदाय यांच्यापलीकडे जाऊन देश आणि धर्म यांसाठी आपले जीवन अर्पण केले, अशा महापुरुषांची मालिका आपल्या देशात आहे. त्यामध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे लहुजी वस्ताद साळवे! आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याचे स्मरण करणारा हा लेख...
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. लहुजींचे पूर्वज हे छत्रपतींचे एकनिष्ठ मावळे होते. त्यांच्याकडे पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी होती. स्वराज्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावात लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म झाला. दि. १४ नोव्हेंबर, १७९४ हा त्यांचा जन्मदिवस होय.वडील राणोजी साळवे हे युद्धकलेत तरबेज होते. त्यांचा तोच वारसा लहुजी वस्ताद यांनी पुढे सांभाळला. राणोजी साळवे शूर पराक्रमी होते. त्यांनी जीवंत वाघ धरला आणि खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या दरबारात हजर झाले होते आणि आपल्या अचाट शक्तीचे प्रदर्शन केले होते.
राणोजी साळवे हे पेशव्यांच्या सैन्यात सामील झाले. छत्रपतींपासून सुरू झालेला स्वराज्यनिष्ठेचा हा प्रवाह राणोजी साळवेंनी पुढे चालू ठेवला होता. दि. ५ नोव्हेंबर, १८१७ रोजी खडकी येथे पेशव्यांचे इंग्रजांसोबत युद्ध सुरू झाले. १२ दिवस चाललेल्या या तुंबळ युद्धात राणोजी साळवे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. अनेक इंग्रज त्यांनी आपल्या तलवारीने कापून काढले. शेवटी या लढाईत राणोजी साळवे धारातीर्थी पडले, तेव्हा २३ वर्षांचे लहुजी वस्ताद रणभूमीवर होते. आपल्या पित्याचा मृत्यू त्यांनी पाहिला आणि वडिलांच्या मृतदेहास साक्ष ठेवून शपथ घेतली की ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी!’ लहुजी साळवेंनी आपले जीवन देशाला अर्पण केले. खडकीच्या लढाईत पेशवे पराभूत झाल्यानंतरही १८१८ मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाला. शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकला.
देशभक्त, धर्मनिष्ठ लहुजी साळवे यांच्या मनात हा मोठा आघात झाला होता. काहीही करून इंग्रज सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्ती निर्माण केली पाहिजे, असे त्यांनी ठरवले. त्यातूनच मग लहुजींनी तरुणांना राष्ट्रनिष्ठ व युद्धकुशल बनवण्यासाठी उपक्रम हाती घेतला.१८२२ मध्ये रास्ता पेठेत लहुजी वस्ताद यांनी यांची देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य केंद्र सुरू झाले. लहुजी स्वत: उत्तम प्रशिक्षित होते. साळवे घराण्याच्या वंशपरंपरेने मिळालेले कौशल्य त्यांच्याकडे होते. ‘शक्ती’ आणि ‘युक्ती’ यांच्या संगमातून इंग्रज सरकारच्या विरोधात बंड करून उठणारे युवक त्यांना तयार करायचे होते. छत्रपतींनी ज्या भूमिकेतून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो हिंदू समाज इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पाहिजे, हेच त्यांचे ध्येय निश्चित झाले आणि त्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची समिधा अर्पण केली.ज्या ज्या मार्गाने इंग्रज सत्ता खिळखिळी करण्यासाठी प्रयत्न करता येतील ते ते प्रयत्न करणार्यांची ठाम पाठराखण करण्याचे काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केले. त्यांच्या तालमीत देशभर प्रसिद्ध झालेले आणि राष्ट्रीय जीवनाला वळण लावणारे तीन महापुरुष तयार झाले. ते म्हणजे महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक होय. लहुजी वस्ताद यांच्या तालमीत केवळ तलवारबाजी, ढालपट्टा, कुस्ती, मल्लविद्या शिकवली जात नाही, तर हे शिक्षण आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी घ्यायचे आहे, ही भावना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात असत. लहुजी वस्तादांकडे शिक्षण घेतलेल्या महात्मा फुले यांनी बहुजन समाज आणि महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. सामाजिक विषमता, जातिभेद, अंधश्रद्धा, अज्ञान या विषयावर मूलगामी चिंतन केले आणि त्याआधारे सामाजिक जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेला जेव्हा तथाकथित उच्चवर्णीय विरोध करू लागले, तेव्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पाठीशी लहुजी वस्ताद ठामपणे उभे राहिले. फुलेंच्या उपक्रमाला संरक्षण दिले.
वासुदेव बळवंत फडके हेसुद्धा लहुजी वस्ताद साळवे यांच्या आखाड्यात तयार झाले. इंग्रजांची चाकरी सोडून वासुदेव बळवंत फडके क्रांतिकार्यात उतरले. त्यामागेही लहुजी वस्ताद साळवे यांची प्रेरणा आहे. लहुजींच्या आखाड्यात तलवारबाजी, नेमबाजी अशी कौशल्यं त्यांनी आत्मसात केली आणि १८ पगडजाती जमातीचे सहकारी मिळवून इंग्रज सत्तेविरुद्ध लढा पुकारला होता. लोकमान्य टिळक हेसुद्धा लहुजी वस्ताद यांच्या तालमीत तयार झालेले राष्ट्रीय विचारांचे नेतृत्व होय. केवळ आखाड्यात दंडबैठका नाही, तर समाज संघटित करून समूहशक्तीचा प्रत्यय इंग्रज सरकारला दाखवला पाहिजे, अशी प्रेरणा लोकमान्यांच्या मनात जागली, ती लहुजींच्या सान्निध्यातच! भारतीय असंतोषाचे जनक ठरलेल्या लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,’ अशी घोषणा करून इंग्रज सरकार विरोधात दंड थोपटले होते. ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून मान्यता पावलेल्या टिळकांनी शेवटपर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी सामाजिक जीवनात सुधारणा घडवून आणल्या. वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांती केली. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्यांची प्रेरणा तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवली. ‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी’ ही लहुजींची शपथ या तिघांनी आपापल्या क्षेत्रात यशस्वी करून दाखवली. देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, पण त्याचबरोबर राष्ट्राचा म्हणजेच देशातील नागरिकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, राष्ट्र उभे राहील, याची त्यांना जाणीव होती. महात्मा फुले यांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाणीव जागृती व अंधश्रद्धा, अज्ञान यापासून मुक्त होण्यासाठी आंदोलन छेडले गेले.संपूर्ण समाजव्यवस्थेत घुसळण घडवून आणण्यासाठी फुले यांचे प्रयत्न उपयुक्त ठरले. भेदभावरहित समाजव्यवस्थेचा आराखडाच तेव्हा तयार होऊ लागला. स्वत: लहुजी वस्ताद साळवे यांनी कधी जात-धर्म यांच्या आधाराने कोणाशी व्यवहार केला नव्हता. आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि म्हणून समान आहोत, ही धारणा महात्मा फुले यांच्याप्रमाणे लहुजींचीही होती. वासुदेव बळवंत फडके हे लहुजी वस्ताद साळवे यांच्या आखाड्यात तयार झाले आणि इंग्रज सत्तेविरुद्ध लढा पुकारला त्यामागेही लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रेरणा होत्या. आपल्या खंबीर मनातल्या आणि कणखर मनगटाच्या बळावर परदास्य झुगारून दिले पाहिजे, त्यासाठी सदैव शस्त्र सज्ज असले पाहिजे आणि शस्त्राला शस्त्रानेच प्रतिकार केला पाहिजे. ही भावना जागृत करण्याचे काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केले आणि वासुदेव बळवंत फडके यांनी लहुजींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला. आपल्या छोट्याशा सैन्याच्या बळावर त्यांनी इंग्रज सत्तेला बेजार केले. लोकमान्य टिळकांनी राजकीय संघटना आणि स्वातंत्र्य यासाठी प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात जोपर्यंत आपल्या नेतृत्वाखाली समाज एकवटून उभा राहणार नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य ही दुरापास्त गोष्ट ठरेल, याची लोकमान्य टिळकांना जाणीव होती. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जागृतीसोबत शस्त्रबळही महत्त्वाचे आहे आणि या तिन्ही गोष्टींच्या विकासातून राष्ट्र उभे राहणार आहे, हे या तिन्ही महापुरुषांइतकेच स्वातंत्र्यप्रेरणा पुरूष लहुजी वस्ताद साळवे यांना माहीत होते. खरंतर ही तीन नावे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. खरंतर लहुजी वस्ताद यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांना लढण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळे ते ‘स्वातंत्र्यप्रेरणापुरूष’ ठरतात. १८२२ पासून लहुजींच्या निधनापर्यंत हजारो लोक लहुजींच्या सान्निध्यात आले व स्वत:चे मन आणि मनगट बळकट करताना राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन गेले.
एक ध्येय घेऊन त्याला संपूर्ण आयुष्य कसे अर्पण करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे लहुजी वस्ताद साळवे होय. परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन धर्मनिष्ठ समाज, राष्ट्रीय वृत्तीचे नागरिक तयार व्हावेत, यासाठी लहुजी वस्ताद यांनी आपल्या आयुष्याची समिधा अर्पण केली होती. मानवी जीवनात अनेक पै-अडचणी येतात, समस्या येतात आणि त्यामुळे आपण हतबल होऊन जातो, अशा वेळी विपरित परिस्थितीत आपल्या जाज्ज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवणार्या लहुजी वस्ताद साळवे यांना आपण आदर्श मानले पाहिजे. इंग्रज आणि काही स्वकीय यांचा सामना करताना लहुजी वस्ताद साळवे हे आपली शपथ कधी विसरले नाहीत. आपण स्वत:ला मातृभूमीच्या चरणी अर्पण केले आहे, यांचे भान त्यांनी कायम जागे ठेवले आणि ती शपथ प्रत्यक्षात आणण्यासाठी तन-मनाने झटले. देश, धर्म यांच्या रक्षणासाठी आपल्यासारखे असंख्य लोक उभे केले. कोणतेही भव्य स्वप्न साकार करण्यासाठी समूहशक्तीची आवश्यकता असते, ती आवश्यकता लहुजींनी आपल्या तालमीत तयार झालेल्या असंख्य व्यक्तींच्या माध्यमातून निर्माण केली होती. कोणतेही अवघड काम समूहशक्तीने सहजसोपे होऊन जाते, हे लहुजी वस्ताद यांच्या जीवनाचे सार आहे. कायम राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी दक्ष असणार्या लहुजींचा मृत्यू दि. १७ फेब्रुवारी, १८८१ रोजी पुण्यात झाला.हे वर्षे लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२५ व्या जयंतीचे आहे. त्यांना अभिवादन करताना आपण ‘समूहशक्ती’ आणि ‘राष्ट्रभक्ती’ या लहुजी वस्ताद साळवे यांना प्रिय असणार्या दोन गोष्टी आपल्याला जीवनाचा, व्यवहाराचा भाग कशाप्रकारे करता येतील, याचा विचार केला पाहिजे, तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
आज पुण्यात ‘क्रांतिगुरु लहुजी दौड’चे आयोजन
क्रांतिगुरु लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समितीतर्फे आज, दि. १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे ‘क्रांतिगुरु लहुजी दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, पुणे येथे सकाळी ८ वाजता या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ केंद्रीय सामाजिक न्याय व विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. ए. नारायणस्वामी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ, आ. माधुरी मिसाळ, आ. मुक्ता टिळक, आ. सुनील कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच आज सकाळी १० वाजता क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक संगमवाडी, पुणे येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य प्रा. डॉ. सुधाकर जाधवर आणि अध्यक्ष म्हणून रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. भिमराव तापकीर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
- रवींद्र गोळे