आयसीसी देणार पाकला मौका?

    दिनांक  27-Feb-2019   


दि. १४ फेब्रुवारीला पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले आणि त्याचा बदला घेत भारताने दि. २६ फेब्रुवारी रोजी एअरस्ट्राईक करत पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला. यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तान संबंध चिघळलेले असताना, येत्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने खेळतील, याची शक्यता आधाची धुसर असताना आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाला (आयसीसी) दहशतवादाची पिलावळ पाळणार्‍या देशांबरोबरचे सगळे संबंध तोडून टाका, अशा आशयाचे पत्रही सुपूर्द केले होते आणि खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उचलत पत्रात नाव न घेता, पाकिस्तानची नाचक्की करण्याचा प्रयत्नही भारताकडून करण्यात आला. पण, पाकिस्तानवर या स्पर्धेत बंदी आणण्याच्या पर्यायाबाबत आयसीसीच्या बैठकीत चर्चा होण्याचीही शक्यता मावळली आहे. पण, तरीही बुधवारपासून सुरू झालेल्या आयसीसीच्या बैठकीत भारताचे आपल्या परीने सर्वतोपरी मुद्दे मांडण्याचे प्रयत्न केले जातील, तर आयसीसीने खेळाडूंच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी हमी बीसीसीआयला दिली आहे. इंग्लंडमध्ये दि. १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सराव सामना होणार आहे. हा सामनाच नव्हे, तर भारताने कोणतेही सामने पाकिस्तानसोबत खेळू नये, अशा प्रतिक्रिया देशभरातून येत असताना, आयसीसी पाकिस्तान संघाला एक शेवटचा मौका देण्याच्या विचारात आहे. पण, आयसीसी एकटा हा निर्णय घेऊ शकत नाही, भारताने एखाद्या देशाविरोधात सामने खेळावे की नाहीत, हा त्या देशाचा प्रश्न असतो. त्यामुळे सरकारशी चर्चा केल्यानंतरच बीसीसीआय आपला निर्णय आयसीसीला देईल. त्यातच आम्ही नाही त्यातले, म्हणणार्‍या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. याआधी बीसीसीआयने विदेशी खेळाडूंनी एकतर आयपीएल खेळावे किंवा पाकिस्तान सुपर लीग खेळावी, असा निर्णय घेतला जाणार होता. मात्र, दोन देशांमधील भांडणात विदेशी खेळाडूंना सामील करणे चुकीचे असल्याचे मानून हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. असे असले तरी, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती पाहता, या संबंधीचे शेवटचे निर्णय हे बीसीसीआय आणि भारत सरकार मिळूनच घेतील.

 

‘सपने देखो, फोन नही’

 

एकीकडे क्रिकेट विश्वचषकाचा तिढा सुटता सुटत नसला तरी, सध्या भारत नेमबाजी विश्वचषक गाजवतोय. बुधवारी भारताने या विश्वचषकात आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. विश्वचषकातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. मात्र, या सगळ्याचे श्रेय जाते, ते भारतीय ज्युनियर नेमबाजांचे प्रशिक्षक जसपाल राणा यांना. कारण जसपाल राणा यांनी भारतीय नेमबाजांना अगदी सक्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान किंवा नंतरही कोणत्याही खेळाडूने जास्त वेळ फोनचा वापर करणे, हा राणा यांच्या नियमांचे उल्लंघन करणारा एक मुद्दा आहे. कारण, “ज्यांच्या अंगात शिस्त भिनली आहे, जे खेळाडू स्वप्न पाहू शकतात, जे इतर गोष्टींपेक्षा खेळाला प्राधान्य देतात, तेच नेमबाज सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत,” असे परखड मत राणा यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते, सध्या भारताच्या ज्युनिअर नेमबाजांनी एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. खरंतर, भारतीय नेमबाजी संघाची सध्याची परिस्थिती बघता युथ ऑलिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सगळ्याच स्पर्धेत एकतरी पदक आपल्या खिशात घातले आहे, पण १० मीटर एअर पिस्तूल या प्रकारात पदक आणि ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात अपयशी ठरली. तिला प्राथमिक फेरीचा अडथळाही पार करता आला नाही, याचा दोष स्वत:वर घेत राणा यांनी सर्व ज्युनिअर खेळाडूंना, “ऑलिम्पिक का सपना देखो, फोन नही,” अशी तंबी दिली आहे. राणा यांना सध्या ऑलिम्पिक कोट्याची कोणतीही चिंता नाही; पण नेमबाजांची जडणघडण शिस्तीने व्हायला हवी, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. कारण, ऑलिम्पिक कोटा काय, या किंवा पुढील स्पर्धांमधून मिळेलच. कोटा मिळवणे खूप कठीण नाही; पण जर आपण ऑलिम्पिकचा दृष्टिकोन समोर ठेवला असेल, तर आधीच नेमबाजांची जडणघडण व्हायला हवी, याकरिता राणा यांचा सगळा खटाटोप सुरू आहे. खरंतर हा नियम सगळ्याच खेळांत लागू व्हायला हवा, कारण सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे खेळाडूंना लगेच ’स्टारडम’ मिळतं आणि ती हवा खेळाडूंच्या डोक्यात जाते. त्यामुळे सर्वच खेळातील युवा खेळाडूंनी हे धोरण लागू करण्याची गरज आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat